नव्या शक्यतांच्या उंबरठ्यावर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2019
Total Views |


 


भारत व रशिया दरम्यानच्या दोन दिवसांच्या बैठका मॉस्कोत होत नसून ब्लॉदीवोसतॉक येथे होत आहेत. ब्लॉदीवोसतॉकचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. चीनच्या उत्तर पूर्व बाजूला जपानी समुद्रावर हा भाग आहे. चीनला जो काही संदेश यातून जायला हवा, तो काहीही न करता रशिया व भारत देणार आहेत.


अमेरिकेच्या पाळण्यातून कलंडलेला पाकिस्तान आपल्या कुशीत घेणारा चीन, ट्रम्पसारख्या नेतृत्वाखाली भांबावलेला अमेरिका. भौगोलिक विस्तारापेक्षा आर्थिक सहकार्यातून किंवा मिंधेपणा निर्माण करून आपले साम्राज्य वाढविण्याचा जगाचा कल आणि येत असलेली मंदी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेत आहेत. नव्या आघाड्या-बिघाड्या होत असताना आणि राजकीय पटलावर भारत एक नवा चेहरा आणि पवित्रा घेऊन उभा राहात असताना मोदी आणि पुतीन यांच्यात काय खलबते होऊ शकतात, याबद्दल सगळ्या जगाला उत्कंठा आहे. लहान आशियायी देशांना चीनपेक्षा भारत जवळचा वाटत असण्याची प्रक्रिया मागेच सुरू झाली आहे. पुलवामा आणि त्यानंतर झालेला हवाई हल्ला आणि नुकतेच हटविलेले कलम ३७० या सगळ्या पार्श्वभूमीवर चीन वगळता भारताच्या बाजूने उभे राहिलेले जग, यामुळे येणाऱ्या काळात जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असेल, हे सिद्ध झाले होते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोदी व पुतीन यांची भेट काही वेगळी समीकरणे निर्माण करेल. त्यापूर्वी जे काही या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून प्रतीत होत आहे, तेही विचार करायला लावणारे आहे. शस्त्रास्त्रनिर्मिती हा जगातला एक मोठा व्यापार. विस्तारवादी राष्ट्रांनी त्याचा मोठा आधार घेतला आहे. चीनविषयी कुठल्याही देशाला खात्री नसल्याने शस्त्रास्त्राचा चिनी व्यापार चीनच्या अपेक्षेइतका पसरलेला नाही. मात्र, अमेरिकेने यात प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. ही मक्तेदारी केवळ दरांची नसून ती तंत्रज्ञानाचीदेखील आहे. मोदींनी आपल्या रशिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जे पहिले भाष्य केले, ते याच आधारावर केले आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. तंत्रज्ञानाचा योग्य प्रसार झाला तर भारत व रशिया एकत्र येऊन तिसऱ्या जगातील देशांना शस्त्रास्त्र पुरवू शकतात. केवळ पुरवू शकत नाहीत तर ती अत्यल्प दरात पुरवू शकतात. शस्त्रनिर्मिती हा प्रदीर्घ काळापासून वादाचा मुद्दा राहिला आहे. मात्र, शस्त्रनिर्मिती करणारे देशच याबाबत पुढाकार घेत असतात, असे नीट निरीक्षण केले तर लक्षात येईल.

 

२००१ साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मॉस्कोला गेले होते, त्यावेळी पुतीननी मोठ्या मनाने पुढे येऊन त्यांची भेट घेतली होती. सारे राजशिष्टाचार बाजूला ठेऊन पुतीन यांनी ही भेट घेतली होती. मोदी अटलजींसोबत रशियाला गेले होते, यावर मोदींचे म्हणणे होते की, मला कुठेही कमीपणाचा भाव निर्माण होईल, अशी वागणूक यावेळी मिळाली नाही. जागतिक राजकारणाच्या पटलावर या संकेतदर्शनाला मोठे महत्त्व असते. परस्परांसमोर उभे राहिलेले हे नेते परस्परांच्या महत्त्वाकांक्षा पुरत्या ओळखून असतात. जिथे या महत्त्वाकांक्षांचे मिलाफ होतात, तिथे काही नव्याने घडायला सुरुवात होते. यासाठी सर्वच स्तरावर एकरूपता यावी लागते. ही दोस्ती असली तरी परस्परांचे हिशोबही तितकेच जुळावे लागतात. पुतीन व रशिया यांच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन काहीही असला तरीही भारताच्या संदर्भातील वास्तव काही निराळे आहे. रशियाच्या तेल व खनिज वायू क्षेत्रात २०१६ च्या पहिल्या सहामाहीत भारतीय उद्योगांनी केलेली गुंतवणूक ५५० कोटी डॉलर्स इतकी प्रचंड आहे. याचे श्रेय नव्याने आलेल्या भारत सरकारचे आहे. साधारणत: ३०० मोठ्या भारतीय कंपन्या रशियात सक्रिय आहेत. डिसेंबर २०१४ साली भारत व रशिया यांच्यामधील व्यापार २०२५ पर्यंत करण्याचा मानस या दोन्ही देशांनी व्यक्त केला होता व तशा प्रकारच्या धोरणविषयक वाटचालीला सुरुवात केली होती, त्याचाच हा परिणाम आहे. मोदी सरकारची ही पहिलीच पायरी होती आणि त्याने ईप्सित यशदेखील प्राप्त केले. भारत आणि रशिया यांच्यामधील अंतरिक्ष कार्यक्रम हा रशियाच्या खांद्यावरूनच प्रक्षेपित झाला होता. आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह ज्या अंतरिक्ष वाहनाच्या माध्यमातून अंतराळात पोहोचविला गेला, ते रशियन बनावटीचे होते. परम संगणकाच्या निर्मितीपूर्वी महासंगणक भारताला देण्यासाठी अमेरिकेने जशी नाके मुरडली होती, तसे रशियाने केलेले नाही. आता केए २२६ ही युद्धात वापरली जाणारी हेलिकॉप्टर्स भारतात उत्पादित करण्याचा मानस दोन्ही देशांनी व्यक्त केला आहे. रशियन बनावटीची ही हेलिकॉप्टर्स त्यांच्या कुशल संचलनासाठी ओळखली जातात. उद्या भारत ही हेलिकॉप्टर्स निर्माण करू शकला, तर स्वत:च्या गरजांव्यतिरिक्त अन्य लहान देशांनाही त्याचा लाभ मिळू शकतो. अमेरिकन हेलिकॉप्टर्सना पर्याय म्हणूनही ही हेलिकॉप्टर्स समोर येऊ शकतात.

 

दरवर्षी आपल्या लष्करी मनुष्यबळाच्या एकत्र कवायती करण्याचा प्रस्तावही दोन देशांमध्ये आहे. एका निराळ्याच प्रदेशात भारत-रशिया संबंध प्रवेश करण्याची शक्यता इथे निमार्र्ण होऊ शकते. कुठल्याही देशांमधील नाते हे केवळ लष्करी व व्यापारी संबंधांवर चालू शकत नाही. त्यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाणही तितकीच करावी लागते. ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ रशियाने मोठ्या मनाने स्वीकारला आणि साजराही केला. ६७ प्रांतात या कार्यक्रमात ३७ हजारांहून अधिक योगप्रेमी रशियन लोकांनी आपला सहभाग नोंदविला होता. याव्यतिरिक्त मॉस्कोत ‘नमस्ते रशिया’ हा उपक्रमही भारताकडून सुरू केला गेला आहे, यालाही मोदी सरकारचीच साथ आहे. भारतीय भाषांचा प्रभावही रशियातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांमध्ये वाढत आहे. आज ४५०० भारतीय विद्यार्थी रशियात शिकत आहेत. आजच्या घडीला साधारणत: तीस हजार भारतीय लोक रशियात नागरिकत्व घेऊन राहत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रशिया व भारतातील नेते व अधिकाऱ्यांची दोन दिवसांची भेट ही मॉस्कोत होत नसून ब्लॉदीवोसतॉक येथे होत आहे. ब्लॉदीवोसतॉकचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. चीनच्या उत्तर पूर्व बाजूला जपानी समुद्रावर हा भाग आहे. चीनला जो काही संदेश यातून जायला हवा, तो काहीही न करता रशिया व भारत देणार आहेत. त्यामुळे पाकिस्तान नावाचे शेंबडे पोर किती काळ आपल्या मांडीवर घेऊन बसायचे, याचा विचार चीनला करावा लागणार आहे. भारत व रशिया यांचे संबंध हे आजचे नाहीत, ते नेहरूंपासूनचे आहेत. मात्र, त्या संबंधांमधली सुधारणा ही मूल्यात्मक व गुणात्मक अशा स्वरूपाची आहे. भारत आता रशियाच्या धान्यावर आपल्या लोकसंख्येचे पोट भरणारा देश राहिलेला नसून खांद्याला खांदा लावून गुंतवणूक करणारा देश झाला आहे आणि हाच या नातेसंबंधांचा नवा आधार असेल.

@@AUTHORINFO_V1@@