येवा 'हॉटेल सिंधुदुर्ग' आपलाच असा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020   
Total Views |
Hotel _1  H x W


खवय्यांची दुखरी नस म्हणजे मालवणी जेवण! त्यात कोंबडी वडे, सोलकढी, मटण, मासळी, खेकडा म्हणजे पर्वणीच... दुपारी किंवा रात्रीच्या जेवणाचा बेत गरमागरम भाकरी, कोळंबी मसाला आणि चिकन-वड्यांवर ताव मारण्याचे मुलुंड-ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे 'हॉटेल सिंधुदुर्ग-मालवणी मेजवानी'.

 

हॉटेलचं जेवण कसं अगदी घरचं वाटायला हवं. मालवणी पद्धतीच्या मसाल्यातून तयार झालेले मांसाहारी आणि मत्स्याहारी जेवण, तळलेले वडे, भाकरी, सोलकढी, मालवणी मसाला, कांदा, गरम मसाला टाकून तयार केलेला झणझणीत रस्सा, अशी लाजवाब चव तुम्हाला ठाण्यातील 'हॉटेल सिंधुदुर्ग मालवणी मेजवानी' येथे मिळेल. मुलुंंड चेकनाक्यावर पोहोचल्यानंतर 'हॉटेल सिंधुदुर्ग' तुमचं हमखास लक्ष वेधून घेईल. आत प्रवेश केल्यानंतर मालवणी जेवणाच्या वासानेच पोट भरते की काय, असा भास होईल. लुसलुशीत कोळंबी मसाला, ओल्या आणि सुक्या नारळाच्या चटणीतून तयार झालेल्या तर्रीचा खमंग दरवळ मोहात पाडतो. तळलेले वडे आणि चिकन-मटण ही इथली 'स्पेशालिटी'. गरमागरम कुरकुरीत वडे आणि रस्सा तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहत नाही. खवय्यांना आणखी काय हवं असतं?

 

मालवणी जेवणात मत्स्याहार म्हणजे मासळी नसली, तर ते अपूर्णच. इथे छान काप केलेले आणि मालवणी मसाला भरलेला पापलेट, सुरमई, हलवा, बोंबील अगदी रव्यात लडबडून तळलेले मासे अगदी कुरकुरीत आणि रुचकर बनतात. काहीही खा, पण एखादा मासा चाखून पाहण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही. मालवणी जेवण संपल्यानंतर हमखास हवीहवीशी वाटणारी सोलकढीही इथे खवय्यांच्या दिमतीला हजर असतेच. पेलाभर सोलकढी पोटात गेल्यानंतर तुम्ही तृप्त होता. सर्वात शेवटी अस्सल मालवणी मसाल्याची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहते, पुन्हा कधीतरी येण्याचा बेत करून तुम्ही तृप्त होऊन निघता, ते हॉटेलमालकांना जेवणाचा अभिप्राय देऊनच!

 

सुरेश कृष्णा धुरी यांनी १९९१ साली ठाण्यात मुलुंड चेकनाका विभागात एका लहानशा जागेत 'हॉटेल सिंधुदुर्ग'ची सुरुवात केली होती. त्याकाळी ठाण्याचा विस्तार हळूहळू होत चालला होता. वस्ती वाढत होती. अनेक कंपन्या, कारखाने, उद्योगधंदे या भागात पाय रोवू पाहत होते. ठाणे शहरात आतासारखी गजबज मात्र नव्हती. मात्र, त्या काळातही या भागातील एकमेव मालवणी हॉटेल म्हणून प्रसिद्धही होत गेले. सुरेश धुरी जातीने सर्व कारभार पाहत होते. मटण, चिकनसाठी लागणारा मसाला स्वतः घरगुती पद्धतीने त्यांच्या पत्नी स्नेहलता धुरी बनवत. त्यामुळे हॉटेलचे जेवण असले तरीही घरगुती स्वाद कायम राहिला. बाजारातून मासळी निवडून आणणे, भाज्या आणि पदार्थांसाठी लागणारा सर्व बाजारहाट धुरी दाम्पत्य स्वतःहून लक्ष देऊन खरेदी करत. यामुळे रूचकर जेवण आणि घरची चव इथल्या पदार्थांना मिळाली. त्यामुळे 'हॉटेल सिंधुदुर्ग' ठाणे, मुंबई आणि इतर शहरातील खवय्यांच्या आवडीचे ठिकाण बनले. मालवणी मेजवानीचे हक्काचे ठिकाण.
 

हळूहळू ग्राहकवर्ग वाढत चालला होता. स्नेहलता आणि सुरेश धुरी या दाम्पत्याने हा पसारा आणखी वाढवण्याचे ठरवले होते. त्यावेळी हॉटेल सध्याच्या जागी उभारण्यात आले. ग्राहकांच्या मागणीला इथे फार महत्त्व. त्यामुळे नवनवीन पदार्थांची कायम भरच पडत गेली. हाच वसा त्यांच्या पुढच्या पिढीने जपला. सुरेश धुरी यांचा मुलगा जयेश धुरी आणि सून धनश्री धुरी यांनी ही परंपरा पुढे जपली. वडिलोपार्जित सुरू असलेल्या या व्यवसायात सुरेश धुरी यांना त्यांच्या मुलाची लहानपणापासूनच मदत व्हायची. शिक्षणात फारसा रस नसल्याने जयेश यांनी वेगळे काही न करता वडिलांना व्यवसायात मदत करण्याचे ठरवले होते. दहावीपासूनच हॉटेल व्यवसायात ते रूळू लागले.

 

पडेल ते काम करून नव्या जोमाने 'हॉटेल सिंधुदुर्ग'चा कारभार पाहिला. लग्नानंतर त्यांच्या पत्नी धनश्री यांनीही त्यांच्या कामात हातभार लावण्यासाठी सुरुवात केली. धनश्री यांनी त्यांच्या सासूबाईंकडून ग्राहकांना आवडणारी मसाल्यांची चव आपल्या हातांमध्ये उतरवली. जुन्या ग्राहकांसोबत नव्या ग्राहकांच्या पसंतीस 'हॉटेल सिंधुदुर्ग' उतरत गेले. आज धुरी यांच्या हॉटेलमध्ये १२ ते १५ कर्मचारी कार्यरत आहेत. याच व्यवसायावर अवलंबून राहणारा अप्रत्यक्ष रोजगाराचा आकडा सुमारे पन्नासएक जणांच्या वर आहे. हॉटेलसाठी लागणार्‍या पोळ्या आणि भाकर्‍या बनवण्याचे काम धुरी यांनी जवळच्याच भाजी-पोळी केंद्राला दिले आहे.


Hotel 1 _1  H x
 

दररोज हॉटेलसाठी सरासरी तीनशे ते साडेतीनशे भाकर्‍या आणि त्याहूनही अधिक पोळ्यांची गरज भासते. यामुळे तिथल्या महिलांनाही रोजगार मिळू लागला. त्यांना लागणारी रोजची मदतही ते करतात. “व्यवहारात संबंध जोपासण्याचे संस्कार वडिलांकडून मिळाल्यानेच हा पसारा आम्ही सांभाळू शकलो,” असे जयेश आणि धनश्री सांगतात. ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले, त्याप्रति दायित्व म्हणून दरवर्षी वृद्धाश्रमाला जमेल तशी ते मदत करतात. मालवणी मेजवानी आणि तितकीच गोड माणसं अनुभवण्यासाठी एकदा नक्कीच भेट देऊन पाहा. येवा 'हॉटेल सिंधुदुर्ग' आपलाच असा!

 

हॉटेल सिंधुदुर्ग - मालवणी मेजवानी,

कृष्णा सदन, मुलुंड चेकनाका, रस्ता क्रमांक ३,

वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम.

संपर्क : जयेश धुरी ९९६९६७६७८३

@@AUTHORINFO_V1@@