राष्ट्रसेवेची अपूर्व पूर्वतयारी - भाग ५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2019
Total Views |



डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर टिळक-आगरकरांचे जे सत्कार झाले त्याबद्दलनेटिव्ह ओपिनियनच्या वृत्तान्तातील पुढील वाक्य फार महत्त्वाचे आहे. पानसुपारी वाटण्यापूर्वी भाषणे झाली. भाषण करणार्यात यहुदी हिंदू व मुसलमान या तिन्ही प्रकारचे लोक होते. सर्वधर्माच्या लोकांचा टिळक-आगरकरांच्या सत्कारात सहभाग कसा होता, हे यावरून दिसते. कोल्हापूर प्रकरणात कोण कुठल्या जातीधर्माचा आहे हा प्रश्न गौण ठरला आणि जे जे असत्य आहे, चुकीचे आहे आहे त्यावर हे तरुण संपादक हल्ला चढवणार हे सिद्ध झाले. कोल्हापूर खटल्यानंतर लोकांमध्ये त्यांचा नावलौकिक वाढला. सच्चे देशभक्त आणि निर्भीड संपादक म्हणून टिळक-आगरकर तुरुंगात गेले आणि लोकांच्या गळ्यातले ताईत होऊन बाहेर पडले.

 

पुण्याच्या भवानी पेठेत रामशेठ उरवणे नावाचे एक व्यापारी होते. टिळक-आगरकरांसोबत तोंडओळख नसतानाही कोल्हापूर खटल्याच्या जामिनासाठी त्यांनी दहा हजारांची थैली न्यायालयात नेली, असे उल्लेख बहुतांश टिळकचरित्रात आहेत. त्यांना तसे करायला जोतिबा फुल्यांनी सांगितले, असे काही चरित्रकार सांगतात. टिळक-आगरकरांची सुटका झाल्यानंतर जोतिरावांनी त्यांचा जाहीर सत्कार केला असेही सांगतात, पण ही माहिती ऐकीव आहे असेच दिसते. याचा प्रत्यक्ष पुरावा सापडत नाही. सत्यशोधकांनी टिळक-आगरकरांच्या सुटकेसाठी केलेल्या या प्रयत्नांची दखल टिळक-आगरकरांनी घेतली नाही, असे सांगून वाद माजवले जातात. यातील नेमके सत्य जाणून घेण्यासाठी जोतिबा फुल्यांच्या विचारधारेतून घडलेला सत्यशोधक समाज आणि टिळक-आगरकरांचे विचारविश्व यात डोकावून बघूया.

 

जोतिराव फुले तसेच तत्कालीन सत्यशोधक समाजाच्या पुढार्‍यांना कोल्हापूरच्या गादीविषयी पूज्यभाव होता हे उघड आहे. माधवराव बर्वे हे चित्पावन ब्राह्मण असूनही त्यांची बाजू न घेता कोल्हापूरच्या महाराजांच्या बाजूने टिळक आणि आगरकर लढत आहेत, हे पाहून फुल्यांच्या सत्यशोधक पुढार्‍यांना टिळकांबद्दल काहीसे नवल वाटले असेलही पण त्याहीपेक्षा अधिक या तरुण संपादकांचे कौतुक वाटले, असेच दिसते. या सगळ्याला कोल्हापूरच्या गादीबद्दल वाटत असलेल्या सहानुभूतीची जोड मिळाली आणि कोल्हापूर प्रकरणात सत्यशोधक ब्राह्मणेतर पुढारी टिळक-आगरकरांच्या बाजूने उभे राहिले असा तर्क काढता येईल. य. दि. फडके त्यांचे निरीक्षण नोंदवताना म्हणतात, “निबंधमालेत विष्णुशास्त्र्यांनी फुल्यांची व सत्यशोधक समाजाची यथेच्छ कुचेष्टा व मनमुराद टवाळी केलेली असूनही रामशेठ उरवणे व सत्यशोधकांनी त्याबद्दलचा राग गिळला असे दिसते. छत्रपतींच्या कैवाराने बर्वे या चित्पावन दिवाणावर तुटून पडणार्‍या चित्पावन टिळक-आगरकरांच्या पाठीशी उभे राहण्याचे ब्राह्मणेतर नेत्यांनी ठरवले.

 

उरवणे यांनी जामिनासाठी दहा हजार पाठवले की पाच हजार याबद्दल अनेक चरित्रकारांमध्ये मतभेद असले तरी उरवणे यांनी मदतीसाठी रक्कम पाठवली हे खात्रीपूर्वक सांगता येते. वरील बर्‍यापैकी माहिती इतर चरित्रात सापडते. पण खटल्याच्या निकालानंतर टिळक-आगरकर तुरुंगात असताना उरवणे यांचे दुर्दैवी निधन झाले आणि त्यांच्यावरील स्वतंत्र मृत्युलेख ‘केसरी’ने प्रसिद्ध केला, हे सत्य मात्र सांगितले जात नाही. ३ ऑक्टोबर, १८८२ चा ‘केसरी’ म्हणतो, “...उरवणे हे नुसते तोंडपाटीलकी करणारे नव्हते. कोल्हापूर प्रकरण याचा काही एक संबंध नसता याचे काळजास किती झोंबले होते... तर मरणाचे आधी दोनच दिवस आमचे एका मित्राजवळ त्या ओढलेल्या शब्दांनी उरवणे यांनी कोल्हापूरचे महाराज, रा. ब. बर्वे, आगरकर व टिळक या सर्वांचे कुशल वृत्ताबद्दल चौकशी केली.” हा सर्व प्रकार जोतिबांनी दिलेले शिक्षण व विद्वान मंडळींची संगत याचा आहे. उरवणे यांनी पैसे किती पाठवले यापेक्षा संकटाच्या काळी मदत केली हे महत्त्वाचे. काही चरित्रकारांनी पाच हजारांचा उल्लेख केला आहे. पण ‘केसरी’च्या अग्रलेखात दहा हजारांचा स्पष्ट उल्लेख आहे. ऐनवेळी उरवणे यांनी पैसे पाठवले व मदत केली ही बाब चरित्रकार लिहितात, ती महत्त्वाची आहेच पण त्याबरोबरच या रकमेची गरज न पडल्यामुळे ही संपूर्ण रक्कम उरवणे यांना जशीच्या तशी परत केली गेली हे फारसे सांगितले जात नाही. त्याचाही उल्लेख व्हायला हवा.

 

‘केसरी’च्या मृत्युलेखात ही रक्कम परत केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. रक्कम परत केल्यामुळे उरवणे या प्रकरणात जामीन राहिले असे म्हणता येत नाही. त्यांनी तशी तयारी दाखवली असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. उरवणे संकटकाळी मदतीला धावून आले याचे खुद्द टिळकांना अप्रूप वाटत होते हेही लक्षात घ्यायला हवे. केळकरांच्या टिळकचरित्रात हा उल्लेख सापडतो. टिळक हे मित्रमंडळींसोबतच्या गप्पांमध्ये उदाहरण देऊन सांगत की, पाच हजार रुपये ठेवून माझी ओळख नसतानाही जामीन राहायला उरवणे शेठ तयार झाले हे पाहून मला तर फारच अचंबा वाटला. व सार्वजनिक सेवेचे फळ फार दूर असत नाही, अशी सार्वजनिक आयुष्यक्रमाच्या उंबरठ्यावर मला खात्री पटली. ( खंड १, पान १६१ )शेठजींच्या कुटुंबाशी टिळकांचा स्नेह शेठजींच्या मृत्यूनंतरही कायम होता असे दिसते. उरवणे यांच्या पेढीतून टिळकांचे अनेक आर्थिक व्यवहार चालत. नंतरच्या काळात उरवणे यांच्या कुटुंबात इस्टेटीच्या वाटणीच्या प्रसंगी टिळकांनी मध्यस्थी केली होती. त्यांना पंच म्हणून नेमले व उरवणे यांच्या दोन्ही मुलांचे समाधान होऊन वाद मिटला असेही सांगण्यात येते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा खोलात शिरून अभ्यास केला तर टिळक-आगरकरांनी किंवा त्यांच्या सहकार्‍यांनी फुल्यांची किंवा त्यांच्या विचारात वाढलेल्या सत्यशोधकांची दखल घेतली नाही, असे म्हणणार्‍यांचा आक्षेप किती निरर्थक आहे याची कल्पना सुज्ञ वाचकांस येईलच. जुन्या रूढी, परंपरा आणि चालीरीती यांचा समाजावर असलेला प्रभाव आणि पुरोहित वर्गाचे वर्चस्व याचा जोतिराव फुल्यांनी सुरुवातीपासूनच विरोधच केला होता. उच्चनीचतेमुळे एकाच वर्गाला प्राप्त झालेले वर्चस्व अनाठायी असून बहुजन समाजाच्या अधोगतीचे मूळ आहे, असा विचार ते मांडत होते. बहुजनांच्या अधोगतीसाठी जोतिराव उच्चवर्गीय पुरोहितांना जबाबदार धरतात, त्यामुळे पुरोहितांचे वर्चस्व असलेला हिंदू धर्म जोतिरावांना मान्य नव्हता असाच निष्कर्ष काढावा लागतो. जातीसंघर्ष हे बहुजनांच्या अधोगतीचे कारण आहे, असे त्यांना वाटत होते. जोतिराव आपला हा नवा विचार सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडत होते.

 

दुसरीकडे टिळक ज्या विचारांच्या प्रभावळीतून येतात त्याचे अग्रणी असलेल्या चिपळूणकरांसारख्यांनी जोतिबा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाला अनुल्लेखाने सहज टाळले आहे. त्यांच्या विचारांची दखल घेणे तर सोडाच उलट शुद्धलेखनाचे मापदंड लावून चेष्टा केलेली आढळेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर जोतिराव आणि त्यांचे सत्यशोधक सहकारी हे हिंदू समाजातील चालीरीती, भेदाभेद, भ्रामक कल्पना यांना त्याज्य ठरवत होते, बहुजनांच्या अधोगतीसाठी पुरोहितांना जबाबदार ठरवून टीका करत होते. तर दुसरीकडे उच्चवर्णीयांना फारसे न दुखावता समग्र समाजाला सोबत घेऊनच सामाजिक सुधारणा घडवता येतील या विचाराचे चिपळूणकर-टिळक होते. सध्याच्या परिस्थितीत इंग्रज या देशातून जाणे शक्य नाही आणि गेलेच तर ते समाजसुधारणा चळवळीस इष्ट नाही, असा काहीसा विचार जोतिराव फुल्यांच्या मांडणीत दिसतो तर याच्या पुरेपूर विरुद्ध म्हणजेच इंग्रजांचे राज्य हेच राष्ट्राच्या अवनतीचे कारण आहे, इंग्रज गेले तर स्वराज्यात आपोआप सुधारणा होतीलच. हा विचार चिपळूणकर आणि पुढे टिळकांच्या विचारांचा केंद्रबिंदू ठरतो. अभ्यासूंनी या विचारप्रवाहांचा परामर्श घ्यायला घ्यावा, यावर सविस्तर लेखन होऊ शकते पण विस्तारभयास्तव ते टाळले आहे.

 

या सगळ्याचा साकल्याने विचार केला तर लक्षात येते की, फुले आणि टिळक यांच्या विचारांची बैठक (school of thoughts) पूर्णपणे वेगळी आहे. दोन विचारप्रणालीतला भेद लक्षात घेतला तर फुले आणि टिळक यांचे वैचारिक सूत जमेल याच्या शक्यतांना कुठेही वाव दिसत नाही. पण तरीही टिळक-आगरकरांनी कोल्हापूरच्या राजाविषयी दाखवलेली तळमळ आणि भोगलेला तुरुंगवास यामुळे बहुजन समाजात त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला आणि त्यानंतर दामोदर यंदे, नारायण लोखंडे, हरी रावजी चिपळूणकर आणि रामशेठ उरवणे यांसारख्या बहुजन समाजासाठी झटणार्‍या सत्यशोधकांनी टिळक-आगरकरांच्या सुटकेसाठी जोतिबांच्या सांगण्यावरून प्रयत्न केले हे लक्षात घ्यायला हवे. विचारधारेतील भेद बाजूला ठेवत सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर समाज टिळक आगरकरांच्या पाठीशी उभा राहिला आणि टिळक-आगरकरांनीसुद्धा त्यांच्या प्रयत्नांचा आदर केला, नम्रतापूर्वक त्यांच्या सत्काराचा स्वीकार केला ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना ठरते. दुर्दैवाने ती दुर्लक्षित आहे. १०१ दिवसांची शिक्षा पचवून आल्यानंतर आपल्या डोंगरी तुरुंगातील आठवणीत आगरकर लिहितात, पोलीस कोर्टात फिर्याद लागल्याबरोबर ‘केसरी’-‘मराठा’चे दिवस भरले असे कित्त्येकांस वाटू लागले. पुढे शास्त्रीबोवांचा अकाली मृत्यू झाला मग तर काही पुसूच नका. त्या ऐन दु:खाच्या आणि आणीबाणीच्या प्रसंगी जिकडे तिकडे सर्वजण असे म्हणू लागले की आता ही मंडळी रसातळाला गेलीच म्हणून समजा! असो, आम्ही असे समजतो की एवढ्या थोड्या काळात आम्हावर जी दोन-तीन संकटे येऊन गेली व ज्यातून आम्ही फाटाफूट झाल्याशिवाय जसेच्या तसे बाहेर पडलो, त्यावरून आमच्या देशबंधूंची एवढी तरी खात्री होईल की देशसेवेचे दंभ माजवून कोठे तरी सोयीवार नोकरी मिळेपर्यंत चार पैसे मिळवण्यात गुंतलेले हे लोक नाहीत, तर यापेक्षा थोडेसे कठीण काम अंगावर घेऊन ते निश्चयाने तडिस नेण्याचा यांचा निर्धार झालेला आहे. आगरकरांची वरील वाक्ये फार महत्त्वाची आहेत. दोन अडीच वर्षांपूर्वी देशसेवेच्या ध्येयाने झपाटून टिळक-आगरकरांनी शाळा सुरू केली होती तेच टिळक-आगरकर आता लोकमताची बाजू मांडण्यासाठी थेट तुरुंगाची हवा खाऊन आले होते. वाटेवरचा प्रत्येक काटा त्यांना बोचत होता खरा पण ती प्रत्येक ठेच त्यांना नवे काही शिकवत होती. ‘सतीचे वाण घेतलेल्यां’ना अग्नीचे भय नसते हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले होते. राष्ट्रसेवेसाठी कराव्या लागणार्‍या कष्टांची, घ्याव्या लागणार्‍या अनुभवांची ही पूर्वतयारी खरोखर अपूर्व ठरली.

- पार्थ बावस्कर

(राष्ट्रसेवेची अपूर्व पूर्वतयारी समाप्त )

@@AUTHORINFO_V1@@