‘हायकमांड’ व्हाया ‘थोपटे’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020   
Total Views |

vedh_1  H x W:



चोर-लुटारूंसारखे तोंड बांधून दगडफेक करणे, महापुरुषांच्या नावाबाबत, पुतळ्याबाबत अति-अतिसंवेदनशील होत कायदा हातात घेणे, हे असले प्रकार राज्यात घडलेले म्हणजे घडवलेले. हे सगळे घडवणारे सूत्रकार हे जाणते-बिणते आहेत, ते ‘मास्टर्स ऑफ अ‍ॅक्टिंग’ आहेत. एकलव्याने गुरूकडून विद्या शिकावी, तसे महाराष्ट्राच्या राजकारणात बहुसंख्य आमदारांनी ही विद्या त्यांच्याकडून बेमालूमपणे शिकून घेतली. एकलव्याने गुरूला अंगठा कापून दिला, तर या गुरुवर्यांनीही शिष्यांच्या संवेदना कापून घेतल्या. त्यांची गुरूविद्या शिककूनच तर राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोडी मांडीला मांडी लावून बसू शकली. असो. गुरूसारखी विद्वत्ता बाळगून सत्तेवर झडप घालता येते, हे शिष्य वर्गाच्या लक्षात आले. मग त्यांची कॉपी करायला हे पुढे सरसावले आणि निर्ढावलेही. त्यांची आग लावून बाजूला व्हायचे याची कॉपी तर सर्रास शिष्यगण करू लागले. जसे काल संग्राम थोपटे या भोरच्या आमदारांना मंत्रिपद मिळणार नाही म्हणून त्यांच्या समर्थकांनी तोडफोड केली. कार्यकर्ते सॉलिड उन्मादात उतरले होते. घोळक्याने फिरत हा जमाव काँग्रेस भवनात दहशतच माजवत होता. यावर थोपटे यांची प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या गुरूवर्या जरी हायकमांड असल्या तरी त्यांनी मनाने गुरू वरले ते ‘जाणत्या’ सारखेच होते. थोपटे म्हणाले, “तीन टर्म आमदार झालो. नियमानुसार सगळे झाले पाहिजे, पण मी कार्यकर्त्यांना तोडफोड करायला सांगितली नाही. कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनाने हे सगळे केले.” थोडक्यात, तळ्यात मळ्यात बोलत त्यांनी ‘जाणत्यांचा’ कित्ता गिरवला. “मला मिळाले तर ठीक, नाहीतर जातीपातीच्या वणव्यात महाराष्ट्र अस्वस्थ करेन,” हीच शैली थोपट्यांच्या कार्यकर्त्यांनीही घेतली. फक्त या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र ऐवजी अस्वस्थ केले ते पुण्यातल्या ‘काँग्रेस भवन’ला. दुसरीकडे राजमाता, युवराज कॅब, ‘एनआरसी’वरून देशात अस्वस्थता पेरत आहेत. याच पक्षाचे आ. थोपटे. या थोपटेंच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींचा कित्ता गिरवत पुण्यातल्या ‘काँग्रेस भवना’मध्ये प्रात्यक्षिक दाखवून दिले. त्यांचे चुकले, तरी जसा राजा तशी प्रजा असते हे विसरायला नको. थोडक्यात, हायकमांड = आ. थोपटे = पुण्यातले तोडफोड कार्यकर्ते!


वारसदारांची मिरासदारी

समाजशास्त्रात नेत्याचे लक्षण किंवा गुणवत्ता अधोरेखित करताना वंशपरंपरागत सत्ता हस्तगत करणे हे वैशिष्ट्य सांगितले जाते. महाराष्ट्राने समाजशास्त्रातले हे विधान अगदीच मनावर घेतले. इतके की, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे याचा मुलगा, त्याची मुलगी, त्याचा पुतण्या, त्याचा नातू बस्स... या सगळ्यांचा ‘फॅमिली ड्रामा’ म्हणजे सत्ताकेंद्र झाले आहे. म्हणजे कसे की, वर्षा गायकवाड यांचे पिता एकनाथ गायकवाड, यशोमती ठाकूर यांचे पिता भैय्यासाहेब ठाकूर, अदिती तटकरे यांचे पिता सुनील तटकरे. या तीनही पित्यांनी वर्षानुवर्षे सत्ता उपभोगलेली. गरिबांच्या लेकीला वारसाहक्काने दु:ख मिळते, तसे या तीनही पित्यांच्या मुलींना वारसाहक्काने राजेपद मिळाले. हे त्रिवार अखंड सत्य जाणत प्रणिती शिंदेंना मंत्री का बनवले नाही, म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींना म्हणे चक्क रक्ताने पत्र लिहिले. त्यांचेही म्हणणे बरोबरच आहे. इतक्या वारसदारांना नेतेपणाचा वारसा जपण्यासाठी मंत्रिमंडळात घेतले तर सुशीलकुमार शिंदेंची कन्या प्रणिती यांनाही मंत्रिपद द्यायचेच होते. घराणेशाहीला आणखीन चार चाँद लागले असते. ही कसर का बरं कमी ठेवली? सध्याच्या पुरोगामी महाराष्ट्रात ‘आम’ कार्यकर्त्यांचे ‘आम’ म्हणजे आंब्यासारखे लोणचेच घातले गेले हे सत्यच आहे. पण काय करणार? हे काही आत्ताचेच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात १०-१२ घराणी अशी आहेत की, तीच सत्तास्थानी असणार ही काळ्या दगडावरची रेघ. काल ते काँग्रेस पक्षात असतील तर आज त्यांचे वारसदार भाजप किंवा शिवसेनेमध्ये असणार. पण सत्तास्थानी असणार त्याच घराण्यातले वंशज. महाराष्ट्राच्या सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात ही ठसठस आहे. पण मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन आयुष्याचे उजाड माळरान होण्याच्या भीतीने सगळेच चिडीचूप. अर्थात, सत्तास्थान विशिष्ट घराण्यात एकवटले, याला आक्षेप नाही. पण याचा अर्थ या घराण्यांव्यतिरिक्त कुणाही सामान्यांच्या घरात नेतृत्व जन्मूच शकत नाही? हा जो समज दृढ होत चालला आहे, त्याला पायबंद घालायलाच हवा. येणार्‍या काळात महाराष्ट्राची पुरोगामी जनता याबाबत जरूर विचार करेल.

@@AUTHORINFO_V1@@