महाराष्ट्राच्या पर्यटनाला झळाळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2019
Total Views |



पर्यटन विभागामार्फत देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्रात आकर्षित करून येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र हे पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन ठरावे, यादृष्टीने राज्य शासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्याविषयी सविस्तर...


आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पर्यटन विभाग आणि एमटीडीसीच्या वतीने मुंबई येथे पहिला आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव पर्यटकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. इंडोनेशिया, फिलीपाईन्स, कंबोडिया आणि भारतातील कलाकारांनी चार दिवस चाललेल्या या महोत्सवात रामायणाचे अनोख्या स्वरूपात सादरीकरण केले. नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रामायणातील विविध प्रसंगांचे सादरीकरण करून त्यांनी पर्यटकांना मंत्रमुग्ध केले. या महोत्सवास देश - विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. देशातील संस्कृती जगभरात पोहोचविणे आणि त्या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याचा या महोत्सवाचा उद्देश होता. राज्य शासनामार्फत यंदा त्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. आता दरवर्षी हा महोत्सव साजरा करण्याचा शासनाचा मानस आहे.

 

प्रतापगडावर होणार रोप वे

छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोहोचण्यासाठी जावळी गाव (ता. महाबळेश्वर) ते प्रतापगड असा रोपवे होणार आहे. पर्यटन धोरण २०१६ अंतर्गत या रोपवे प्रकल्पाला विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर पर्यटकांना किल्ले प्रतापगडावर जाणे सोपे होणार आहे. हा रोपवे जावळी गाव (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथून सुरू होणार आहे. जावळी गाव ते लँडविक पॉईंट तसेच प्रतापगड असा हा ५.६ किमी लांबीचा विशाल रोपवे प्रकल्प असेल. राज्यातील गडकोट किल्ले संवर्धनासाठी शासन व्यापक प्रयत्न करीत आहे. प्रतापगडावर होणारा रोपवे प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प असेल. या रोपवेमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवात भर पडणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार असून छत्रपती शिवरायांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

 

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावास ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव (तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) या ऐतिहासिक स्थळास आता ’ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती घेण्यासाठी त्यांचे जन्मगाव असलेल्या मौजे नायगाव या ठिकाणास विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक सहली वर्षभर भेट देत असतात. या ठिकाणास दरवर्षी ५ लाखांपेक्षा अधिक पर्यटक भेट देतात. ही पार्श्वभूमी विचारात घेऊन यापूर्वी ’क’ वर्गात असणार्‍या या पर्यटनस्थळास आता ’ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.

 

जर्मन पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जर्मनीतील कार्ल्सरुह येथे नुकत्याच झालेल्या इंडियन समर डेज फेस्टिवलमध्ये महाराष्ट्राच्या चमूने सहभागी होत विविध कला आणि संस्कृतींचे सादरीकरण केले आणि महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहिती युरोपियन देशांपर्यंत पोहोचविण्यात आली. या महोत्सवात महाराष्ट्र दालन उभारून सहभाग घेण्यात आला. महोत्सवात महाराष्ट्रातील समुद्रकिनारे, वन्य पर्यटन, साहसी पर्यटन, धार्मिक पर्यटनस्थळे, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, जागतिक वारसा स्थळे, पारंपरिक सण (गुढीपाडवा), महाराष्ट्रातील पारंपरिक हस्तकला (पैठणी), पारंपरिक वेशभूषा (पगडी, फेटे, गांधी टोपी, जिरेटोप) व महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, पारंपरिक नृत्ये यांचे प्रदर्शन करण्यात आले. महोत्सवात जर्मन व भारतीय पर्यटकांनी महाराष्ट्र दालनाला मोठ्या संख्येने भेटी देऊन महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, कला-संस्कृतींची ओळख करून घेतली व खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला.

 

राज्याचे पर्यटन धोरण जाहीर

२०१६ मध्ये महाराष्ट्राचे स्वतंत्र पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्राला २०२५ पर्यंत जगातील अग्रगण्य पर्यटनस्थळ बनवून आर्थिक विकासाला चालना देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या धोरणाचे मुख्य लक्ष्य आहे. या धोरणानुसार चित्रपट पर्यटन, ग्रामीण आणि कृषी पर्यटन, वारसा पर्यटन, समुद्रकिनारा (coastal)पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, शाश्वत पर्यटन, कॅरॅव्हॅन पर्यटन, धार्मिक पर्यटन, किल्ले मालिका पर्यटन, क्रुझ पर्यटन, खाद्य पर्यटन, निसर्ग पर्यटन, व्याघ्र निसर्ग पर्यटन, शैक्षणिक पर्यटन, हिलस्टेशन पर्यटन, थीम पार्क पर्यटन, साहसी पर्यटन इत्यादींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पर्यटन धोरण २०१६ अंतर्गत राज्यात सहा विशाल तथा अतिविशाल पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. यातून ४ हजार, ७२८ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून साधारण ४ हजार, १८९ इतकी थेट रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात मागील पाच वर्षांत रायगड किल्ला व परिसर, श्री क्षेत्र निरानृसिंहपूर (पुणे), म्हैसमाळ-वेरुळ-खुलताबाद (औरंगाबाद), माहुरगड (नांदेड), एलिफंटा, लोणार सरोवर (बुलढाणा), माता जिजाऊ जन्मस्थळ (सिंदखेडराजा, बुलडाणा) या पर्यटनस्थळांच्या १ हजार, ७२७ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. प्राथमिक टप्प्यात त्यापैकी १०२ कोटी रुपयांचा निधी वितरितही करण्यात आला आहे.

 

देश-विदेशातील कंपन्यांबरोबर सामंजस्य करार

देशातील आणि परदेशातील पर्यटकांचा राज्यात ओघ वाढून पर्यटनाला चालना मिळावी आणि विमान कंपन्यांच्या नेटवर्कचा फायदा मिळावा यासाठी ’इतेहाद’ या विमान वाहतूक कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत. याबरोबरच एअर बीएनबी या कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. ही कंपनी देश-विदेशातील पर्यटकांना एलिफंटा लेणी परिसरात होम स्टे सुविधा उपलब्ध करून देत आहे. ही कंपनी आता आपला विस्तार राज्याच्या इतर भागातही वाढवणार आहे. मुंबईतील पर्यटन व्यवसायाला चालना देणे तसेच मुंबईत येणार्‍या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आश्वासित, सुरक्षित आणि खात्रीची वाहतूकव्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एमटीडीसी व ओला टॅक्सी कंपनी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. होम डायनिंग पर्यटनासही चालना देण्यात येत आहे. यासाठी कुलाबा (मुंबई) येथील ‘द बोहरी किचन’ सारख्या होम डायनिंग उपक्रमांसमवेत चर्चा करण्यात येत आहे. राज्यातील गडकिल्ल्यांची स्वच्छता, डागडुजी आदी कामे रोजगार हमी योजनेमधून करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत राज्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी मागील ५ वर्षांत २८३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

एलिफंटा महोत्सव, चेतक महोत्सव

एलिफंटा लेणी परिसर हा मुंबईच्या पर्यटन वैभवातील महत्त्वाचे ठिकाण आहे. या परिसरात एलिफंटा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मागील काळात बंद पडलेला हा महोत्सव राज्य शासनामार्फत पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या लेण्यांमधील वास्तु आणि शिल्पकला देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. सारंगखेडा (ता. शहादा, जि. नंदूरबार) येथे चेतक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. जुनी परंपरा असलेल्या या महोत्सवास व्यापक स्वरूप देण्यात यश आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने देश-विदेशातील पर्यटक या भागात आकर्षित होत असून स्थानिक लोककला, हस्तकला, खाद्यसंस्कृती आणि या भागातील पर्यटनास मोठी चालना मिळत आहे. नाशिक येथील वाईन फेस्टिवललाही पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 

द्राक्ष आणि आंबा महोत्सव

जुन्नर येथील गोळेगाव (लेण्याद्री) येथे द्राक्ष महोत्सव (Grape Festival) आणि आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. गुजरात, राजस्थानसहराज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, अलिबाग, औरंगाबाद आदी शहरातील पर्यटकांनी भेट देऊन ग्रामीण आणि कृषी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. शहरी भागातील नागरिकांना आणि विशेषत: तरुण मुले, विद्यार्थी यांना गावाकडील पर्यटनात तसेच शेती-शिवाराच्या पर्यटनात मोठा रस असून त्याचा उपयोग ग्रामीण आणि कृषी पर्यटन विकासासाठी केला जाईल. शहरातील दगदग आणि धावपळीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा मिळण्याच्या दृष्टीने शहरी भागातील लोकांचा ग्राम आणि कृषी पर्यटनास मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातून पर्यटन विकासाबरोबर शेतकर्‍यांना उत्पन्नही मिळत आहे.

 

केळी, डाळिंब, हुरडा आणि गुळ महोत्सव

द्राक्ष आणि आंबा महोत्सवाचे यश पाहता आता राज्याच्या विविध भागांत म्हणजे जळगाव भागात केळी महोत्सव, विदर्भात संत्रा महोत्सव, सांगोला (जि. सोलापूर) भागात डाळिंब महोत्सव, ज्वारीचे उत्पादन होणार्‍या मराठवाडा, सोलापूर भागात हुर्डा महोत्सव, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात गुळ महोत्सव, कोकणात आंबा महोत्सव, काजू महोत्सव, जुन्नर येथे डाळिंब महोत्सव तसेच मलबेरी महोत्सव यांसारखे पर्यटन महोत्सव स्थानिकांच्या सहभागातून करण्याचा एमटीडीसीचा मानस आहे. शहरी भागातील पर्यटकांना ग्रामीण आणि कृषी पर्यटनाकडे आकर्षित करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना देता येऊ शकेल.

 

२०० जणांना गाईडचे प्रशिक्षण

नागपूर येथील दीक्षाभूमी आणि दादर (मुंबई) येथील चैत्यभूमी स्थळास ’अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यात स्वतंत्र पर्यटन संचालनालय स्थापन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका ‘विशेष पर्यटन क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. पर्यटनस्थळी पर्यटक मार्गदर्शक (गाईड) नियुक्त करता यावेत यासाठी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास २०० जणांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

मुंबई मेला शॉपिंग फेस्टिवल

मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी दुबई फेस्टिवलच्या धर्तीवर ‘मुंबई मेला शॉपिंग फेस्टिवल’ घेण्यात आला. विविध रेस्टॉरंट असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, खाजगी टॅक्सी कंपन्या, रेल्वे, शॉपिंग मॉल अशा विविध खाजगी -सार्वजनिक सेवांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. आता एमटीडीसीमार्फत दरवर्षी या फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

- इर्शाद बागवान

(लेखक विभागीय संपर्क अधिकारी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@