फार लवकर जिरली पाकिस्तानची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2019
Total Views |
 
 
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारताने हटविल्यानंतर, पाकिस्तान जगभर बेंबीच्या देठापासून बोंबलत सुटला होता. भारताला अणुयुद्धाची धमकी देण्यापर्यंत पाकिस्तानची मजल गेली होती. अजूनही तिथल्या अनेक नेत्यांच्या तोंडून युद्धाची भाषा निघते आहे. एकीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, पंतप्रधान इम्रान खान कटोरा घेऊन भीक मागत फिरत आहे, अमेरिकेने बुडावर लाथ मारली आहे, चीनचा डोळा पाकिस्तानी भूमीचा वापर करण्यावर आहे आणि अशा स्थितीत पाकिस्तानी राज्यकर्ते, लष्कर, आयएसआय हे भारताला युद्धाची धमकी देऊन घाबरवण्यााचा प्रयत्न करताहेत. हे सगळेच हास्यास्पद आहे. भारताने कलम 370 हटविल्याबरोबर पाकने भारताशी असलेले व्यापार संबंध तोडले होते. त्याचा भारताला जसा तोटा होणार होता, तसाच तो पाकिस्तानलाही होणार होता. भारताच्या तुलनेत पाकला जास्त मोठा फटका बसला आहे, तरीही पाकने व्यापारबंदी सुरूच ठेवली. एका हाती भिकेचा कटोरा असताना पाकिस्तानने भारतासोबत व्यापारबंदीचे धाडस दाखविले, ही काही सामान्य बाब नव्हे. पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच होते. जगभरातून भारताच्या भूमिकेचे समर्थन झाल्यानंतर तर पाकिस्तानच आणखीच खवळला होता आणि निराशही झाला होता. नैराश्यातून अनेकदा टोकाचे पाऊल उचलले जाते, तसे पाकिस्ताननेही व्यापारबंदीसारखे पाऊल उचलले. पण, आता महिनाभरातच पाकिस्तानचा माज उतरल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने भारतापुढे गुडघे टेकले आहेत. आधीच भिकेला लागलेल्या पाकिस्तानात लोकांच्या खाण्यापिण्याचे वांदे असताना इम्रान खानच्या तोंडी युद्धाची भाषा शोभत नाही. पण, उसने अवसान आणत देशातील जनतेचे समाधान करण्यासाठी आणि स्वत:चा नालायकपणा लपवण्यासाठी इम्रानने नको ते धाडस दाखविले.
  
मात्र, आता पाकिस्तानची चांगलीच जिरली असल्याचे दिसते आहे. पाकिस्तानातील रुग्णालयांमध्ये आणि औषधांच्या दुकानांमध्ये जीवनरक्षक औषधांचा तुटवडा आहे. या औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. ही औषधे परवडणार्या दरात पाकला फक्त भारताकडूनच मिळू शकत असल्याने पाकिस्तान सरकारने भारतासोबतची व्यापारबंदी अंशत: उठवण्याचा घेतलेला निर्णय त्यांची अगतिकता व्यक्त करणाराच आहे. वास्तविक, भारताने कलम 370 रद्द केल्याने पाकने चवताळण्याची वा भारताविरोधी भूमिका घेण्याची गरज नव्हती. कारण, भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरबाबत मोदी सरकारने निर्णय घेतला होता. त्याच्याशी पाकचा काही संबंध नव्हता. तरीही पाकने भारताशी सर्व प्रकारचे संबंध तोडले.
  
कारण, पाकिस्तानातील राजकारणच भारतद्वेषावर आधारलेले आहे. भारताला शिव्या घातल्याशिवाय तिथे सत्तेत राहणे, जनतेची सहानुभूती मिळवणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे त्या अगतिकतेतून इम्रान खानने निर्णय घेणे समजण्यासारखे असले, तरी बिघडलेले संबंध आता सुधारण्यापलीकडे गेले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे इम्रान खान भारताविरुद्ध गरळ ओकत असताना पाकिस्तानी मीडिया आणि तेथील असंख्य लोक इम्रानला झोडपून काढत आहेत. भारताने काश्मीरला लागू असलेले कलम 370 केव्हा रद्द केले हे इम्रान खान आणि त्याच्या मंत्रिमंडळाला कळलेदेखील नाही. 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारने संसदेत 370 हटवण्याला मंजुरी मिळवली आणि एक ऐतिहासिक चूक, जी नेहरूंनी केली होती, दुरुस्त झाली. ओवैसी, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा यासारखे जे पाकधार्जिणे नेते आहेत, त्यांनी तर आधी बोलताना 370 रद्द करणे अशक्यप्राय असल्याचे म्हटले होते. या सगळ्यांनाही मोदी सरकारने जोर का झटका दिला होता. त्यातून ते अजूनही सावरलेले नाहीत.
इम्रान खान यांनी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण, सगळ्याच व्यासपीठांवर ते तोंडावर आपटले. ज्या अमेरिकेच्या भरवशावर ते उड्या मारत होते, त्या अमेरिकेनेही मध्यस्थी करण्यास स्पष्ट नकार दिल्याने इम्रान खान यांची चांगलीच गोची झाली. आता कालपरवा पाकिस्तानी वकिलानेही पाकला जोरदार झटका दिला आहे. काश्मीरच्या वर्तमान स्थितीबद्दल आपला दावा सिद्ध करण्यासाठी एकही ठोस पुरावा पाककडे नाही, अशी कबुली पाकिस्तानचे वकील खावर कुरेशी यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिल्याने पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे.
 
कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी, काश्मिरात लोक मरत आहेत असे मूर्खपणाचे वक्तव्य केले होते. त्याचा आधार घेत पाकने आंतरराष्ट्रीय न्यायालयात युक्तिवाद करण्याचा केलेला प्रयत्नही र्विेंल ठरला आहे. एकूणच काय की, सगळ्याच आघाड्यांवर पाकिस्तान चारीमुंड्या चीत झाला आहे. एकीकडे इम्रान खान युद्धाची भाषा करून आणि अणुयुद्ध झाल्यास संपूर्ण जगाला त्याचा धोका आहे असे सांगून घाबरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असतानाच, त्यांच्याच देशातले लोक त्यांच्यावर टीका करीत आहेत. चीनने पाकची साथ देण्याचा प्रयत्न करण्यामागे चीनचाही स्वार्थ आहे. पण, चीननेही पूर्ण साथ दिली नाही. कारण, चीनला भारतीय बाजारपेठेचे महत्त्व चांगले माहिती आहे. आज चीन आणि तुर्कस्तान वगळता जगातले सगळे देश भारतासोबत आहेत. ही बाब लक्षात घेतली तर पाकिस्तान आता वाकड्या नजरेने भारताकडे पाहण्याचे धाडस करणार नाही. एकीकडे पाक युद्धाची भाषा वापरत आहे, तर दुसरीकडे भारत आपली सामरिक शक्ती वाढवत चालला आहे. कालपरवाच भारताच्या वायुदलात अपाचे एएच-64 ई लढाऊ हेलिकॉप्टर्स दाखल झाले आहेत. केवळ नजरेच्या इशार्यावर क्षेपणास्त्रे नि मिनिटाला 625 गोळ्या झाडण्याची क्षमता असलेले हे हेलिकॉप्टर्स भारताची ताकद बनले आहेत. शिवाय, पाकिस्तानचे एक-16 विमान पाडणारा वैमानिक अभिनंदन पुन्हा रुजू झाला असून, त्याने मिग विमानातून उड्डाणही भरले आहे.
 
 
त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानला धडकी भरलीच असणार. पाकिस्तानची लष्करी ताकद ही भारताच्या अर्धीही नाही आणि पाकिस्तानी सैन्याचे मनोबलही ढासळलेले आहे. अशा परिस्थितीत भारताशी युद्ध करणे पाकिस्तानला अजीबात परवडणारे नाही. शस्त्रास्त्रे, अण्वस्त्रे, मजबूत मनोबल असलेले सैनिक या सगळ्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या फार पुढे आहे. त्यामुळे युद्धाचा विचार मनात आणून पाकने हात दाखवून अवलक्षण करवून घेऊ नये. कलम 370 रद्द करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत आणि देशाबाहेर आंतरराष्ट्रीय पातळीवर परिस्थिती अतिशय हुशारीने सांभाळली. दोन्ही आघाड्यांवर मोदींची मुत्सद्देगिरी यशस्वी ठरली. काश्मिरात आणि देशात कुठेही हिंसाचार घडू दिला नाही आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही कुठे भारताविरुद्ध सूर निघू दिला नाही. भारताच्या सुरक्षा दलांनीही अतिशय चोख कामगिरी बजावली. जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, हे मान्य करण्यास मोदी यांनी जागतिक समुदायाला भाग पाडले. याउलट स्थिती इम्रान खानची आहे. तिथली जनता त्यांच्यावर नाराज आहे, सातत्याने टीका करीत आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्येही इम्रानला ठोकले जात आहे. हे सगळे घडवून आणले मोदींच्या मुत्सद्देगिरीनेच!
@@AUTHORINFO_V1@@