गांधी यांच्यासाठी भगवद्गीता ही मातृसम : रमेश पतंगे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2019
Total Views |



नाशिक : सार्वजनिक वाचनालय अर्थात सावानाच्या वतीने म. गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंतीनिमित्त महात्मा गांधी विचारमाला व्याख्यानाअंतर्गत 'गांधी समजून घेताना' या विषयावर व्याख्यान देताना साहित्यिक आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्था, मुंबईचे अध्यक्ष रमेश पतंगे म्हणाले की, "फळाची अपेक्षा न करता कर्म करणे, कोणत्याही प्रकारची आसक्ती न बाळगणे, हे भगवद्गीतेतील तत्त्व महात्मा गांधी यांनी आचरणात आणले. गांधी यांच्यासाठी गीता मातृसम होती." याप्रसंगी सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, श्रीकांत बेणी, जयप्रकाश जतेगावकर, किशोर पाठक, बी. जी. वाघ, देवदत्त जोशी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी पतंगे म्हणाले की, "लंडन येथील वास्तव्यादरम्यान गांधी यांनी भगवद्गीता समजून घेतली व स्वत्वाचा शोध घेण्यास सुरुवात केली. येथील वास्तव्यादरम्यान गांधी यांचे आत्मभान जागृत झाले. तसेच, आसक्ती निर्माण झाल्यास ती हिंसेला जन्मास घालते, त्यामुळे अहिंसेचे पालन करण्यासाठी आसक्ती बाळगू नये, हे गीतेतील तत्त्व गांधी यांनी आचरणात आणल्याचे पतंगे यांनी यावेळी सोदाहरण स्पष्ट केले. गांधीजी समजून घेताना कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह असता कामा नये," असे सांगताना पतंगे यांनी सोदाहरण मांडणी करत या विषयावरील आपला प्रवासाचा शुभारंभ यावेळी उपस्थितांसमोर विशद केला. गांधीजी समजून घेताना गांधी यांनी स्वतः लिहिलेली ग्रंथसंपदा आपण वाचून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गांधी यांच्या वैचारिक जडणघडणीत भगवद्गीता, उपनिषद यांचे मोठे योगदान असल्याचे पतंगे यांनी यावेळी सांगितले.

 

गांधी यांनी सर्वसामान्य माणसाशी एकरूप होण्यासाठी आपला पोशाख पंचा ठेवला आणि हीच त्यांची जीवननिष्ठा असल्याचे पतंगे यांनी यावेळी सांगितले. यावेळी पंचम जॉर्ज भेटीचा प्रसंग उपस्थितांसमोर त्यांनी मांडला. पंचम जॉर्ज याने गांधींचा केलेला सन्मान हा भारताचा, भारतीय शास्त्राचा सन्मान असल्याचे पतंगे यावेळी म्हणाले. यावेळी पतंगे यांनी गांधी यांच्या सत्याग्रहाच्या विचारधारा निर्मितीमागचा इतिहास विशद केला. यावेळी बायबलमधील विविध संदर्भ, त्यातील शिकवण याबाबत पतंगे यांनी भाष्य करताना आर्थिक मंदीबाबत भाष्य केले. 'अन टू दिस लॉज' हे तत्त्व बायबलमधून आले असल्याचे सांगताना यातूनच गांधीजींचे सर्वोदय जन्मास आले, असे पतंगे यावेळी म्हणाले. याचा उगम जॉन रास्किनच्या 'अन टू दिस लॉज'मध्ये असल्याचे पतंगे यांनी यावेळी सांगितले. गांधी यांनी शेवटच्या माणसाचे भले होईल, अशी व्यवस्था असण्याचा आग्रह कायम धरला असल्याचे पतंगे यांनी यावेळी सांगितले. गांधी यांनी मृत्यूपूर्वी काँग्रेसचे विसर्जन करण्याच्या केलेल्या सूचनेबद्दल ते म्हणाले की,"आपली समाजरचना ही समाजसत्ता केंद्री आहे. राजसत्ता केंद्री नाही, गाव सक्षम करण्यासाठी सर्वोदयी समाज, स्वयंपूर्ण गाव उभारण्यासाठी आणि आपली हजारो वर्षांची परंपरा ती आपल्या जीवनमूल्ये आणि समाजरचनेत यावी, यासाठी गांधी यांनी काँग्रेस विसर्जनाचा विचार मांडला" असल्याचे पतंगे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अ‍ॅड. अभिजित ब. गदे यांनी केले तर आभार अ‍ॅड. भानुदास शौचे यांनी मानले तर सूत्रसंचालन संजय करंजकर यांनी केले.

 

"गांधी यांच्यासारखे जीवन जगणे आजमितीस अवघड असले तरी, त्यांचे स्वदेशीचा वापर, स्वच्छता, समरसता, सर्वसमावेशक हिंदुत्व जगणे यापैकी जीवनातील एखादे तत्त्व तरी आपण जीवनात आचरणात आणू शकतो का, याबाबत सर्वांनी मंथन करावे."

 

- रमेश पतंगे

अध्यक्ष, हिंदुस्थान प्रकाशन संस्था, मुंबई

@@AUTHORINFO_V1@@