एक संघर्ष ‘स्व’अस्तित्वासाठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2019
Total Views |


स्वाती बिधान बरुहा यांनी स्वतःचे अस्तित्व तर जपलेच मात्र न्यायाधीशपदी विराजमान होत तृतीयपंथीयांचे समाजात वेगळे स्थानही निर्माण केले. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...


समाजात प्रत्येक माणसाचे आज एक वेगळे अस्तित्व आहे. स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही समाजात सन्मानाचे स्थान आहे. स्त्री आणि पुरुष यांना समाजात जितका सन्मान मिळतो तितकाच आदर तृतीयपंथीयांना मिळतो असे नाही. याउलट तृतीयपंथीयांच्या वाट्याला समाजात नेहमी हीन दर्जाचीच वागणूक मिळाली असून
२१ व्या शतकातही त्यांना अनेकांकडून अस्पृश्यतेनेच वागवले जाते. तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणार्‍यांची संख्या सध्या नगण्य असून त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी समाजातून कोणीही पुढे येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तृतीयपंथी समाज २१ व्या शतकातही इतरांपेक्षा मागेच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, याला अपवाद ठरतील अशाही काही व्यक्ती या समाजात असून त्या स्वतः संघर्ष करत स्वतःचे अस्तित्व जपतात. समाजात असे काही नावीन्यपूर्ण कार्य करतात की जगभरात त्यांचा सन्मान केला जातो. आसाममधील स्वाती बिधान बरुहा या त्यांपैकीच एक. २७ वर्षीय स्वाती यांनी स्वतःचे अस्तित्व तर जपलेच मात्र न्यायाधीशपदी विराजमान होत तृतीयपंथीयांचे समाजात वेगळे स्थानही निर्माण केले. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची कहाणीही तितकीच महत्त्वाची आहे.


स्वाती यांना पूर्वी बिधान बरुआ या नावाने ओळखले जात असे. त्यांचा जन्म आसाममधील गुवाहाटी येथे झाला. लहानपणापासूनच त्या अभ्यासात हुशार. कायद्याचा अभ्यास करण्याची त्यांना फार आवड होती. मात्र
, परिस्थितीअभावी त्यांना ते काही काळासाठी शक्य झाले नाही. पदवीधर झाल्यानंतर घरी हातभार लावण्याच्या दृष्टीने त्यांनी गुवाहाटी येथेच काही काळ नोकरी केली. पुढे कंपनीने संधी दिल्यानंतर त्या काही काळासाठी मुंबईत नोकरीसाठी आल्या. काही वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांना दरम्यानच्या काळात आपल्यात होणार्‍या शारीरिक बदलांची जाणीव झाली. याबाबत त्यांनी विविध डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी अनेकांनी त्यांना लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या या सल्ल्यांनी आधी त्यांचे मन पार दुखावले. याबाबत सतत चिंता जाणवू लागल्याने काही काळ नैराश्यही आले. याबाबत अनेक मित्र-मैत्रिणींशीही त्यांनी संवाद साधला. मात्र, ठोस निर्णय घेण्यात त्यांना फार अडचणी येत होत्या. अखेर याबाबत कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कुटुंबीयांना स्वाती यांचा हा निर्णय ऐकून फार धक्काच बसला. बरुहा कुटुंबीयांनी याबाबत स्वाती यांना कडाडून विरोध केला. समाज आपल्याला वाळीत टाकेल, आपल्या घराण्याला लोक नावे ठेवतील, अशा व्यक्तींना समाजात कोणतेही स्थान नसते, पुढचे आयुष्य कसे काढणार, या प्रश्नांच्या भडिमाराने त्यांचे अजून खच्चीकरण केले. त्यामुळे पुन्हा एकदा नोकरी करण्याचा निर्णय घेत त्यांनी मुंबई गाठली. पुन्हा काही वर्षे नोकरी करत त्यांनी पैसे जमवले. नोकरी करताना त्यांनी एलएलबीचे शिक्षणही घेतले. जमवलेल्या पैशांतून त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पण का कुणास ठाऊक नियतीच्या मनात काय होते? शस्त्रक्रियेआधी त्यांनी आपल्या कुटुंबीयांना कळविले. स्वाती यांनी शस्त्रक्रिया करू नये यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे पैसे जमविलेले बँक खातेच गोठवून टाकले. यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या पदरी नैराश्य आले. काही काळानंतर त्यांनी पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. याही वेळी कुटुंबीयांकडून विरोध होत असल्याने त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला.


२०१२
साली त्यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर त्या सर्वत्र प्रकाशझोतात आल्या. जवळपास वर्षभर या प्रकरणावर सुनावणी चालली. अखेर न्यायालयाने स्वाती यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाच्या निकालानंतरही शस्त्रक्रियेबाबतच्या त्यांच्या निर्णयाबाबत त्यांचे कुटुंबीयांचे एकमत होऊ शकले नाही. यानंतरही अनेक सदस्यांकडून त्यांना विरोध केलाच जात होता. अखेर आपली जिद्द कायम ठेवत त्यांनी आपल्यावर शस्त्रक्रिया करून घेतली आणि स्वतःची नवी ओळख समाजापुढे निर्माण केली. तृतीयपंथी (ट्रान्सजेन्डर) म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर नेहमी एक चौकटीतील प्रतिकृती उभी राहते. जिचे स्वतःचे अस्तित्व नसते. समाजातील वेगळे सन्मानाचे स्थान नसते. नेहमी टवाळ-टिंगल करणार्‍या, अस्पृश्य व्यक्ती म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, तृतीयपंथीयांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी बदलण्याचा निर्णय घेतला. तृतीयपंथी व्यक्तीही समाजात सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे वावरू शकतात, हे जगाला दाखवून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी वाटेल ती मेहनत करण्याची तयारी त्यांनी केली. आसाममध्ये राष्ट्रीय लोकअदालतीच्या न्यायाधीशपदासाठी त्यांनी अर्ज केला. यासाठी पात्रतेच्या आवश्यक त्या सर्व बाबी त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांची न्यायाधीशपदासाठी नियुक्ती झाली. आसाममधील पहिल्या आणि देशातील तिसर्‍या तृतीयपंथी न्यायाधीश म्हणून त्या कार्यरत आहेत. न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी समाजापुढे स्वतःची ओळख निर्माण केलीच, तसेच तृतीयपंथीयांना समाजात सन्मान मिळवून देण्याचेही त्यांनी काम केले. स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करणार्‍या स्वाती यांच्या जिद्दीला सलाम!


- रामचंद्र नाईक

 

@@AUTHORINFO_V1@@