पक्षश्रेष्ठी माझ्या पाठीशी : आ. नरेंद्र पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019
Total Views |



कल्याण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व कल्याणमधील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास असल्याचा दावा भाजपचे कल्याण पश्चिम मतदारसंघाचे आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. या मतदारसंघातून पवारांऐवजी दुसऱ्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे, यासाठी काही मंडळींनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची काही दिवसांपूर्वी भेटही घेतली होती. मात्र, या मतदारसंघातून पक्षश्रेष्ठींबरोबरच जनतेचाही पाठिंबा असल्यामुळे नक्की यश मिळेल, असा विश्वास नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विश्वास दाखवत कल्याण पश्चिम मतदारसंघातून नरेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत एकूण ५४ हजार, ३८८ मते मिळवून सेनेच्या विजय साळवी ५२ हजार, १६९ यांना पराभूत केले होते. सुमारे दोन हजारहून अधिक मताधिक्क्याने ते विजयी झाले.

 

२०१४ नंतर झालेल्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही भाजपचेच पारडे जड राहिले व युतीची सत्ता पालिकेत आली. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचाच उमेदवार निवडून येणार, असे म्हणत विरोधकांना नरेंद्र पवार यांनी खडे बोल सुनावले आहेत. कल्याण पश्चिम मतदारसंघात सेना आणि भाजपच्याही इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. या इच्छुकांपैकी इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही जणांनी उमेदवारी देण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्षांकडे मागणी केली होती. पण, गेल्या पाच वर्षांतील या मतदारसंघातील माझ्या कामाचे पक्षातील मान्यवर व कल्याणमधील संघ कार्यकर्ते कौतुक करतात. त्यामुळे ते सगळे माझ्या पाठीशी असल्याचे आ. नरेंद्र पवार ठामपणे सांगतात. नरेंद्र पवार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहा वर्ष प्रचारक होते. त्यानंतर महाराष्ट्रातदेखील त्यांनी सक्रिय पातळीवर पक्षाचे काम केले. तसेच त्यानंतर प्रदेशमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. कडोंमपात नगरसेवक, उपमहापौरपदही त्यांनी भूषविले आहे.

 

. नरेंद्र पवार हेच सर्वसंमतीचे उमेदवार

 

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलाच मतदारसंघ. दुर्गाडी किल्ल्यापासून ते सुभेदारवाड्यापर्यंत कल्याणचे वैभव जपणाऱ्या महत्त्वाच्या वास्तू याच मतदारसंघात आहेत. तसेच आजचे नवीन, विस्तारणारे कल्याणही याच मतदारसंघात प्रामुख्याने मोडते. सध्या या मतदारसंघातील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येने येथील नागरिक त्रस्त आहेत. मात्र, या समस्येचा पाठपुरवा विद्यमान आमदारांनी कायमच विधिमंडळात केला. तसेच येत्या पावसाळ्यात पूरग्रस्तांसाठी त्यांनी केलेल्या कामाचेही सर्व स्तरातून कौतूक करण्यात आले. रुक्मिणीबाई रुग्णालयाला जिल्हा दर्जा देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. कल्याण येथील पत्रीपुलाबाबतही त्यांचा लक्षणीय पाठपुरावा राहिला आहे. एकूणच, भाजपमधून आ. नरेंद्र पवार हेच सर्वसंमतीचे उमेदवार असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

@@AUTHORINFO_V1@@