तेज बुद्धिमत्तेची मास्टर हंपी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020   
Total Views |

mansa_1  H x W:




मुलाच्या जन्मामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर बुद्धिबळाच्या पटावर पुनरागमन केल्यानंतर पहिली महिला वर्ल्ड चॅम्पियनचा बहुमान मिळवणार्‍या कोनेरू हंपीविषयी...


लहानपणी आपल्या बैठ्या खेळांमध्ये ‘सापशिडी’, ‘लुडो’, ‘व्यापार’ या खेळांसोबतच आवर्जून ‘बुद्धिबळा’चा समावेश होताच. क्रिकेटसारख्या झगमगाटाने भरलेल्या खेळामध्ये ज्या दृष्टीने पाहिले जाते, त्याप्रमाणे बुद्धिबळाकडे पाहिले जात नाही. यामध्ये कुठलाही ‘ग्लॅमर’ नाही, तर कुठला ‘स्टार सेलिब्रेटी’ नाही. तरीही, भारताने बुद्धिबळासारख्या खेळामध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसा इतिहास पहिला तर बुद्धिबळ खेळाच्या शोधाचे श्रेयही भारतालाच जाते. कारण, प्राचीन काळापासून हा खेळाची पंरपरा आजही कायम आहे. तरीही, भारताला या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करायला काही काळ गेला. परंतु, विश्वनाथन आनंदच्या जगज्जेतेपदामुळे बुद्धिबळात भारताला एक जागतिक ओळख मिळाली. त्यानंतर अजून एक नाव चर्चेत आले ते म्हणजे, आंध्रातील खेळाडू कोनेरू हंपीचे...


३१ मार्च
, १९८७ साली आंध्रप्रदेशातील गुडीवाडा येथे एका सामान्य घरात कोनेरू हंपीचा जन्म झाला. वडील कोनेरू अशोक आणि आई लाथा अशोक यांनी तिचे नाव ‘हंपी’ ठेवले. हे नाव त्यांनी ’चॅम्पियन’ या अर्थाने ठेवले होते. लहानपणापासूनच तिला बुद्धिबळाचे आकर्षण होते. अगदी पाचव्या वर्षांपासून तिने बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. काही महान खेळाडूंच्या रक्तामध्ये पहिल्यापासूनच काही प्रतिभा भिनलेल्या असतात. तिला बालपणापासूनच आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या बळावर याच खेळात यशाचा मोठा पल्ला गाठण्याचे बळ मिळाले. वडील अशोक हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्याचबरोबर त्यांनी १९८५मध्ये दक्षिण भारतीय बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यांच्या मौलिक मार्गदर्शनामुळे तिच्यातील बुद्धिमत्तेला मोठी चालना मिळाली. तिचे वडील तिला सुरुवातीला घरीच तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत होते. या खेळातील डावपेच आणि कुशल चाली तिने अल्पवाधीत आत्मसात केल्या. तिच्यामधील हीच प्रगल्भता वडिलांनी हेरली. त्यांनी यासाठी प्राध्यापकाची मोठ्या पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. वडिलांच्या याच त्यागाचे महत्त्व लक्षात घेऊन तिनेही यशाचे शिखर गाठण्यासाठीची कुठलीही कसर सोडली नाही. यातूनच तिने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. प्रशिक्षण आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर लहान वयात तिने राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद पटकावले. १९९५ मध्ये आठ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तिने पहिले विजेतेपद पटकावले. त्यानंतर तिने जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तीनवेळा सुवर्णपदक पटकावले. १९९७ मध्ये १० वर्षांखालील वयोगटामध्ये, १९९८ मध्ये १२ वर्षांखालील वयोगटामध्ये आणि २००० मध्ये १४ वर्षांखालील वयोगटामध्ये तिने सुवर्णपदक पटकावले. १९९९ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या ‘आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धे’मध्ये तिने पाच मुलांशी स्पर्धा करत १२ वर्षांखालील वयोगटामध्ये विजेतेपद पटकावले. २००१ मध्ये कोनेरूने ‘वर्ल्ड ज्युनियर गर्ल्स चॅम्पियनशिप’ जिंकली. पुढील वर्षाच्या पर्वामध्ये तिने ‘झाओ झ्यु’सह प्रथम स्थान पटकावले. २००४ मध्ये झालेल्या ‘वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप’मध्येही तिने मुलांशी स्पर्धा करत उत्तम कामगिरी केली, पण यावेळी मात्र तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.


हंपीची मेहनत आणि खेळासाठी लागलेला तिचा कस यामुळे अपयशाला कुठेही न जुमानता तिने आपला खेळ चालू ठेवला
. तिने तीन वर्षं (२०००, २००२ आणि २००३) ब्रिटिश महिला स्पर्धा जिंकून एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. पुढे तिने दहावे आशियाई महिला वैयक्तिक चॅम्पियनशिप आणि भारतीय महिला अजिंक्यपद जिंकले. त्यानंतरही तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले. जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धांमध्ये तिने २००४, २००८ आणि २०१०मध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. ‘फिड वुमेन्स ग्रँड प्रिक्स’मध्ये तिने २००९-२०११च्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा भाग होता. यामध्ये तिला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर तिने २०११-१२, २०१३-२०१४ आणि २०१५-२०१६ या आवृत्तींमध्येही भाग घेतला. २०१५मध्ये चीनच्या चेंगदू येथे आयोजित जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत तिने वैयक्तिक कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर होता. २०१४ मध्ये दसरी अन्वेष यांच्याशी ती विवाहबद्ध झाली. काही काळानंतर त्यांना मूल झाले. परंतु, मुलाच्या जन्मानंतर तिने ‘ब्रेक’ घेतला होता. दोन वर्षांचा सरावामध्ये खंड पडला होता. मात्र, असे असूनही तिने पुनरागमनाच्या स्पर्धेमध्ये आपल्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवले. तिने २६०० ईएलओ गुण संपादन करण्याचा पराक्रम गाजवला. यासह तिच्या नावे हा गुणांचा पल्ला गाठणारी जगातील दुसरी महिला बुद्धिबळपटू होण्याचा विक्रमही नोंदवला. ३२ वर्षीय हंपीने आतापर्यंत चांगली कामगिरी करत खेळामध्ये सातत्यता दाखवली आहे. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा....!

@@AUTHORINFO_V1@@