उम्मीद अभी बाकी है... 'विक्रम लँडर'चा शोध लागला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2019
Total Views |

 

 

इस्रोप्रमुख डॉ. सिवन यांची घोषणा


 

 

बंगळुरू : शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून ५७ मिनिटांनी अचानक संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचा शोध लागला असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी रविवारी केली. त्यामुळे 'चांद्रयान-२' मोहिमेच्या आशा अजूनही कायम आहेत.

 

"चंद्राच्या कक्षेत स्थापन झालेल्या ऑर्बिटरवरील उच्च क्षमतेच्या कॅमेर्‍यांनी लँडरचे नेमके ठिकाण शोधून काढले आणि त्याचे छायाचित्र इस्रोच्या केंद्राला पाठविले. विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर उतरला आहे आणि ही 'हार्ड लँडिंग'च होती. लँडरच्या आत प्रज्ञान रोव्हरही आहे," असे सिवन यांनी सांगितले.

 

हार्ड लँडिंगमुळे विक्रम लँडरचे काही नुकसान झाले असण्याची शक्यता आहे काय, असे विचारले असता, "याचे उत्तर आताच देता येणार नाही. ऑर्बिटरवरील कॅमेर्‍यांच्या थर्मल इमेजमधून लँडरचे नेमके ठिकाण माहीत झाले आहे आणि त्याच्यासोबत संपर्क स्थापन करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत," असे ते म्हणाले.

 

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून ५७ मिनिटांनी विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षासोबतचा संपर्क अचानक तुटला होता. त्यावेळी लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर होता. आगामी १४ दिवस आम्ही विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. लँडरसोबतचा संपर्क तुटण्यासाठी मिशनच्या शेवटच्या टप्प्यात चुकीच्या पद्धतीने झालेली अंमलबजावणी जबाबदार असल्याचे सिवन म्हणाले.पंतप्रधान आमचे प्रेरणास्रोत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासाठी प्रेरणास्रोेत आहेत. त्यांच्या भाषणातून आम्हाला प्रेरणा मिळाली. "विज्ञान निकाल पाहात नाही, प्रयोग सुरूच असतात आणि प्रयोगातूूनच निकाल मिळतात," हे मोदींचे वाक्य खूप महत्त्वाचे होते. "चांद्रयानचा अन्य मोहिमांवर परिणाम होणार नाही. आम्ही सध्या अनेक प्रकल्पांवर काम करीत आहोत. हा आमच्यासाठी झटका नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

"पंतप्रधानांनी आम्हाला प्रोत्साहन दिल्यानंतर केवळ देशातूनच नव्हे, तर जगभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला आहे. यामुळे आमचे मनोबल वाढले आहे. यासाठी आम्ही पंतप्रधान आणि देशवासीयांचे मनापासून आभार मानतो," असे ते म्हणाले. "पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने इस्रोच्या वैज्ञानिकांना धीर दिला, त्याचे कौतुक शब्दांत करता येणार नाही. असा पंतप्रधान लाभणे ही फार मोठी गोष्ट आहे," असे इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंजन यांनी सांगितले, तर "पंतप्रधानांनी वैज्ञानिकांचे धाडस वाढविल्याने, त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे," असे मत अन्य एक माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी व्यक्त केले.

@@AUTHORINFO_V1@@