मोदींचा बुद्ध, इम्रानचे युद्ध...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019
Total Views |
 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत भाषण करताना, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जे भाषण केले, ते पाहता एखादा दहशतवादीच भाषण देत आहे की काय, असेच जाणवले. दोन मुद्यांवर इम्रानने भर दिला. एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी उच्चारलेल्या ‘रॅडिकल इस्लामिक टेररिझम’ आणि दुसरा आवडता विषय म्हणजे काश्मीर. पहिल्या विषयावरही ते खूपकाही बोलले. स्वत:ला एकीकडे शांतिदूत म्हणत असतानाच, कुख्यात क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन याच्या विचारसरणीचाही त्यांनी पुरस्कार केला. अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांनी रॅडिकल इस्लामिक टेररिस्ट हे नाव पुढे आणले व त्यामुळे मुस्लिम समुदायात संताप व्यक्त होत असल्याने असा शब्दप्रयोग करणे सोडून द्यावे, असा सल्ला इम्रान यांनी दिला. याच इम्राननी, आमच्या देशात 30 ते 40 हजार दहशतवादी आहेत, अशी कबुली स्वत:च गतवेळी ट्रम्प यांच्या भेटीच्या वेळी जाहीर रीत्या दिली होती. हे 30 ते 40 हजार दहशतवादी कसे काय एकाच देशात निर्माण झाले? त्यांचे पालनपोषण कोण करतो? त्यांना शस्त्रे आणि पैसा कोण पुरवितो? भारतात मारल्या गेलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना प्रशिक्षण कोण देतो? जगाला माहीत आहे. इम्रान खान यांनी हेही कबूल केले की, ओसामा बिन लादेनला आमच्या देशाने आश्रय दिला होता. त्यांनी एखाद्या मुस्लिम धर्मगुरूप्रमाणे उपदेशही केला. इस्लामी समुदाय इस्लामशिवाय दुसरा कोणताही धर्म मानत नाही. प्रत्येकच धर्मात जहाल आणि मवाळ असतात. काही जण स्वतंत्र मनोवृत्तीचे असतात. कोणताही धर्म हा जहालपण शिकवत नाही.
सर्व धर्माचा मूळ गाभा हा शांती आणि सर्वांना न्याय हेच शिकवितो. पण, मुस्लिम समुदायाला रॅडिकल म्हटल्यामुळे हा इस्लामोफोबिया जगभरात वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे दुही निर्माण होत आहे. कोणताही धर्म हा दहशतवाद शिकवीत नाही. आज मुस्लिम समुदायामध्ये आधुनिक आणि स्वतंत्र विचाराचे लोक आहेत. जगभरात एकशेतीस कोटी मुस्लिम आहेत, असा अप्रत्यक्ष इशारा देताना, हे सर्व जहाल विचाराचे बनले तर काय होईल, असा प्रश्न इम्रान यांनी केला. याच कारणामुळे पुन्हा दुसरे पुलवामा घडले, तर पाकिस्तानवरच त्याचे खापर फोडले जाईल, असे सांगत पुलवामाचा हल्ला आम्हीच केला, अशी अप्रत्यक्ष कबुलीही इम्रान यांनी दिली.
 
 
 
काश्मीरच्या विषयावर बोलताना त्यांनी आपल्या अकलेचे खूपच तारे तोडले. काश्मीरमध्ये मोदींनी 9 लाख सैन्य आणून तिथल्या 80 लाख लोकांना वेठीस धरले आहे. त्यांना बंदीवासात ठेवले आहे. तेथे संचारबंदी लावली आहे. हे बंदीवासात असलेले लोक जेव्हा बाहेर येतील, तेव्हा सैन्य त्यांच्यावर गोळ्या झाडेल, तेथे रक्तपात होईल, असा अजब तर्क त्यांनी मांडला. काश्मिरातील स्थितीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे, हे इम्रान विसरला. सर्व देशांनी, 370 कलम का रद्द केले, असा प्रश्न उपस्थित केलेला नाही. अगदी इम्रान खान यांनी सुद्धा नाही. आपल्या भाषणात त्यांनी 370 कलम रद्द करण्याची कृती अवैध आहे, असे एकदाही म्हटले नाही. फक्त तेथून संचारबंदी उठवावी, एवढी एका ओळीची मागणी केली. याचा अर्थ, जम्मू-काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे, यावर स्वत: खानसाहेबांनी अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले. सध्या पाकिस्तानातील जनतेला खायला अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही, त्यामुळे जनता त्यांच्यावर खवळली आहे. या मुद्याकडून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी इम्रान वारंवार युद्ध, युद्ध असे ओरडत सुटले आहेत. त्यासाठी ते वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत आहेत व जगाला सांगत आहेत की, युद्ध झाले तर त्याचे परिणाम भारत-पाकिस्तान सीमेबाहेरही होतील. तेव्हा आताच हस्तक्षेप करा. जे इम्रान आपल्या देशात बरळले, त्याचीच री त्यांनी युनोत ओढली.
युनोत उपस्थित देशांनी भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांच्या पंतप्रधानांचे भाषण ऐकले. त्यांची तुलना केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय संयमित, समर्पक भाषण करीत अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधले. दहशतवाद हा काही एका देशाचा प्रश्न नाही, संपूर्ण जगासमोर उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे. याविरुद्ध संपूर्ण जगाने एकजूट होऊन मुकाबला करणे अनिवार्य आहे. कारण, दहशतवाद हा समस्त मानवजातीसाठी धोकादायक आहे. आमच्या आवाहनात दहशतवादाच्या विरोधात जगाला सतर्क करण्याचे गांभीर्यही आहे आणि आक्रोशही, अशा शब्दांत मोदींनी अप्रत्यक्षपणे भारताच्या मनातील वेदनाही सूचित केल्या. भारताने गेल्या पाच वर्षांत केलेल्या लक्षणीय सुधारणांकडे आणि आगामी पाच वर्षांतील, आपल्या जनतेसाठी आखण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांकडे जगाचे लक्ष वेधले. मोदींनी आपल्या 17 मिनिटांच्या भाषणात एकदाही पाकिस्तानचे नाव घेतले नाही. इम्रानने मात्र 12 वेळा मोदींच्या नावाचा उल्लेख केला. जागतिक व्यासपीठाची गरिमा राखून काय बोलावे, याचा वस्तुपाठ मोदींनी घालून दिला, तर इम्रानने आक्रस्ताळेपणाचा कळस गाठला. न्यू यॉर्क टाइम्ससारख्या भारतविरोधी वृत्तपत्रानेही मोदींच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक केले, ते यासाठीच. युनोच्या क्रमानुसार मोदींचे भाषण सातव्या क्रमांकावर होते, तर खान यांचे दहाव्या. त्यांनाही 17 मिनिटे वेळ दिली असताना, 45 मिनिटे घेतली व भारताविरुद्ध गरळ ओकली. पण, भारताने प्रत्युत्तर देण्याचा आपला हक्क बजावला. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या प्रथम सचिव विदिशा मित्रा यांनी इम्रानच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला. दहशतवादाचे अनेक उद्योग स्थापित करणार्या इम्रानसारख्यांनी दहशतवादावर बोलू नये, असे त्यांनी सुनावले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर बोललेल्या प्रत्येक शब्दाला किंमत असते. येथे तर इम्रान खान यांनी आपले संपूर्ण भाषण जगात दुही, द्वेष, भेदभाव यालाच समर्पित केले आहे. संधी दिली म्हणून इम्रान खान यांनी या महासभेचा दुरुपयोगच नव्हे, युनोचा अपमानही केला आहे. रक्तपात, हातात बंदूक घेईन, वांशिक भेदभाव असे उद्गार काढून इम्रान खान यांनी गरिमेला नख लावले. खान म्हणाले, आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानात येऊन दहशतवादी संघटनांची शहानिशा करून घ्यावी.
 
 
पाकिस्तान हे मान्य करेल काय की, युनोने ज्या 130 अतिरेक्यांना घातक म्हणून घोषित केले आहे ते आणि अन्य 25 कुख्यात अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय दिला आहे. ज्या जनरल ए. ए. के. नियाजी याने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली त्याने पूर्व पाकिस्तानात आपल्याच कोट्यवधी बांधवांचा नरसंहार केला होता. पाकिस्तान अल् कैदा आणि दानिशच्या अतिरेक्यांना पेन्शन देते, हे खान स्वीकार करतील काय? पाकिस्तानच्या हबीब बँकेने अतिरेक्यांना भरमसाट पैसा पुरविल्याचे पुरावे सापडल्यानंतरच ही बँक बंद झाली, हे पाकिस्तान स्वीकार करेल? फाळणीच्या वेळी पाकिस्तानात 23 टक्के िंहदू व अन्य अल्पसंख्य होते. आता त्यांची संख्या 3 टक्क्यांवर का आली, याचे उत्तर इम्रान देतील? आज पाकिस्तानचे लष्कर आणि पोलिस िंहदू, शीख, िंसधी, बलुच, ख्रिश्चन, अहमदिया, पश्तून, शिया या सर्व लोकांचा अतोनात छळ करीत आहे, हे सत्य इम्रान खान स्वीकारतील? पाकिस्तानला जम्मू-काश्मिरात शांतता नांदावी असे कधीच वाटले नाही, अशा शब्दांत मित्रा यांनी इम्रान खान यांचा समाचार घेतला. एकूणच जगभरात मोदींची प्रतिमा अजूनच उजळून निघाली, तर इम्राननी आपली लायकी दाखवून दिली.
@@AUTHORINFO_V1@@