बाप्पाला निरोप देताना

    07-Sep-2019
Total Views |



गणेशोत्सव हा आता केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही. तो आता लोकप्रिय सांस्कृतिक आणि जगभर पसरलेल्या गणेशभक्तांमुळे ग्लोबल उत्सव झाला आहे.पण हा मंगल उत्सव साजरा करताना आपण काही नवीन गोष्टीही लक्षात घ्यायला हव्यात. या सणाला असलेली पर्यावरणाची, श्रद्धेची, सहकुटुंब उपासनेची किनारही सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. हा सण सगळ्यांचा असल्याने इतर धर्माचे लोकही कसे भाग घेतील, हे मंडळांनी पाहायला हवे.

 


पाणावलेले डोळे आणि ढोलताशांचा गजर
, अशा संमिश्र वातावरणात ’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत गणरायाला भावपूर्ण निरोप आपण दरवर्षीच देतो. गणेशोत्सव गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा बहुधा ११ दिवस असतो. जेव्हा तिथीक्षय असतो तेव्हा दहा दिवसांचा असतो. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशजींचा मुक्काम दि. २ ते १२ सप्टेंबर असा ११ दिवसांचा आहे. यावर्षी गुरुवार, दि. १२ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. शास्त्रानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन यादिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल. पुढील वर्षी २२ ऑगस्टला गणरायाचे आगमन होईल. पेशवे काळात शनिवारवाड्यात गणेशोत्सव केला जात असे. त्याची मिरवणूक निघत असे. गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आजच्या सारखीच पुण्यात लोकांची गर्दी होत असे. सन १८९२३ पासून पुण्यातील सर्व गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे.


प्रत्येक धर्माला काही स्थिर तत्त्वे किंवा सिद्धांत आहेत
, पक्क्या श्रद्धा आहेत. हिंदू, यहुदी, ख्रिश्चन व इस्लाम हे धर्म ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात. बौद्ध धर्म ईश्वर किंवा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही. पण तो देश, परिक्रमा (संसार) व प्रतिफल (कर्म) सिद्धांतावर विश्वास ठेवतो. हिंदू पुनर्जन्मावर, बौद्ध निर्वाणावर, मुस्लीम अंतिम निवाडादिनावर विश्वास ठेवतो. आजवर खूप वैज्ञानिक प्रगती होऊनही धर्म व आस्था, श्रद्धा यांचे गुंतागुंतीचे नाते पुरेसे स्पष्ट झालेले नाही. ख्रिश्चन धर्म सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा व मुस्लीम धर्म १४०० वर्षांपूर्वीचा समजला जातो. हिंदू धर्म अतिप्राचीन म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वीचा असल्याने इतर धर्मांपेक्षा रूढी, आख्यायिका, श्रद्धा, अंधश्रद्धा अधिक असणे स्वाभाविक आहे. अशाच गणेश जन्माविषयीही अनेक आख्यायिका आहेत. माता पार्वतीने आपल्या शरीरावर लावलेल्या उटण्याद्वारे काढलेल्या मळाचा एक पुतळा बनवला आणि त्यात प्राण भरले आणि गणपतीचा जन्म झाला, ही कथा जास्त प्रचलित आहे. वराहपुराणात आलेल्या उल्लेखांनुसार, भगवान शंकराने पंचतत्त्वांचा मिलाफ करून तन्मयतेने गणेशाची निर्मिती केली. अप्रतिम सौंदर्य लाभलेल्या गणेशाला पाहून सर्व देवांमध्ये खळबळ उडाली. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन शंकराने गणेशाच्या पोटाला मोठा आकार दिला, तसेच हत्तीचे शिर प्रदान करून त्याची आकर्षकता काहीशी कमी करण्याचा प्रयत्न केला. आजचे गणपतीचे आकर्षक रूप पाहून हे जास्त संयुक्तिक वाटते. गणेशाच्या जन्माविषयी आणखी एक कथानक ब्रह्मवैवर्तपुराणात आहे. त्यानुसार, पार्वतीच्या प्रतिज्ञेमुळे खूश होऊन स्वतः भगवान श्रीकृष्णाने तिच्या गर्भातून गणेशाच्या रूपाने जन्म घेतला. गणेशाच्या जन्मानंतर त्याला आशीर्वाद देण्यासाठी पार्वतीने सर्व देवीदेवतांना आमंत्रित केले. शापित असलेले शनिदेव मात्र या आमंत्रणावरून आशीर्वाद देण्यासाठी जाण्याचे सुरुवातीस टाळत होते. कारण, शनिदेवांना पत्नीकडून असा शाप मिळाला होता की, एखाद्या बालकाला पाहून ते आकर्षित झाले, तर त्या बालकाचे शिर धडापासून वेगळे होईल. त्याप्रमाणे शनिदेवांनी गणेशाला जेव्हा पाहिले, तेव्हा गणेशाचे शिर धडावेगळे झाले आणि नंतर शंकराने हत्तीचे शिर त्याच्या धडावर लावले. आता प्रश्न असा पडतो की, शिर धडावेगळे होऊनही दुसरे धड लावता येत असेल तर धडावेगळे झालेले बाल गणेशाचेच का लावले नाही? हत्तीचे लावायची काय गरज होती? सर्वच धर्मात अशा आख्यायिका आढळतात. त्यामुळे त्या आख्यायिका समजून सोडून देणेच योग्य ठरते. विशेष म्हणजे जैन आणि बौद्ध धर्मांमध्येही गणेशपूजेची महती सांगितली आहे.


सध्या सर्वत्र जो होतो त्याला गणेशोत्सव म्हणायचे काय
? अशी टीका अनेकजण विशेषतः उत्सवात भाग न घेणारेच जास्त करतात. खरेतर बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव तसाच राहील ही अपेक्षा ठेवणे अप्रस्तुत आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केव्हा आणि कशी झाली, कुणी केली, यावर गेल्या काही वर्षांपासून वादविवाद चालू आहेत. या उत्सवाला सार्वजनिक रूप छत्रपती शिवाजीराजांनी पुणे येथे दिले, असे दाखले इतिहासात मिळतात. त्यांच्या काळात १६२३० ते १६८० पर्यंत उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा केला जात असे. त्या मागील त्यांचा उद्देश स्वराज्य संस्कृती लोकांना कळावी व त्यांच्यात देशभक्ती जागवावी हा होता. शिवरायांच्या मृत्यूनंतर बंद पडलेली सार्वजनिक गणेशपूजा १७१८ पासून पेशव्यांनी पुन्हा सुरू केली. ती प्रथा १८१८ पर्यंत कायम राखली गेली. पण सार्वजनिक गणपती पूजा पेशव्यांच्या पतनानंतर १८१९ ते १८९२ मध्ये बंद झाली व ती पूजा घरोघरी सुरू झाली. भाऊसाहेब रंगारींनी त्यांच्या मंडळाचा गणपती १८९२ मध्ये बसवला होता व त्याच्या दर्शनाला लोकमान्य टिळकही गेले होते असा उल्लेख आढळतो. वैयक्तिक आणि घरगुती स्वरूपाचा हा धार्मिक उत्सव लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी एकत्र येऊन लढा देण्यासाठी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रचार करून व अनेक मंडळांची स्थापना करण्यास प्रोत्साहन देऊन १८९२३ पासून खर्‍या अर्थाने सार्वजनिक केला. भारताची घटना लिहिण्यासाठी स्थापन झालेल्या समितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. त्यांना मदत करण्यासाठी २१ तज्ज्ञ होते व घटनेचे वेगवेगळे विषय त्यांना वाटून देण्यात आले होते. बाबासाहेब स्वतः कायदेतज्ज्ञ व अध्यक्षही असल्याने त्यांनाच ‘घटनेचे शिल्पकार’ म्हटले जाते. तसे आता आपण पाहत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांनाच मानावे लागेल.


गणेशोत्सव हा आता केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही
. तो आता लोकप्रिय सांस्कृतिक आणि जगभर पसरलेल्या गणेशभक्तांमुळे ग्लोबल उत्सव झाला आहे.पण हा मंगल उत्सव साजरा करताना आपण काही नवीन गोष्टीही लक्षात घ्यायला हव्यात. या सणाला असलेली पर्यावरणाची, श्रद्धेची, सहकुटुंब उपासनेची किनारही सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. हा सण सगळ्यांचा असल्याने इतर धर्माचे लोकही कसे भाग घेतील, हे मंडळांनी पाहायला हवे. घरात गरोदर महिला असेल तर गणपती विसर्जन करू नये हा गैरसमज असून याला कुठलाही धार्मिक आधार नाही. तसेच उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो असाही एक गैरसमज आहे. देव कधीही कडक, रागावणारा नसतो. तो नेहमी कृपाळू असतो. कुणाचंही वाईट करत नाही, अशा श्रद्धेने पूजा करावी. आवाजाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करीत गणेश विसर्जन करणेच सर्वांच्याच हिताचे आहे. मुंबईतला सार्वजनिक गणेशोत्सव प्रचंड मोठा असूनही मुंबईकरांनी या निर्णयाचे गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत पालन केले होते. पुण्यातील काही मंडळांनी मात्र डीजेशिवाय विसर्जन करणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. नाशिक जिल्ह्यातील २२३ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही प्रथा सुरू करून नवीन आदर्श निर्माण केला आहे. नाशिकमधीलच गंगापूर पोलीस ठाण्याच्या भागातील नगरसेवकाने अनेक सार्वजनिक मंडळांचे गणपती एकत्र बसवून असाच चांगला पायंडा पाडला आहे.कोल्हापूरकरांनी डीजेशिवाय मिरवणुका काढून गेल्या वर्षी सामाजिक बांधिलकी दाखवली होती.


खरेतर ढोलताशांचा आवाजही कमी नसतो
. पण या पारंपरिक वाद्यांवर बंदी नसली तरी ध्वनिप्रदूषण कमीत कमी होईल हा विचार मनात ठेवूनच हा महोत्सव साजरा करायला हवा. या लोकोत्सवाच्या निमित्ताने दूध, दही, तूप, मिठाई, फुले, फळे, पत्री यांची होणारी प्रचंड उलाढाल, ढोल, लेझीमवाले, बॅण्डवाले, मंडपवाले, वेगवेगळे कलाकार, मूर्तिकार, गुरुजी, व्यापारी, व्यावसायिक इत्यादींच्या रोजगारात होणारी मोठी वाढ या सकारात्मक बाजूंचा आपण जास्त विचार केला पाहिजे. अनेक व्यावसायिकांना वर्षभरातील उत्पन्नातील मोठा हिस्सा या दहा दिवसात मिळतो. विशेष म्हणजे या उलाढालीतील मोठा लाभ शेतकर्‍यांना होतो हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न रहाता मोठा आर्थिक इव्हेंट बनला आहे. केवळ मुंबईत गणेशोत्सवात सुमारे २० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते, असे म्हटले जाते. पूर्ण महाराष्ट्रभर मिळून यापेक्षाही मोठी उलाढाल होत असणार हे उघड आहे. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य स्थापनेच्या राष्ट्रीय हेतूने गणेशोत्सव सुरू केला आणि त्याचा कालावधी दहा दिवस इतका निश्चित केला. त्यानुसार अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करतात. यानिमित्ताने अनंतव्रताची थोडक्यात माहिती घेणे उद्बोधक आहे. अनंत चतुर्दशी हा विष्णूच्या व्रताचा तसेच उत्सवाचा दिवस मानला जातो. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला ‘अनंत चतुर्दशी’ म्हणतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. हे धार्मिक व्रत असून याचा कालावधी १४ वर्षांचा आहे. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत १४ वर्षे १४ गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. हे व्रत सार्वत्रिक नाही. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुळात चालू राहते. पांडवांना द्युतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला होता. या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी आख्यायिका आहे.


अनंताची पूजा पुढीलप्रमाणे
-

चौरंगावर मंडल काढतात. त्यावर जलकुंभ ठेवून त्यावर सात फणा असलेला दर्भाचा शेषनाग ठेवून त्याच्यापुढे अनंत ठेवतात. कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात. कुंभातील पाण्याला यमुना म्हणतात. शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूची १६ उपचारांनी पूजा करतात. नंतर दोरकाची प्रार्थना करून दोरा हातात किंवा गळ्यात बांधतात. जुन्या दोर्‍याचे विसर्जन करतात. प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रतरूपात आली असावी, असा संकेत मानला जातो. हरियाणातही या दिवशी अनंताचे व्रत घेण्याची प्रथा आहे.

-विलास पंढरी