कोल्हापुरात पुन्हा 'जल'तांडव ; धरणांच्या पातळीमध्ये वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2019
Total Views |


 


कोल्हापूर : मागच्याच महिन्यात सांगली, कोल्हापूरमध्ये हाहाकार माजवल्यानंतर गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु १५ दिवसांनी पुन्हा एकदा पावसाने कोल्हापूरमधील धरण क्षेत्रात हजेरी लावली आहे. भोगावती नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर वाहत आहे, तसेच १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये पूरस्थिती ओढावते का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

 

जिल्ह्यातील राधानगरी, कुंभी, कासारी, तुळशी, वारणा व दूधगंगा धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून पंचगंगा नदी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. दरम्यान, गगनबावडामधील भुईबावडा घाटात दरड कोसळली असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

 

राधानगरी परिसरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून ७११२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. कुंभीमधून १८००, कासारीमधून १८००, तुळशीमधून १११०, वारणामधून ८३०५ व दूधगंगा धरणातून ८८०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सध्या राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी २४ फूट ०३ इंच इतकी असून रात्रीतून ६ इंच वाढण्याची शक्यता आहे. कोयना धरणातूनही १ लाख क्युसेक विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@