‘क्वीन ऑफ एशिया इन माईल’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020   
Total Views |

mansa_1  H x W:



भारतीय धावपटूंच्या यादीत हिमा दासनंतर सध्या जर कुठले नाव प्रकर्षाने घेतले जाते, तर ते म्हणजे पी. यु. चित्राचे! तेव्हा या ‘क्वीन ऑफ एशिया इन माईल’च्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा...



देशाच्या कानाकोपर्‍यातून खेळाडूंचा जन्म होतो. पण, त्यांच्या खेळाला वाव देण्यासाठी त्या खेळाडूची गुणवत्ता समाजासमोर येणेही गरजेचे असते. भारत सरकारने आरंभिलेल्या ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून भारताला असेही अव्वल कामगिरी करणारे खेळाडू लाभले आहेत. अगदी गल्लीबोळातून आलेल्या अनेक खेळाडूंनी भारतीय झेंडा अटकेपार रोवला. ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करुन भारताला सर्वाधिक पदे मिळवून दिली. भारतीय धावपटू हिमा दास ही सध्या ‘भारतीय धावपटूंचा चेहरा’ म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु, त्याचसोबत गेले काही वर्ष आणखी एक नाव पुढे येत आहे, ते म्हणजे पी. यु. चित्रा. चित्राने जून २०१९ मध्ये झालेल्या दोहा एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यानंतर तिला ’क्वीन ऑफएशिया इन माईल’ या नावाने ओळखू लागले. तिची कामगिरी आणि तिचा प्रवास हा खडतर आणि संघर्षपूर्ण होता.


पी
. यु. चित्रा हिचे संपूर्ण नाव पलककीझिल उन्नीकृष्णन चित्रा. तिचा जन्म ९ जून १९९५ मध्ये केरळमधील पालक्काड या जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. तिचे आईवडील वसंथा कुमारी आणि उन्नीकृष्णन हे दोघेही शेतमजूर होते. त्यांना एकूण चार अपत्ये, त्यापैकी चित्रा ही त्यांचे तिसरे अपत्य. घरखर्च भागवण्यासाठी तिच्या आईवडिलांना भरपूर संघर्ष करावा लागत होता. बरेच वेळा असेही घडले की, त्यांना काम मिळत नव्हते. त्यावेळेस ती रात्र त्यांना एखाद्याचे उरलेले अन्न खाऊन झोपावे लागत होते. तसेच, चित्राने बर्‍याच रात्री उपाशीपोटीही काढल्या. अशी परिस्थिती असताना खेळामध्ये सुधारणा होण्यासाठी अपेक्षित साधन तिच्याकडे नव्हते. पण, म्हणतात ना ’इच्छा तिथे मार्ग.’ या म्हणीप्रमाणे तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. चित्राचे शालेय शिक्षण चालू असताना केरळ क्रीडा परिषदेकडून दिवसाचे २५ रुपये मिळायचे, तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून तरुण खेळाडूंसाठी असणार्‍या योजनेतून तिला महिन्याचे ६२५ रुपये मिळायचे. याच रकमेवर तिने स्वतःचे मूलभूत प्रशिक्षण सुरू ठेवले. ती एक पदवीधर विद्यार्थिनी आहे. तिचे शालेय शिक्षण पलक्कड येथील मुंदूर उच्च माध्यमिक शाळेत गेले आहे. ’शारीरिक शिक्षा’ हा विषय तिने अभ्यासासाठी निवडला होता. या विषयाचा अभ्यास करताना तिची कमालीची एकाग्रता बघता आणि खेळाबद्दल तिची अभ्यासू वृत्ती बघता तिच्या सिजिन एन. एस. या प्रशिक्षकांनी तिला मदत केली.


हातात काही नसताना स्वतःचे वैशिष्ट्य ओळखून ती शालेय शिक्षण घेत छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत राहिली. यामध्ये तिचा पाय भक्कम होण्यास तिला मदत झाली. २०११ मध्ये तिला सरावादरम्यान जबर दुखापत झाली होती. यामधून तिची कारकीर्द संपते की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, जिद्द न सोडता या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायची तिची धमक तिला पुन्हा मैदानात घेऊन आली. गुंटूर येथे झालेल्या ‘नॅशनल सेंटर अ‍ॅथलेटिक मीट’मध्ये तिने एक रजतपदक पटकावले. त्यानंतर तुर्कमेनिस्तानमध्ये ५ व्हेनेशियाई इंडोर आणि मार्शल आर्ट्स गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये तिने ‘कालिकत विद्यापीठ अ‍ॅथलेटिक मीट’मध्ये १७ वर्ष जुना विक्रम स्वतःच्या नावावर केला. २०१३ मध्ये मिळालेल्या या बक्षिसाने तिचा आत्मविश्वास उंचावला आणि तिने धावपटू म्हणून स्वतःचा प्रवास चालूच ठेवला. शालेय वर्षात असताना तिने भाग घेतलेल्या केरळ जिल्ह्याच्या शालेय स्पर्धांच्या कामगिरीवर उत्तर प्रदेश सरकारने तिला टाटा नॅनो गाडी देऊन गौरविले होते.


पुढे चित्राने राज्य आणि राष्ट्रीय शालेय खेळांमध्ये १५०० मीटर
, ३००० मीटर, ५००० मीटर शर्यतींमध्ये सुवर्णपदकासह ‘क्रॉस कंट्री’मध्ये पदके जिंकली. २०१३च्या पहिल्या आशियाई अ‍ॅथलेटिकमध्ये ३००० मीटर शर्यतीत सुवर्णपदकदेखील स्वतःच्या नावावर केले. त्यानंतर आशियाई अ‍ॅथलेटिक स्पर्धेमध्ये तिने ४ मिनिटे व १४.५६ सेकंद वेळ नोंदवित सुवर्णयश मिळविले. चित्राचे हे सलग दुसरे सुवर्ण ठरले. तसेच, २०१७ मध्ये भुवनेश्वरला झालेल्या आशियाई स्पर्धेतही चित्राने सुवर्ण पटकावले होते. त्यावेळी चित्राने ४ मिनिटे व १७.९२ सेकंद वेळ नोंदविली होती. तिने २०१८ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले. मात्र, २०१९ मध्ये जूनमध्ये झालेल्या एशियन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावले. २०२० मध्ये टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिकमध्ये सर्व देशाचे लक्ष तिच्या कामगिरीकडे असेल. भारतासाठी तिच्या पदकाची मालिका अशीच सुरू राहील, अशी अपेक्षा सर्व भारतीय व्यक्त करत आहेत. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@