सुतोपो पूर्वो नुग्रोहो-इंडोनेशियन संकटमोचक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2019
Total Views |




२०१० ते २०१९ पर्यंत सुतोपोने दरवर्षी किमान २ हजार
, ३०० धोक्याचे इशारे दिले. ते खरे ठरले आणि अक्षरश: लाखो लोकांचे जीव वाचले. सुतोपो ‘पाक तोपो’ म्हणजे ‘श्रीमान तोपो’ या टोपण नावाने तमाम जनतेच्या लाडका बनला.


गणपती आले आले आणि जाऊसुद्धा लागले. आमच्या गावातल्या माझ्या मित्रांनी मला नेहमीप्रमाणे मजे-मजेत शिव्या पण घालून झाल्या, “काय साली तुम्ही भटं! दीड दिवसाच्या वर बाप्पाला घरात ठेवीत नाय!!” या वर्षी त्यांना तसेच गंमतीत प्रत्युत्तर द्यायला माझ्याकडे सलमान खानबरोबरच मुकेश अंबानीचे पण उदाहरण होते. कोट्यवधींची संपत्ती असणारा सलमान दीड दिवसाचा गणपती आणतो आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत माकड उड्या मारीत नाचतो, हे दरवर्षीचंच झालंय. या वर्षीची नवी बातमी म्हणजे अब्जाधीश असणार्‍या नि ३३ माळ्यांचा बंगला बांधणार्‍या मुकेश अंबानीने दीड दिवसाचा गणपती आणला. त्याच्या दर्शनाला बॉलिवूडचीफर्स्ट फॅमिलीअमिताभ-जया ते महाराष्ट्राच्या राजकारणातफर्स्ट फॅमिलीबनू इच्छिणारे उद्धव-आदित्य असे तमाम सितारे आणि तारे लोटले होते. पण ते जाऊद्या. तुम्हालासुतोपो पूर्वो नुग्रोहोहा माणूस माहीत आहे का? ‘सुतोपोम्हणजे मूळ संस्कृतसुतप:’ हे भगवान विष्णूंचे नाव आहे. ‘पूर्वोम्हणजेपूर्वआणिनुग्रोहोम्हणजे मूळ संस्कृतन्यग्रोध.’ औदुंबर किंवा उंबर म्हणजेचन्यग्रोध वृक्षपण तुम्हालासुतोपोकशाला माहीत असणार? तो काय सलमान आहे? की अंबानी आहे? पणसुतोपोकोण हे पाहण्यापूर्वी आपण दोन विलक्षण नैसर्गिक आपत्तींकडे पाहूया.


सतत कोसळणार्‍या पावसाने जनजीवन नेहमीप्रमाणे विस्कळीत झालेले आहे. आपल्या जनतेला ‘डिझास्टर मॅनेजमेंट’चे कसलेही प्रशिक्षण दिले जात नाही, हे दरवर्षी अधोरेखित होते. केवळ परमेश्वरी कृपा म्हणूनच फार मोठी प्राणहानी होत नाही. इतकेच की, स्थावर, जंगम मालमत्तेचे नुकसान मात्र अपरिमित होते. तर ‘सरस्वती’ ही भारतवर्षाच्या पश्चिमेकडील एक प्रचंड नदी. जशी पूर्वेकडे ‘ब्रह्मपुत्रा’ तशी पश्चिमेकडे ‘सरस्वती.’ तर एकदा म्हणे या ‘सरस्वती’ला आपल्या विशालतेचा गर्व झाला नि ती अधिकच विशाल रूप धारण करून अतिवेगवान झाली. कुणा एका महान ऋषींनी शापवाणी उच्चारली, “तुझा प्रवाह उलटा होईल.” आणि ‘सरस्वती’ नदीचा प्रवाह लुप्त झाला. ही झाली पुराणातील कथा. प्रत्यक्षात काय घडले? हिमालय पर्वतात सतत भूकंपं आणि भूस्खलनं (लॅण्ड स्लाईड्स) होत असतात. तसाच एक भयानक भूकंप हिमालयाच्या ‘शिवालीक’ नामक पर्वतरांगेत झाला. त्यातून सरस्वतीच्या प्रवाहात मध्येच एक प्रचंड पर्वत भूगर्भातून बाहेर आला. त्या पर्वतामुळे सरस्वतीचा प्रवाह तुटला, फुटला. काही फाटे पूर्वेकडे वळले नि भूगर्भातून वाहत प्रयागक्षेत्री गंगा-यमुनेला मिळाले, काही फाटे पश्चिमेकडे वळले नि सिंधू, शतद्रू (सतलज) आणि व्यास (बियास) या नद्यांना मिळाले. मुख्य प्रवाह जमिनीत गडप झाला, पण जुन्याच मार्गाने म्हणजे हरियाणा, राजस्थान, गुजरातमधून जमिनीखालून वाहत कच्छच्या आखातात समुद्राला मिळाला.



या अत्यंत भीषण आणि दूरगामी नैसर्गिक आपत्तीत तत्कालीन भारतीय नागरिकांनी कसं बरं
‘डिझास्टर मॅनेजमेंट’ केलं असेल? ही घटना साधारण पाच हजार वर्षांपूर्वी घडली असावी. आता दुसरी घटना पाहू. विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे म्हणजे आताच्या साधारण महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिशा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या भागात दंडक किंवा दंड नावाचा एक राजा राज्य करत होता. अपार शक्ती आणि सतत मिळणारं यश यांनी हा राजा उन्मत्त झाला. उन्मत्त झालेले राजे साधारणपणे, प्रजेच्या बायका पळवणे आणि संपत्ती लुटणे हे गुन्हे करायला लागतात. त्यामुळे संतापलेल्या कुणा एका महान ऋषीने शापवाणी उच्चारली, ‘तुझ्या राज्याचं घोर अरण्य होईल.’ या शापासरशी दंडक राजाच्या राज्यावर गरम-गरम राखेचे ढीगच्या ढीग येऊन पडू लागले. प्रजा दशदिशांना पळून गेली. या राखेवर वर्षानुवर्षे घनघोर पाऊस पडत राहिला. काही शतकांमध्ये त्या समृद्ध भूमीच्या ठिकाणी एक अत्यंत घनदाट असं अरण्य झालं, दंडक राज्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं अरण्य म्हणून ते ‘दंडकारण्य.’ ही झाली पुराणातील कथा. प्रत्यक्षात काय घडलं? तर भारताच्या आग्नेयेकडील ‘सुमात्र’ या द्वीपावरील म्हणजे आजच्या इंडोनेशिया देशातल्या ‘सुमात्रा’ बेटावरच्या एका ज्वालामुखीचा अत्यंत भीषण असा उद्रेक झाला. त्यातून बाहेर पडलेली राख मधला हिंदी महासागर पार करून भारताच्या पूर्व किनार्‍यावरील आजच्या ओडिशा नि आंध्रपासून थेट छत्तीसगढ, कर्नाटक, महाराष्ट्र अशी पसरत गेली. सुपीक आणि लोकवस्तीने व्यापलेला हा सगळा परिसर एवढ्या भीषण नैसर्गिक आपत्तीत सापडलेला असताना तत्कालीन नागरिकांनी कसं ’डिझास्टर मॅनेजमेंट‘ केलं असेल?



वैज्ञानिकांच्या आजच्या अंदाजानुसार ही घटना आजपासून सुमारे ७० ते ७४ हजार वर्षांपूर्वी घडली असावी
. वैज्ञानिक परिभाषेत या भीषण स्फोटाला ‘सुपरव्होल्कॅनो’ असे म्हणतात. ‘सुमात्रा’ बेटावर आज या महाज्वालामुखीच्या जागी एक अत्यंत विशाल आणि नयनरम्य असा तलाव आहे. १०० किमी लांब, ३० किमी रूंद आणि किमान १ हजार ६५० फूट खोल, ही आहेत या तलावाच्या विशालतेची परिमाणं. आज या तलावाला म्हणतात, ‘लेक तोबा.’ ज्वालामुखी शांत झाल्यावर त्याच्या मुखाच्या खड्ड्याचाच हा तलाव बनला आहे. तर, अशा रितीने ‘सुतापो’ पूर्वी ‘नुग्रोहो’च्या मागावर आपण सलमान, अंबानी, सरस्वती, दंडकारण्य असा संचार करत इंडोनेशियात पोहोचलो आहोत. भारताच्या पूर्वेकडे ब्रह्मदेश म्हणजे म्यानमार, लव देश म्हणजे लाओस, श्याम देश म्हणजे सयाम किंवा थायलंड, मलयद्वीप म्हणजे मलेशिया, सुमात्र द्वीप म्हणजे सुमात्रा, यव द्वीप म्हणजे जावा, कालिमंथन म्हणजे बोर्निओ किंवा कालिमांतान, इरीन जय म्हणजे इरीन जाया अशी छोट्या-मोठ्या बेटांची एक रांगच पसरलेली आहे. यापैकी सुमात्रा-जावा-कालिमांतान-इरीन जाया यांच्यासह एकूण १७ हजार छोट्या-मोठ्या बेटांचा समूह म्हणजेच आधुनिक इंडोनेशिया देश. भूगर्भविज्ञानदृष्ट्या ही बेटं हिंदी महासागर आणि प्रशांत किंवा पॅसिफिक महासागर यांच्या सीमेवर आहेत. हिंदू पुराणं म्हणतात की, ही पृथ्वी ‘सप्तद्वीपात्मक’ म्हणजे सात द्वीपांची आहे. आधुनिक विज्ञान म्हणतं की, पृथ्वीच्या गर्भात सात ‘टेक्टॉनिक प्लेट्स’ आहेत. या ‘प्लेट्स’ सतत हालचाल करत असतात. जशी ‘गोंडवना’ नावाची प्लेट सतत ‘इंडो-युरेशियन’ प्लेटला धडक मारत असते. त्यामुळे इंडोनेशियाच्या १७ हजार बेटांमध्ये सतत भूकंप, भूस्खलन याबरोबरच सतत ज्वालामुखींचे उद्रेक होत असतात. आज नोंद झालेले, मोजले गेलेले असे १२७ जागृत, म्हणजे कोणत्याही क्षणी स्फोट होईल असे ज्वालामुखी इंडोनेशियात आहेत. हा आकडा थक्क करणारा आहेच, पण पुढचा आकडा जास्त थक्क करणारा आहे. या १२७ ज्वालामुखींच्या परिसरात किमान ५० लाख लोक बिनदिक्कतपणे राहतात.



इंडोनेशियन सरकारने नैसर्गिक आपत्तींपासून कमीत कमी हानी व्हावी म्हणून एक स्वतंत्र खातंच उघडलं आहे
. त्याचं नाव ‘डिझास्टर मिटिगेशन एजन्सी.’ सुतोपो पूर्वो नुग्रोहो हा त्या खालचा प्रवक्ता होता. होय, आता ‘होता’ असेच म्हटले पाहिजे. ‘सुतोपो’ हा मुळात ‘हायड्रोलॉजिस्ट’ म्हणजे ‘जलतज्ज्ञ’ होता. अतिशय गरिबीतून शिक्षण घेत त्याने ‘हायड्रोलॉजी’ या विषयात ‘डॉक्टरेट’ मिळवली. पण पाण्याबरोबरच त्याचा एकंदरच निसर्गाचा अतिशय सूक्ष्म अभ्यास होता. प्रत्यक्ष स्फोट होण्यापूर्वी ज्वालामुखीचा डोंगर आपला आकार बदलतो. या त्याच्या निरीक्षणाने जगभरचे ज्वालामुखीतज्ज्ञ थक्क झाले होते. जावा बेटातला ‘माऊंट मेरापी’ हा इंडोनेशियातला सध्याचा सगळ्यात मोठा जागृत ज्वालामुखी. २४ ऑक्टोबर, २०१० या दिवशीच्या संध्याकाळी सुतोपोने मेरापीच्या परिसरातल्या साडेतीन लाख लोकांना इंटरनेट, मोबाईलद्वारे आणि प्रत्यक्ष जाऊन सूचना दिली की, “पळा. मेरापी पर्वत कोणत्याही क्षणी लाव्हा ओकेल.” काही लोक त्याला म्हणाले, “पर्वताच्या माथ्यावर काही अतृप्त आत्मे जमले आहेत. त्यांना टाळण्यापेक्षा संतुष्ट करूया.” सुतोपो म्हणाला, “मला काहीही ऐकायचं नाही. शक्य त्या वस्तू घ्या आणि पळा.” साडेतीन लाख लोकांपैकी बहुसंख्य लोक पळाले. २५ ऑक्टोबरला पहाटे उरल्यासुरल्या लोकांबरोबर स्वत: सुतोपोही डोंगरावरून खाली उतरला. बघतात तर दोन-तीनशे लोक वस्तीतच थांबून राहिलेले. ते घरं सोडायला तयार होईनात आणि तेवढ्यात मेरेपीच्या माथ्यावरून पहिल्या स्फोटाची गर्जना झाली. गरमागरम राखेचे लोट उसळू लागले आणि सुतोपोच्या डोळ्यांदेखत ते दोन-तीनशे लोक राखेच्या ढिगार्‍यात नाहीसे झाले.



तेव्हापासून इंडोनेशियातला प्रत्येक माणूस सुतोपोला ओळखू लागला
. २०१० ते २०१९ पर्यंत सुतोपोने दरवर्षी किमान २ हजार, ३०० धोक्याचे इशारे दिले. ते खरे ठरले आणि अक्षरश: लाखो लोकांचे जीव वाचले. सुतोपो ‘पाक तोपो’ म्हणजे ‘श्रीमान तोपो’ या टोपण नावाने तमाम जनतेच्या लाडका बनला. देशभरातून कुणीही त्याला संपर्क करत असे. त्यामुळे तो अखंड मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर यावरच असायचा. सामान्यांशी आणि वैज्ञानिकांशी तो त्यांच्या-त्यांच्या भाषेत बोलायचा. लाखोंचे जीव वाचवणार्‍या सुतोपोवर २०१८ च्या मध्यावर मृत्यूची छाया पसरली. कधी साधी सिगारेटही न ओढणार्‍या सुतोपोला शेवटच्या टप्प्याचा फुप्फुसाचा कर्करोग आढळून आला. पूर्णपणे हिंदू नाव असलेला सुतोपो निष्ठावंत मुसलमान होता. त्याने हा आघात ‘अल्लाची इच्छा’ म्हणून स्वीकारला. उपचार सुरू झाले, पण त्याच्या रोजच्या कामात कोणताही खंड न पडू देता. अखेर ७ जुलै,२०१९ला सुतोपोची झुंज संपली. संकटमोचक सुतोपो त्या संकटनिर्माता नि संकटनिवारक परमेश्वराला भेटायला निघून गेला.

मल्हार कृष्ण गोखले

@@AUTHORINFO_V1@@