शरीराला 'जंक' करणारे 'फूड'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2019   
Total Views |



ब्रिटनमधील एका १७ वर्षीय मुलाची दृष्टी सातत्याने केवळ आणि केवळ जंक फूड खाण्याने गेली. इतकेच नव्हे तर तो बहिराही झाला. असे का झाले असेल? तर हा मुलगा १० वर्षांपासून फक्त वेफर्स, बर्गर, फ्रेंच फ्राईज, सॉसव्यतिरिक्त कधीकधी हॅम आणि व्हाइट ब्रेडच खात होता. आणि...


कोणी काय खावे, काय प्यावे, हा खरंतर ज्याचा-त्याचा वैयक्तिक आणि आवडी-निवडीचा प्रश्न. मानवाच्या अस्तित्वापासून ते आतापर्यंत लाखो खाद्यपदार्थांचा शोधही त्याने लावला. अर्थातच, हे बहुतांशी खाद्यपदार्थ मानवी अधिवासाच्या परिसरातील उपलब्ध धान्य, भाज्या, प्राणिज उत्पादनांपासून तयार केलेले होते. सोबतच ज्या वस्तू आपल्या भागात मिळत नाहीत, त्या इतर ठिकाणांहून आयात करून आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याचे कामही माणसाने केले. तरीही मानवाचा आहार हा तो ज्या प्रदेशात राहतो, तिथल्या हवामानानुरूप मानवेल, पचेल असाच होता. परंतु, जसजसे नवनवीन वैज्ञानिक-तांत्रिक शोध लागत गेले, तसतसे माणसाचे माहितीचे आदानप्रदानही होऊ लागले. त्यातूनच विविध प्रदेशांतील खाद्यपदार्थांची ओळख माणसाला झाली व ते स्वत: करून पाहण्याचे, खाण्याचे कामही सुरू झाले. आता तर इंटरनेट, युट्युब, ब्लॉगच्या माध्यमातून सातासमुद्रापलीकडची एखादी पाककृती गावखेड्यातील व्यक्तीही करताना, त्यात आपल्या परिसरातील वस्तूंचा वापर करतानाही पाहायला मिळतात. दुसरीकडे भारतात आयुर्वेदाने ऋतुमानाप्रमाणे आहार-विहाराच्या सवयी असाव्यात, हे सांगितले आहेच. उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात आणि वात, पित्त व कफ प्रवृत्तीनुसार कोणते पदार्थ कधी, कसे खायला हवेत, खाऊ नयेत, हेही आयुर्वेद सांगते. आपल्या अवाढव्य देशातील, निरनिराळ्या प्रांतातील वेगवेगळे खाद्यपदार्थ आयुर्वेदाच्या नियमांचे पालन करतानाही त्यामुळेच दिसते. मात्र, परदेशातल्या-युरोपातल्या माणसांचे काय?

 

भारताबाहेर बहुसंख्य ठिकाणी पाव-बिस्किटांसह जंक फूड मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. नव्या युगात त्याचे भारतातही आगमन झाले आणि जंक फूडने अल्पावधीत आपल्याकडेही लोकप्रियता गाठली. पण, जंक फूड खाणे आरोग्यासाठी अपायकारक असल्याच्या सूचनाही त्यापाठोपाठ दिल्या जाऊ लागल्या. कारण, जंक फूडमुळे मानवी शरीरावर भयानक परिणाम होतात व त्यातूनच लठ्ठपणा, शरीरातील चरबी वाढणे, उच्च रक्तदाब, मधुमेह वगैरे वगैरे आजारांना आपसूक आमंत्रण मिळते. या अनुषंगाने नुकतीच ब्रिटनमधील एक घटना समोर आली व त्यातून वर उल्लेख केलेले विकारधोके सत्य असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. ब्रिटनमधील एका १७ वर्षीय मुलाची दृष्टी सातत्याने केवळ आणि केवळ जंक फूड खाण्याने गेली. इतकेच नव्हे तर तो बहिराही झाला. असे का झाले असेल? तर हा मुलगा १० वर्षांपासून फक्त वेफर्स, बर्गर, फ्रेंच फ्राईज, सॉसव्यतिरिक्त कधीकधी हॅम आणि व्हाइट ब्रेडच खात होता. पोषणमूल्य अजिबात नसलेले हे पदार्थ खाल्ल्याने तो कुपोषित झाला व त्याच्या याच सवयीने त्याला दृष्टीहीन आणि बहिरे केले. मुलाच्या आईनेही आपल्या लाडक्याच्या सवयी सांगितल्या. आपला मुलगा सात वर्षांचा असल्यापासूनच नेहमीच्या खाद्यपदार्थांऐवजी केवळ जंक फूड खाऊ लागला. फळे आणि भाज्यांचे रंग-रूप आवडत नसल्याने तो त्यापासून तयार केलेल्या पदार्थांना तोंडही लावत नसे. दरम्यान, या मुलाला ब्रिटनमधील एका रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिथे त्याच्यावर उपचारही सुरू आहेत. ब्रिस्टल चिल्ड्रन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मात्र जंक फूडमुळे झालेला हा पहिलाच प्रकार असल्याचे म्हटले.

 

डॉक्टर एटन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षानुवर्षे केवळ जंक फूडचे सेवन केल्यामुळे त्याला 'अवॉइडेट-रिस्ट्रिक्टिव फूड इंटेक डिसऑर्डर' हा विकार झाला. हा विकार झालेल्या लोकांना विशिष्ट रंग-रूप, गंध, चवीचे पदार्थ बिल्कुल आवडत नाहीत. डॉ. एटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या शरीरात 'ब-१२' या जीवनसत्त्वाचे प्रमाण अतिशय कमी झाले. सोबतच तांबे, सेलेनियम या खनिजांची शरीरातील पातळीही खालावली. परिणामी, डोळ्यांना मस्तकाशी जोडणाऱ्या नसांना इजा झाली. सोबतच प्रक्रियायुक्त पदार्थ खाल्ल्याने साखर आणि कर्बोदकांच्या अधिक्क्यामुळे श्रवण क्षमतेवर विपरित परिणाम झाला आणि हाडेदेखील दुर्बल झाली. म्हणूनच अशाप्रकारचे दुखणे सोबतीला राहू नये अशी जर आपली इच्छा असेल, तर जंक फूडचा अतिवापर टाळलाच पाहिजे. आपल्या देशातही वर उल्लेखलेल्या जंक फूडबरोबरच इतरही अनेक प्रकारचे पदार्थ सर्रास खाल्ले जातात, त्याचे प्रमाणही कमी केले पाहिजे; अन्यथा कोणता तरी आजार पाठीशी लागलाच म्हणून समजा!

@@AUTHORINFO_V1@@