तोंडापर्यंत आलेला घास हिराऊ नका! ; आयुक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2019
Total Views |


 


मुंबई : मेट्रो रेल्वे हा विकासाचा मार्ग आहे. मेट्रोचे काम बरेचसे काम पूर्ण होत आले आहे. तोंडापर्यंत घास आला आहे. त्यात काही ना काही कारणांनी अडचणी निर्माण करू नका, असे कळकळीचे आवाहन आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी स्थायी समितीत केले. स्थायी समिती सभेच्या सुरुवातीलाच सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी मट्रो कारशेडसाठी वृक्षप्राधिकरणाने आरे कॉलनीतील वृक्षतोडीला दिलेली मंजुरी आणि त्याविरोधात एका वृक्षप्रेमीने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका यामुळे सभातहकुबी मांडली होती. या गंभीर विषयासाठी आयुक्त प्रवीणसिंह परदेशी सभागृहात उपस्थित होते. मेट्रो रेल्वे, मेट्रो कारशेड आणि वृक्षतोड याबाबत बाजूने आणि विरोधात असलेली नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतर आयुक्त बोलत होते. आयुक्त म्हणाले की, मेट्रो रेल्वे हा विकासाचा मार्ग आहे. या रेल्वेचे मार्ग बरेचसे पूर्ण होत आले आहे. म्हणजे घास तोंडापर्यंत आला आहे, असे सांगतानाच हा घास हिराऊन घेऊ नका असे त्यांनी नकळतपणे नगरसेवकांना सुनावले. नगरसेवकांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांची त्यांनी मुद्देसूदपणे उत्तरे दिली.

 

कांजूरमार्गची जागा गोत्यात आणणारी

 

आयुक्त म्हणाले की, मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीचीच जागा का, कांजूर मार्गची जागा का नाही, असा अनेकांचा प्रश्न आहे. कांजूरमार्गची जागा वैयक्तिक मालकीची आहे. शिवाय ती कोणाची आहे हे निश्चित नाही. त्यासाठी दोघांचे भांडण आहे. शिवाय ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालू आहे. त्या जागेची किंमत ५००० कोटी रुपये आहे. जागेची किंमत आणि न्यायालयीन प्रक्रिया व इतर कामासाठी ५००० कोटी अतिरिक्त खर्च लक्षात घेता यासाठी मोठा खर्च येणार आहे. शिवाय कामही लांबणीवर पडणार आहे. शिवाय ही शासकीय जागा नाही. शासकीय जागा उपलब्ध असताना खासगी जागेसाठी जनतेचा पैसा खर्च करणे ही गंभीर बाब आहे.

 

कारशेड मेट्रोचा आत्मा

 

मेट्रोचे एक टोक दक्षिणेत, तर कारशेड उत्तरेत (कांजूर मार्ग) असणे म्हणजे अतिरिक्त खर्च वाढतो. त्यासाठी दोन वर्षे विलंब लागला असता. कारशेड मध्यभागी असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरेची जागा पसंत करण्यात आली. आरेची जागा शासकीय आहे. ती वनखात्याचीही नाही. त्यामुळे ती निश्चित करण्यात आली. कारशेड हा मेट्रोचा आत्मा आहे. इंजीन, बोगी यांचे मेंटेनन्स येथे केले जाते.

 

हरकतींना पोर्टलवर उत्तरे

 

मट्रो कारशेडबाबत ८३००० हरकती आल्या. त्यांना वैयक्तिक उत्तरे देणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांची उत्तरे महापालिकेच्या पोर्टलवर टाकण्यात आली आहेत. त्यांनी पुन्हा प्रश्न निर्माण केला नाही, म्हणजे त्यांना उत्तर पटलेले आहे, असे आयुक्त म्हणाले.

 

मेट्रोमुळे पर्यावरणाचे रक्षण

 

वृक्षतोड झाल्यास तापमान वाढेल, पर्यावरणाचा र्‍हास होईल, असे सांगितले जाते. पण त्यातही तथ्य नाही. यूएनसीसी या जागतिक संघटनेने दिलेल्या अहवालानुसार मेट्रोमुळे दिवसाला ७ लाख ते ८ लाख लोक प्रवास करतील. २७०० झाडांमुळे जेवढे पर्यावरणाचे रक्षण होईल त्याच्या कितीतरी पटीने मेट्रोमुळे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे, असेही आयुक्तांनी सप्रमाण पटवून दिले.

 

अशी वापरणार आरेची जागा

 

आरे कॉलनीची जागा १२०० हेक्टर आहे. त्यातील ३३ हेक्टर जागा मेट्रोसाठी वापरण्यात येणार आहे. म्हणजे एकूण जागेच्या अडीच टक्के जागा वापरण्यात येणार आहे. आरेतील एकूण वृक्ष ४९७००० आहेत. त्यातील २७०० वृक्ष तोडण्यात येणार आहेत. त्यातील वड, पिंपळाच्या वृक्षांवर कुर्‍हाड चालवण्यात येणार नाही. एका झाडाच्या बदल्यात ५ ते ६ झाडे लावण्यात येणार आहेत. शिवाय विकासकांनाही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यांनाही झाडे लावणे बंधनकारक करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

 

आयुक्तांच्या आवाहनानंतरही सभा तहकूब

 

वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत शिवसेनाचा विरोध असतानाही वृक्षोतोडीचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. त्याचा वचपा आज शिवसेनेने घेतला. मेट्रोला विरोध नाही, मेट्रो कारशेडलाही विरोध नाही, फक्त वृक्षतोडीच्या निर्णयाला विरोध म्हणून शिवसेनेने काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या मदतीने स्थायी समिती सभा तहकुबीच्या बाजूने मत व्यक्त केले, तर भाजपने विरोधात मत व्यक्त केले.

@@AUTHORINFO_V1@@