महिला कल्याणाची ‘सिद्धी’ : सिद्धी महिला कल्याणकारी संस्था

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020
Total Views |

DAYITVA_1  H x




लहान मुलाच्या सर्वात जवळ त्याची आई असते आणि तिचे जास्त प्रयत्न असतात ते मूल घडवण्यामागे... परंतु, पैशाअभावी किंवा अज्ञानामुळे काही महिला ते करू शकत नाहीत. म्हणून स्त्रियांना सक्षम करणे व त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या सर्वाचा विचार करून गरीब मुले व महिला यांसाठी ‘सिद्धी’ म्हणजे ‘प्रसिद्धी’ ही आपण म्हणू शकतो. ‘सिद्धी महिला कल्याणकारी संस्थे’ची स्थापना एप्रिल २०१६ रोजी करण्यात आली. नावाप्रमाणेच ही संस्था महिलांसाठी कार्यरत आहे. परंतु, गरीब मुले आणि शैक्षणिक कार्यातही या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात.



मी स्वत: एक शिक्षिका आहे. नित्याचा अनेक बालक-पालकांशी संपर्क होत असतो. बालकांशी आणि पालकांशी बोलताना एक लक्षात यायचे की, मुलांमध्ये अनेक गुण असतात. परंतु, ते पालकांना समजत नाहीत आणि प्रत्येक महिलेत काहीतरी कला असते. परंतु, घरगुती कामाव्यतिरिक्त त्यांच्यात काहीच गुण नाही, अशी त्यांची मानसिकता असते. ‘आम्ही गृहिणी आमची काय किंमत?’ अशीच मानसिकता त्यांची तयार होते. ही मानसिकता बदलून प्रत्येक स्त्री काहीतरी करू शकते. ही जागरुकता निर्माण करण्याचे कामही संस्था करते.


वस्तीपातळीवर काम करताना हेसुद्धा जाणवले की
, कित्येक आयाबायांकडे स्वत:चे ओळखपत्रही नाही. उद्या नवरा मेल्यावर सूनेने हक्क सांगू नये म्हणून कितीतरी घरी सुनांचे रेशनकार्डवर नावच टाकलेले नव्हते. तुम्ही कामधंदा करतच नाही किंवा केले तरी ते पैसे घरातच खर्च करायचे आहेत. त्यामुळे पैसे साठवणे वगैरे तुमच्यासाठी नाही. त्यामुळे बँक खातेही उघडू नका, असेच सरसकट सांगितलेले. आमच्या संस्थेने सर्वप्रथम संस्थेने अनेक महिलांची ओळख म्हणजे त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेतील खाते किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देऊन ती कागदपत्रे (डॉक्युमेंट्स) त्यांना तयार करून दिली. घरगुती भांडणे, प्रॉपर्टी संबंधातील वाद, सासू-सासर्‍यांकडून छळ अशा विविध अडचणीतील पीडित महिलांना मोफत वकील मिळवून देऊन त्यांना कायद्याने न्याय मिळवून दिला जातो. त्याचप्रमाणे, गेली चार वर्षे इंग्लिश स्पिकिंग कोर्स, ब्युटी पार्लर कोर्स, नृत्य, कराटे यांचे नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाते. चूल आणि मूल सांभाळत घरी बसूनही महिला पैसे कमावू शकतात. यासाठी त्यांना घरगुती कामे जसे शिवण येणार्‍यांना बीएनसी जॅकेट बनवणे तसेच वेस्ट मटेरियलपासून हार बनवणे, दिवाळीत पणत्या व उटणे बनवून पैसे कमावणे, त्यांनी केलेला फराळ तसेच इतर खाद्यपदार्थ संस्थेतर्फे विक्री करून त्याचे पैसे महिलांना दिले जातात. अशा प्रकारे त्यांना रोजगार मिळवून दिला जातो. महिलांना एकत्र करून त्यांचा विरंगुळा म्हणून हळदी-कुंकू समारंभ आयोजित केले जातात, ज्यात विधवा महिलांचाही समावेश असतो. वार्षिक सहल, महिला दिन यासारखे कार्यक्रम राबविले जातात. शैक्षणिक कार्यात यावर्षी उचललेले पाऊल म्हणजे ज्या मुलांना डोनेशन भरून इंग्रजी माध्यमाच्या शाळेते शिक्षण घेता येत नाही, त्या मुलांसाठी संस्थेतर्फे ज्युनिअर आणि सिनिअर केजी सुरू करण्यात आले व जवळ जवळ ५० मुलांचा एक वर्ग प्रस्थापित झाला.


मुंबईच्या उपनगरातील झोपडपट्ट्यांतील विद्यार्थ्यांचे एक वेगळेच जग आहे
. असे नाही की, त्यांच्यात कलागुण नाहीत. त्यांच्यात क्षमता नाही, पण कुठेतरी त्या क्षमतांना, कलागुणांना वाव मिळत नाही. या विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी आम्ही २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान मुलांच्या विविध स्पर्धा घेतो. ज्यामध्ये चित्रकला, संगीत, नृत्य, निबंध हस्तलिखित स्पर्धा यासारख्या स्पर्धांचा समावेश असतो. या दरम्यान मुलांना बक्षिसे व खाऊ वाटण्यात येतो. महिलांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी महिलांच्याही विविध स्पर्धा घेतल्या जातात, ज्यामध्ये गायन, चित्रकला, हस्ताक्षर, पाककला इत्यादी. तसेच सरकारकडून महिलांसाठी असलेल्या योजनांचीही माहिती दिली जाते. सॅनेटरी पॅडचे फायदे आणि तोटे त्याचे प्रशिक्षण, त्याचप्रमाणे ती स्वत: तयार करून त्याची विक्री संस्थेतर्फे करून त्याचे पैसे महिलांना मिळवून देण्याचा उपक्रमही संस्थेने यावर्षी सुरू केला आहे.


खरे तर अत्यंज स्तरातील महिलांचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत
. आजही तेच वास्तव आहे. पती ऐन तारूण्यात देवाघरी जातो. मग त्याच्या विधवेला मुलाबाळांना जगवण्यासाठी जीवाचे रान करावे लागते. मुलांना जगवतानाचा, शिकवतानाचा तिचा संघर्ष मोठा असतो. कर्ज काढणे, दिवस-रात्र राबराब राबणे असे करून ती महिला घर चालवते. पण तरीही आर्थिक तंगी तिचा पिच्छा सोडत नाही. अशा महिलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी ‘सिद्धी महिला कल्याणकारी संस्था’ विविध उपक्रम राबवते. जुन्या कपड्यांपासून पिशव्या शिवून त्या संस्थेतर्फे विकल्या जातात. त्यानुसार प्लास्टिक निर्मूलनास संस्था मदत करते. नवर्‍याच्या जाचास कंटाळून आत्महत्या करणार्‍या महिलेस संस्थेने सहकार्य केले. ती महिला आज स्वत:च्या पायावर उभी राहून आपली दोन मुले व सासू यांच्यासोबत गुण्यागोविंदाने नांदत आहे. कर्जबाजारी महिलांना घरी बसून रोजगार मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंद झळकत आहे. संस्था महिला दिन साजरा करते. पण आमच्या महिला दिनाची संकल्पना वेगळी आहे. कला, क्रीडा, साहित्य, समाज आणि राजकारण या क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्य करणारी महिला कौतुकास, आदरास पात्रच आहे. पण आमच्या संस्थेने असे ठरवले की, अनंत अडचणीला, कष्टाला तोंड देत घराला उभी करणारी गृहिणीही तितकीच यशस्वी आहे. समाजाच्या पटलावरची ती खरी नायिका आहे. त्यामुळे महिला दिनाला आम्ही ज्यांनी कठीण परिस्थितीतून सक्षमपणे आपल्या परिवाराचा सांभाळ केला आहे, त्या महिलांचा सन्मान करतो.


इथून पुढे संस्थेने सुरू केलेल्या शाळेचे वर्ग वाढवून माध्यमिकपर्यंत नेण्याची संस्थेची अपेक्षा आहे
. त्याचप्रमाणे महिलांसाठी ‘आरोग्यदायक योग’ वगैरेसारखे उपक्रम इथून पुढे सुरू करण्यात येणार आहेत. आता या संस्थेत संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे पुणे, नाशिक, कोकण यासारख्या विभागातील महिलांचाही सहभागी आहेत. संस्थेच्या सर्व उपक्रमांचा खर्च अध्यक्ष म्हणून मी आनंदाने करते आहे. पण त्यालाही मर्यादा येतात. संस्थेच्या कामाची व्याप्ती वाढवायची आहे. त्यामुळे सर्व समाजशील बांधवांना विनंती आहे की, तुम्ही संस्थेसाठी मार्गदर्शन सल्ला, वैयक्तिक वेळ आणि आर्थिक मदत जरूर करावी. कारण, हा जगन्नाथाचा रथ आहे, आपण सर्वांनी त्याला हातभार लावावा.

- स्मिता कवाडे

@@AUTHORINFO_V1@@