हम साथ-साथ है! भाजप-शिवसेना महायुती जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019
Total Views |



मुंबई : जनतेबरोबरच राजकीय क्षेत्र, माध्यमे यांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेली भाजप शिवसेना आणि मित्रपक्ष यांची महायुती सोमवारी अखेर जाहीर करण्यात आली. शिवसेनेने मातोश्रीवरून आणि मुख्यमंत्र्यांनी नागपुरातून महायुतीचे पत्रक जारी केले. या परिपत्रकाद्वारे भाजप आणि शिवसेनेने आपण एकत्र असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. भाजप आणि शिवसेना यांनी युतीची घोषणा करताना जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, "राज्यात गेली ५ वर्ष यशस्वीपणे राज्यकारभार करीत महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेण्याचे काम महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात केले आणि आता लोकशाही परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत."

 

"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मित्रपक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेअंती महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक ही महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. त्यानुसार आम्ही महायुतीची घोषणा करीत आहोत." "या महायुतीत कोणता पक्ष कोणती व किती जागा लढविणार, इत्यादी तपशील लवकरच जाहीर केला जाईल. ही महायुती महाराष्ट्रामध्ये राज्यातील जनतेचा अभूतपूर्व आशीर्वाद प्राप्त करेल, हा विश्वास आम्ही व्यक्त करीत आहोत. या परिपत्रकावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई या दोन्ही नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

युती जाहीर करण्यात आली असली तरीदेखील दोन्ही पक्षांतील नाराजांमुळे जागावाटपाचा अंतिम आकडा सोमवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर केला गेला नव्हता. मात्र अत्यंत उच्चपदस्थ सूत्रांकडून दै. 'मुंबई तरुण भारत' ला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार या जागावाटपात कोकण, मुंबईत व पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला झुकते माप देण्यात आले आहे, तर विदर्भात व मराठवाड्यात भाजपला झुकते माप मिळाले आहे. 'मुंबई तरुण भारत' ला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत भाजप १७, सेना १९, कोकणात भाजप १८, सेना ३१, विदर्भात भाजप ६२, सेना ५२ असे वाटप झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अंतिम आकडा सांगण्यात आला नाही, मात्र पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला कोकणाप्रमाणेच झुकते माप देण्यात आलेले आहे, असे खात्रीपूर्वक समजते.

 

कोकणातील भाजपकडे असलेल्या जागा अशा - सिंधुदुर्ग १ (कणकवली), रायगड ३, कल्याण डोंबिवली २, उल्हासनगर १, अंबरनाथ १, पालघर २, नवी मुंबई २, ठाणे २, मीरा-भाईंदर १. गंमत म्हणजे ज्या रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेस तुफान प्रतिसाद मिळाला होता आणि जिथे जैतापूर आणि नाणारसारखे महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत, त्या रत्नागिरी जिल्ह्यात सर्व जागा शिवसेनेस सोडल्या गेल्या आहेत. यात गुहागरसारख्या जनसंघ काळापासून परंपरागत भाजपच्या जागादेखील असल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. कल्याण पश्चिम येथील भाजपच्या नरेंद्र पवार यांनी जिंकलेली जागा शिवसेनेला सोडण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय असलेल्या भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने याविषयी माहिती देताना सांगितले की, "मुख्यमंत्र्यांनी महाजनादेशयात्रेदरम्यान विदर्भ आणि कोकणातील जागांच्या शिवसेनेबरोबर अदलाबदलीचे संकेत दिले होते. त्याला अनुसरूनच हे जागावाटप दिसते आहे." कणकवलीतून भाजपच्या तिकिटावर नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे उभे राहतील, असे संकेत मिळत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@