आरेमधील मेट्रो कारशेडबाबत गैरसमजुती - परदेशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2019
Total Views |


 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गोरेगावच्या आरे वसाहतीमध्ये नियोजित असलेल्या मेट्रो-३ मार्गिकेच्या कार डेपोसंदर्भात समाजमनात गैरसमजुती पसरविण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सोमवारी मुंबईत एका चर्चासत्रात केले. 'एसएनडीटी' महिला विद्यापीठाकडून 'मेट्रोचा पर्यावरणीय परिणाम' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात परदेशी यांच्यासोबत 'मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळा'च्या (एमएमआरसीएल) संचालिका अश्विनी भिडे, 'वनशक्ती' या पर्यावरणीय संस्थेचे डी. स्टॅलिन आणि वृक्षप्रेमी झोरू बाथेना सहभागी झाले होते. आरेतील कारशेडच्या जागेसंदर्भात पर्यावरणवाद्यांकडून सादर करण्यात येणारी कागदपत्रे महत्त्वाची असली, तरी त्यांची सत्यता पडताळणे आवश्यक असल्याचे यावेळी परदेशी यांनी पर्यावरणवाद्यांसमोरच ठणकावून सांगितले.

 
 

गेल्या काही दिवसांपासून आरे वसाहतीत नियोजित असलेल्या 'मेट्रो-३च्या कारशेडचा मुद्दा चर्चेत आला आहे. महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने कारशेडकरिता २,७०० झाडांना तोडण्याचा निर्णय दिल्यापासून वृक्षप्रेमींनी ठिकठिकाणी आंदोलनाला सुुरुवात केली आहे. या मुद्दाला अनुसरून 'एसएनडीटी' विद्यापीठाने मेट्रोच्या पर्यावरणीय परिणामांबाबत चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात प्रथमच मेट्रो प्रकल्पातील अधिकारी आणि आरेतील कारशेडला विरोध करणारे पर्यावरणवादी एकमेकांसमोर आले. यावेळी पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकांना पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि 'एमएमआरसीएल'च्या संचालिका अश्विनी भिडे यांनी उत्तर देण्याबरोबरच 'एसएनडीटी'च्या विद्यार्थिनींनी विचारलेल्या कारशेडच्या संदर्भातील प्रश्नांचे निराकरण केले. यावेळी डी. स्टॅलिन व झोरू बाथेना या दोघांनी संयुक्तरित्या कारशेडसंदर्भात कांजूरमार्गच्या जागेचा पर्याय, आरे हे जंगल असल्याचा दावा आणि कारशेडच्या भविष्यातील वापर, असे अनेक प्रश्न उपस्थित केले.

 
 

मुंबईच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ ३० टक्के जागा ही विकासाकरिता उपलब्ध असून आरेची जागा ही मुळातच दुग्धविकास विभागाची म्हणजे शासनाची असल्याचे परदेशी यांनी सांगितले. दुग्धविकास विभागाने या जागा कुरण वाढवून गुरांना चरण्यासाठी मोकळ्या ठेवल्या. त्यामुळे त्या ठिकाणी दिसणारी हिरवळ जंगल कशी असू शकते?, असा सवाल परदेशी यांनी पर्यावरणवाद्यांना विचारला, तर कारशेडच्या जागेचा वापर कोणत्याही प्रकारे व्यावसायिकरणासाठी करणार नसून उलटपक्षी त्यामधील ५ हेक्टर जागेवरील वृक्ष अबाधित ठेवणार असल्याचे स्पष्टीकरण 'एमएमआरसीएल'च्या संचालिका अश्विनी भिडे यांनी दिले. तसेच पर्यावरणवाद्यांकडून उपस्थित केला जाणाऱ्या मिठी नदीच्या  पूरस्थितीच्या मुद्यावर बोलताना भिडे यांनी सांगितले की, 'कारशेडच्या जागेवर मिठीच्या पुराचे पाणी येते, याविषयी दुमत नाही. मात्र त्यासाठी कारशेडच्या ७५ टक्के क्षेत्राचे सिमेंटीकरण करण्यात येणार नाही. याबरोबरच पुराचे पाणी बाहेर काढण्यासाठी पर्जन्यजल निस्सारण यंत्रणा उभारण्यात येणार आहे'. तसेच सध्या कारशेडच्या जागेपैकी १७ टक्के क्षेत्र हे वृक्षांनी आच्छादलेले असून उर्वरित क्षेत्रावर गवत असल्याचे त्या म्हणाल्या. सरतेशेवटी कारशेड उभारण्यासाठी कांजूरमार्ग येथील पर्यायी जागेबाबत तांत्रिक अडचणी असल्याने आरेमध्येच कारशेड उभारावे लागणार असून कारशेडशिवाय मेट्रो धावू शकणार नाही, अशी स्पष्टोक्ती भिडे यांनी दिली. 

@@AUTHORINFO_V1@@