दिव्यासारखे जळणे हेच ध्येय...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2019   
Total Views |


 


जेबा पिंपरी, बीडचा मुलगा आज देशात, समाजात 'अंत्योदय'चा ध्यास घेत कार्यरत आहे. समरसता हाच श्वास मानून जगणारे आणि कार्य करणारे रमेश पांडव यांच्याविषयी...


"अहो न्या. कोळसे-पाटील तुम्ही मनुवादी आहात आणि आम्ही संविधानवादी आहोत. काय हो, कुमार सप्तर्षीजी, एस. एम. जोशी, नंबुद्रीपाद वगैरे वगैरे ब्राह्मण काय संघात आहेत? मग एकटा रा. स्व. संघच भटाब्राह्मणांचा कसा? इथे तर जातपात विचारलीही जात नाही," असे त्या व्यक्तीने म्हटल्याबरोबर कोळसे-पाटील म्हणाले, "मग रा. स्व. संघात आणि आमच्यात भेद कुठे आहे?" यावर 'ती' व्यक्ती म्हणाली, "मग या की, तुमचे स्वागत आहे रा. स्व. संघात." यावर कोळसे-पाटील आणि सप्तर्षी दोघेही हतबल झाले. त्या व्यक्तीने या दोघाही तथाकथित्त पुरोगाम्यांना निरुत्तर केले. महाराष्ट्रभर आपल्या आक्रमक, तिरकस शैलीसाठी प्रसिद्ध असलेली ही व्यक्ती आहे रमेश माधवराव पांडव. १९६५ पासून रा. स्व. संघाच्या सायंशाखेचे प्रमुख ते आता रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय समरसता गतविधीचे सदस्य असलेले रमेश यांच्या विचारांचा पाया निखळ रा. स्व. संघाच्या 'अंत्योदय'वर आधारित आहे. मूळ गाव जेबा पिंपरी, जिल्हा बीडचे असलेले रमेश पांडव यांनी 'वॉटर शेड मॅनेजमेंट मॉडेल ऑफ अपलिफ्टमेंट ऑफ उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट' या विषयात 'डॉक्टरेट' केली आहे. तसेच 'मास्टर ऑफ इंजिनिअरिंग' त्यांनी रूरकी आयआयटी येथून केले आहे.

 

कोणत्याही घटनेकडे उदार, सहिष्णू आणि समरसतेने पाहण्याचा दृष्टिकोन त्यांना जन्मजातच मिळाला. कारण, त्यांचे वडील माधवराव हे तलाठी, तर आई गोदावरी गृहिणी. १९६०च्या पूर्वीच्या दशकात पांडव यांच्या घराच्या ओसरीवर गावाकुसाबाहेरचे समाजबांधव येत असत. त्यापैकी मातंग समाजाच्या 'लाली' नावाच्या महिलेशी गोदावरीबाईंची जिवलग मैत्री. समाजाच्या गावाच्या तत्कालीन स्पृश्य-अस्पृश्यतेचे कडक पाश होतेच. पण, त्याही परिस्थितीत गोदावरीबाई लहानग्या रमेशकडे छोट्या डब्यात भाजी, भाकरी किंवा काही विशेष पदार्थ केले असतील तर ते घेऊन, मागील दाराने लालीच्या घरी पाठवत. लाली यांचे घर गावाच्या बाहेरच. त्यामुळे जातिभेदाची विषवल्ली रमेश पांडव यांच्या मनात कधीही रूजली नाही. चौथीपर्यंत गावच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर रमेश औरंगाबादला मोठ्या भावासोबत राहायला गेले. येथे शिकत असतानाच त्यांचा संघाशी परिचय आला. पुढे आठवीनंतर ते अंबेजोगाई, बीडमध्ये शिकायला गेले. तिथे ते एकटेच राहत. तिथे त्यांचा संबंध सेवादलाशी आला. तिथे ते शाहिरी करत. त्यांची शाहिरी पाहून गावातला हिंदूविजय कोथळे नावाच्या व्यक्तीने त्यांना विचारले, "तू मल्लखांब, कुस्ती वगैरे खेळशील का?" रमेश त्या व्यक्तीसोबत मल्लखांब, कुस्ती शिकायला जात. हिंदूविजय हे रमेश यांच्यामुळे सेवादलामध्ये शाहिरीचाही ठेका धरू लागले. दोन-तीन वर्षे गेली आणि हिंदूविजय यांनी रमेश यांना सांगितले की, "गावातच संघाची शाखा चालते. रमेश शाखेत जाऊ लागले. तिथे हिंदूविजय यांनी रमेश यांना मुख्यशिक्षक केले. रमेश यांच्यासारखा होतकरू हुशार मुलगा गावात नवखा आहे. त्याला सोबत, मार्गदर्शन करताना हिंदूविजय यांनी रमेशला कधीही जबरदस्ती केली नाही की तू संघाच्या शाखेत चल." हिंदूविजय या संघस्वयंसेवकाची चिकाटी मान्य करायलाच हवी. इथेच भारत धर्मराव, शरद हेबाळकर, अप्पा कासार यांच्यासारखे संघविचारांचे मार्गदर्शक रमेश यांना लाभले.

 

या परिस्थितीमध्ये रमेश यांनी शिकता शिकताच संघाच्या सायंशाखेचे १२ वर्षे मुख्य शिक्षक म्हणून जबाबदारी होती. नेमक्या या शाखा गावाकुसाबाहेर, सेवावस्तीच्या बाजूला असत. रमेश प्रमुख शिक्षक असताना त्यांच्या शाखेत एक मुलगा यायचा. त्याला एक हात नव्हता. रमेश एक दिवशी त्याच्या घरी गेले, पालकांना भेटावे म्हणून. रमेश झोपडीत जाणार इतक्यात एक आवाज आला, "जी आत येऊ नका. माझ्या अंगावर कपडे न्हायती." त्या माऊलीला घालायला बोटभर चिंधीही नव्हती. पती वारलेला. मुलगा लहान. अंगावर घालायला कपडे नाहीत म्हणून ती रोजीरोटीसाठी घराबाहेरही पडू शकत नव्हती. या घटनेमुळे दहावीमध्ये शिकत असणार्‍या रमेश यांचे मन अंतर्बाह्य बदलून गेले. शाखेत अंत्योदय, देश समाजबांधवासाठी झटायला सांगतात. समाजाच्या अंतीम स्तराला माणूसपण लाभले पाहिजे, हा ध्यास त्यांच्या मनाने घेतला. त्यामुळेच की काय, १९८३ पासून ते सामाजिक समरसता मंचाचे जबाबदारीपूर्वक काम करत आहेत. पहिल्यांदा जेबा पिंपरी खेड्यातून औरंगाबाद शहरात गेलेल्या रमेश यांना मातीशिवायही जमीन असते, हे पहिल्यांदा कळले होते. सिमेंटच्या फरशीवर चालताना त्यांना जादू वाटत होती. तेच रमेश आज जगभर फिरतात. पर्यावरण, जलसंवर्धन, भारतीय जीवन, योगविद्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य यावर जगभरात बुद्धिवादी आणि कार्यशील व्यक्तींना मार्गदर्शन करतात. राज्यातील डझनभर विद्यापीठांवर 'मान्यवर' म्हणून विद्यापीठांमध्ये त्यांना सन्मानाने आमंत्रण दिले जाते. दीनदयाळ संशोधन केंद्र, दिल्ली, तसेच योगविद्या गुरुकुल केंद्र, नाशिक यांसारख्या संस्थांचीही जबाबदारी ते सांभाळत आहेत. ते गारखेडा आर्य समाजाचे सहप्रधानही आहेत. त्या माध्यमातून त्यांनी ९०० आंतरजातीय विवाहही लावले आहेत. सर्व समाजाला मंदिर प्रवेश मिळावा, यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. त्यात त्यांना मराठवाडा ग्रामीण भागात यशही आले आहे. जातीअंतासाठी त्यांनी हे कार्य सुरू केले आहे. रमेश पांडव म्हणतात, "भारतात माझा जन्म झाला हे माझे भाग्यच आहे. त्यामुळे माझ्या समाजबांधवासाठी अंत्योदय हाच माझा ध्यास आहे, जो मला रा. स्व. संघाने दिला. त्यासाठी मला दिव्यासारखे जळत राहायचे आहे."

@@AUTHORINFO_V1@@