निष्ठावान स्वयंसेवक ते राज्यपाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2019   
Total Views |




उत्तर भारतीय राजकारणातील प्रमुख चेहरा असलेले महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एक निष्ठावान स्वयंसेवक म्हणूनही ओळखले जातात, त्यांच्याविषयी...


रा. स्व
. संघाचे निष्ठावान स्वयंसेवक मानले जाणार्‍या भगतसिंह कोश्यारी यांची ३० ऑगस्ट, २०१९ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची नियुक्ती केली. कोश्यारी २००१ ते २००२ पर्यंत उत्तराखंडचे मुख्यमंत्री, २००२ ते २००७ पर्यंत उत्तराखंडचे विरोधी पक्षनेते, २००८ ते २०१४ पर्यंत उत्तराखंडमधून राज्यसभेतील सदस्य आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी नैनिताल-उधमसिंगनगर विधानसभेतून खासदार म्हणून ते निवडून गेले. साठीच्या दशकात उत्तर प्रदेशातील कासगंज या गावात त्यांनी पाच वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली होती. त्यामुळे आजही या भागातील वयोवृद्ध त्यांना ‘गुरुजी’ या नावाने ओळखतात. भारतीय जनता पक्षातील एक राजनीतीज्ञ, असेही त्यांना मानले जाते. आपले संपूर्ण जीवन रा. स्व. संघ आणि भाजपला वाहून घेतलेल्या कोश्यारी यांच्या अनुभवाचा राजकीय फायदा महाराष्ट्राला यानिमित्ताने होऊ शकतो, अशी आशा राजकीय वर्तुळातून यावेळी व्यक्त केली जात आहे.



भगतसिंह कोश्यारी यांचा जन्म १७ जून
, १९४२ रोजी उत्तराखंड येथील बागेश्वर जिल्ह्यातील एका गावात झाला. उत्तराखंड येथील अलमोरा या शहरात त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी आग्रा विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातील आचार्य’ ही उपाधी मिळवली. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर कोश्यारी नित्यानंद स्वामी यांच्यानंतर भाजपच्या अंतरिम सरकारमध्ये दुसरे मुख्यमंत्री झाले होते. कोश्यारी यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या शिक्षणाच्या काळातच सुरू झाली. शिक्षणासोबत त्यांनी आपले जीवन रा. स्व. संघासाठी समर्पित केले. संघटना कौशल्याच्या जोरावर त्यांनी संघ आणि पक्षपातळीवर मोठ्या प्रमाणावर कामे पार पाडली. एक शिक्षक, पत्रकार म्हणून त्यांनी वेळोवेळी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १९७५ पासून पिथौरगडहून प्रकाशित होणार्‍या ‘पर्वत पीयूष’ या साप्ताहिकाचे ते प्रबंध संपादक होते. तसेच, विविध वृत्तपत्रांमधून तत्कालीन राजकीय घडामोडींवर परखड भाष्य करणारे स्तंभलेखक अशीही त्यांची ओळख होती. बालपण मूळचे उत्तर प्रदेशमध्ये गेल्याने त्यांचे शिक्षण, सामाजिक व राजकीय कारकिर्दीची सुरुवात तिथूनच झाली. त्यांच्या वडिलांचे नाव गोपालसिंह कोश्यारी आणि आईचे नाव मोतिमादेवी कोश्यारी. बालपणापासूनच समाजकार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. महाविद्यालयीन जीवनात १९६१ ते १९६२ दरम्यान त्यांनी विद्यार्थी संघटनेचे काम पाहिले.



उत्तराखंड येथील शिक्षण क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली
. स्वतः पेशाने शिक्षक असल्याने त्यांना शिक्षणाची जाण होती. पिथौरागड येथील सरस्वती शिशू मंदिर, विहार उच्च माध्यमिक शाळा आदी शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. नैनिताल येथील सरस्वती विहार उच्च माध्यमिक शाळेची स्थापनाही त्यांनी केली. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारविरोधात त्यांनी आवाज उठवला होता, परिणामी, त्यांना १९७७ मध्ये तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, त्यानंतरही त्यांचा प्रचारकार्यातील सक्रिय सहभाग पाहता त्यांच्यावर पक्षातून विविध जबाबदार्‍याही सोपविण्यात आल्या आणि त्यांनी त्या लिलया पेलल्याही. आपले संपूर्ण आयुष्य अविवाहित राहून रा. स्व. संघ आणि भाजपच्या संघटन कार्यासाठी त्यांनी वेचले.



उत्तराखंड येथून पक्षाचे सदस्य ते अध्यक्ष असा प्रवास त्यांनी पाहिला आहे
. आता राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यांनी यानंतर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द केला. आयुष्यभर पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल संघटनेकडून महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी देऊन त्यांच्या निष्ठेची दखल घेण्यात आली. कोश्यारी यांना ऐतिहासिक आणि धार्मिक पुस्तके वाचण्याची विशेष आवड आहे. ‘उत्तरांचल प्रदेश क्यों?’, ‘उत्तरांचल संघर्ष एवम समाधान’ ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांना ट्रेकिंगची विशेष आवड आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत १९९९ मध्ये उत्तर प्रदेश याचिका समितीचे सदस्य म्हणून ते नियुक्त झाले. १९९७ ते २००० ते उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमध्ये त्यांनी विविध समित्यांवर कामगिरी बजावली होती. २००९ ते १०१४ मध्ये राज्यसभा याचिका समिती अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले, २०१४ मध्ये १६ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून ते निवडून गेले होते. या दरम्यान २००१ मध्ये उत्तरांचलमध्ये (तत्कालीन नाव) त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली होती. उत्तराखंडची निर्मिती झाल्यावर त्यांच्याकडे ऊर्जा आणि जलसिंचन मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर सरकार स्थापन झाल्यावर पाच वर्षे त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. मात्र, त्या काळात उत्तराखंडचे भाजपचे प्रतिनिधीत्व त्यांनी केले आणि तितक्याच जोमाने पक्षविस्तार केला. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा फायदा राज्याला निश्चित होईल. राजभवनावर गुरुवार दि. ५ सप्टेंबर रोजी त्यांनी शपथ घेतली. त्यापूर्वी त्यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांच्या या नव्या कारकिर्दीला दैनिक ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा...!

@@AUTHORINFO_V1@@