फेस्टीवल सेलमध्ये 'जीएसटी' चोरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019
Total Views |




नवी दिल्ली : नवरात्रीदरम्यान सुरू झालेल्या ऑनलाईन फेस्टीवल सेलमध्ये जीएसटी चोरी होत असल्याची तक्रार अर्थमंत्रालयाकडे करण्यात आली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या संस्थेने हा आरोप करत यामुळे सरकारचा मोठा महसूल बुडत असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी एक तक्रार करणारे पत्रक अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना पाठवण्यात आले आहेत.

 

अर्थमंत्रालयाला दिलेल्या तक्रारपत्रात फेस्टीवल सेलमध्ये एफडीआय धोरणाचे उल्लंघन केले जात आहे. सामान्य व्यापाऱ्यांना जराशा चुकांमुळे मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागते. मात्र, ऑनलाईन कंपन्यांच्या या घोटाळ्याविरोधात मात्र कोणतिही कारवाई केली जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या तक्रारपत्रात म्हटल्यानुसार, या कंपन्या थेट बिझनेस-टु-बिझनेस विक्री करत आहेत. त्यातील जीएसटीचा मोठा महसूल बुडवला जात आहे.

 

कंपन्यांनी काही वस्तूंवर घसघशीत सुट जाहीर केली आहे. मात्र, अशावेळी वस्तूच्या मुळ किमतीवर जीएसटी आकारण्याऐवजी आता केवळ वस्तूच्या विक्रीकिमतीवर कर आकारला जात आहे. म्हणजे ८० टक्के सवलत वजा करून उर्वरित किमतीवर जीएसटी आकारण्यात येत आहे. हे नुकसान सरकारला होणार असल्याचे कॅटने म्हटले आहे.

 

ई-कॉमर्स कंपन्या गुंतवणूकदारांच्या जोरावर सरकारचा मोठा महसूल बुडवत आहेत. त्यामुळे त्यांना कोणतेही नुकसान होत नाही, मात्र कमी कर आकारणीचा फटका सरकारला बसत आहे. कॅटच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, कोणत्याही वस्तूच्या मुळ किमतीवर वस्तू व सेवा कर आकारला जायला हवा. मात्र, कंपन्या सवलत वगळून उर्वरित रक्कमेवर कर आकारत आहेत. कोणतीही कंपनी आपले नुकसान करून वस्तू विक्री करत नाही, मात्र, कर बुडवून अशाप्रकारचा व्यवसाय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना कोणतेही स्पष्टीकरण मागविलेले नाही. कॅटने या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@