
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आयोजित कार्यक्रमात मेट्रो मार्ग १०,११,१२ आणि मेट्रो भवनचे भूमिपूजन तसेच पहिल्या मेट्रो कोच व बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. दरम्यान याच वेळी मेट्रो मुंबईच्या 'ब्रॅण्ड व्हिजन डॉक्युमेंट' चे देखील पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी करण्यात आली. या तीन मार्गांमुळे शहरातील मेट्रोचे जाळे ४२ किलोमीटरने वाढणार आहे.
आज देशात २७ शहरांत मेट्रो सुरू झाली आहे किंवा सुरू होत आहे. देशात ६७५ कि.मी. मेट्रो मार्ग कार्यान्वित. ४०० कि.मी.ची मेट्रो सेवा मागील पाच वर्षात सुरू. मेट्रोचे ८५० कि.मी.पेक्षा अधिकचे काम सुरु आहे. ६०० कि.मी. ची मान्यता मागील पाच वर्षात देण्यात आली असल्याची माहिती या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना दिली.
मेट्रोच्या या उदघाटन सोहळ्याप्रसंगी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, केंद्रीयमंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षणमंत्री आशिष शेलार,भाजप खासदार पूनम महाजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रत्येक मुंबईकरांसाठी सुरक्षित, जलद आणि उत्तम प्रवास देणे हा या मेट्रो बांधणीचा महत्वाचा उद्देश आहे. या मेट्रोच्या झाल्यामुळे मुंबईकरांचा काही तासांचा प्रवास आता काही मिनिटांमध्येच होणे शक्य होणार आहे. या मेट्रो मार्गांमुळे इंधन आणि वेळेची बचत होईल तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल.
मेट्रोच्या या उदघाटनानंतर पंतप्रधान औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका मोहिमेद्वारा (उमेद) आयोजित राज्यस्तरीय महिला सक्षम मेळाव्याला संबोधित करणार आहेत.