हा कोण लागून गेलाय इमरान खान नियाझी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019   
Total Views |



पाकिस्तानमधील नागरी आणि लष्करी राजवटीने अमेरिकी मदतीच्या बदल्यात दहशतवाद फोफावण्यास कसे खतपाणी घातले, याकडेही विदिशा मैत्रा यांनी सर्वांचे लक्ष वेधले. विदिशा मैत्रा यांनी इमरान खान आणि पाकिस्तानला जे जोरदार प्रत्युत्तर दिले, त्यामुळे पाकिस्तानच्या आरोपांमधील हवाच निघून गेली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात केवळ तेथील भारतीयांचीच मने जिंकली नाहीत, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी उत्तम संबंध प्रस्थापित केले असल्याचे दिसून आले. 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती लोकप्रिय नेते आहेत, याची प्रत्यक्ष अनुभूती अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि तेथे उपस्थित अन्य अमेरिकी लोकप्रतिनिधींना आली. त्याचबरोबर काश्मीरचा प्रश्न हा द्विपक्षीय असल्याने तशी चर्चा करूनच तो सोडविण्यात यावा, हेही ट्रम्प यांना मान्य करावे लागले. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील वाद मिटविण्यासाठी आपण मध्यस्थी करू शकतो, असे डोनाल्ड ट्रम्प सातत्याने म्हणत होते, पण भारताची याबाबतची आग्रहाची भूमिका लक्षात घेऊन अमेरिकेलाही भारताच्या सुरात सूर मिसळावा लागला. नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत जागतिक महत्त्वाच्या विविध विषयांची चर्चा केली. पण, काश्मीरबाबत वा पाकिस्तानकडून सातत्याने काश्मीरसंदर्भात सातत्याने जो अपप्रचार केला जात आहे, त्याबद्दल भाष्य केले नाही. तसे करण्याची आवश्यकताही नव्हती. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने भारतातील अंतर्गत प्रश्नांची चर्चा तेथे करण्याचा प्रश्नच नव्हता. 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिकाही भारताच्या सोबत असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घोषित करावे लागले. हा एक प्रकारे मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा विजयच मानायला हवा. विविध जागतिक नेत्यांसमवेत भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने भारताने एक मोठी झेप घेतल्याचे दिसून आले.

 

पण, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेपुढे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी जे भाषण केले, त्यावरून भारताविषयी इमरान खान यांच्या मनात किती द्वेष भरला असल्याचेच दिसून आले. भारताने जम्मू- काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्यानंतर तर पाकिस्तानचा अत्यंत जळफळाट होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. संधी मिळेल तेथे पाकिस्तान हा मुद्दा उपस्थित करीत आहे. आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी पाकिस्तानमधील राजकारणी नेत्यांना काश्मीरचे तुणतुणे सतत वाजवत ठेवावे लागते. इमरान खानदेखील त्यास कसे अपवाद असतील? इमरान खान यांनी आपल्या भाषणात आपण चार मुद्द्यांवर बोलणार असल्याचे स्पष्ट करतानाच त्यांच्या भाषणात काश्मीर हा मुद्दा प्रामुख्याने येणारच अशी खात्री होतीच. काश्मीरच्या मुद्द्यावर जागतिक व्यासपीठावर अत्यंत अपप्रचार करण्याचा प्रयत्न करून आपण मैदान गाजविले, असे या माजी क्रिकेटपटूला वाटले असावे! पण, इमरान खान यांच्या त्याच त्या मुद्द्यांना, पाकिस्तानी प्रतिनिधींव्यतिरिक्त कोणाची दाद मिळत नसल्याचा अनुभवही जगाने घेतला. पार दुसरे महायुद्ध कशामुळे भडकले, याचे स्मरण करून देऊन काश्मीरच्या मुद्द्याची सोडवणूक वेळीच केली नाही तर अणुयुद्धाचा भडका उडू शकतो, असा इशारा देण्यासही ते विसरले नाहीत! आपल्या भाषणात इमरान खान यांनी काहीही कारण नसताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढले. हिटलर, मुसोलिनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन संघाचे काम चालत असल्याचे धादांत खोटेनाटे आरोप केले. इमरान खान यांनी आमसभेतील भाषणात संघाचे नाव जाणूनबुजून ओढले, हे उघडच आहे. त्याचा एक फायदा असा झाला की, या संघटनेचे नाव इमरान खान यांच्यामुळे सर्वदूर झाले. इमरान खान यांनी केलेले आरोप किती गांभीर्याने घ्यायचे आणि त्या आरोपांना कसे उत्तर द्यायचे किंवा उत्तरच द्यायचे नाही, याचा निर्णय घेण्यास संघाचे नेतृत्व निश्चितच समर्थ आहे!

 

इमरान खान यांनी काश्मीरमधील परिस्थिती भयानक असल्याचे आमसभेत सांगितले. तेथील निर्बंध काढून घेतले तर भीषण रक्तपात होईल, असे भाकीत वर्तविले. अशीच स्थिती राहिली तर अणुयुद्ध होऊ शकते, असा गर्भित इशारा दिला. एवढेच नव्हे तर 'मुस्लीम विरुद्ध सर्व जग' असा रंग देण्याचाही प्रयत्न केला. इमरान खान यांचे भाषण कोणी, किती गांभीर्याने घेतले असेल हा प्रश्नच आहे. पण, इमरान खान, आमच्या देशाचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरमध्ये तुम्ही नाक खुपसण्याची काही आवश्यकता नाही. तेथील परिस्थिती कशी हाताळायची, हे आम्हास चांगल्या प्रकारे माहीत आहे. आम्ही ती समर्थपणे हाताळीत आहोतच. इमरान खान यांना आपल्या भाषणाने आपण सारे जग जिंकले, असे वाटत असताना त्यांच्या भाषणाला भारताने जे तडाखेबंद प्रत्युत्तर दिले, त्यामुळे पाकिस्तानचे खरे रूप संपूर्ण जगापुढे आले. संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय राजनैतिक अधिकारी विदिशा मैत्रा यांनी इमरान खान यांच्या भाषणाची जी चिरफाड केली त्यास तोड नाही! काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये, असा सल्ला देतानाच पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढाच विदिशा मैत्रा यांनी जागतिक समुदायापुढे वाचून दाखविला. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इमरान खान यांनी ओसामा बिन लादेन याला उघड पाठिंबा दिला होता, याचे स्मरण त्यांनी करून दिले. संयुक्त राष्ट्रांनी ज्या १३० जणांना दहशतवादी घोषित केले त्या दहशतवाद्यांना आणि २५ दहशतवादी संघटनांना पाकिस्तानमध्ये राजाश्रय मिळाला असल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.

 

पाकिस्तानी राजवटीकडून त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानमध्ये किती भयानक अत्याचार करण्यात आले, त्याचे आणि हे अत्याचार करणाऱ्या जनरल ए.ए.के. नियाझी याचे स्मरण करून दिले. 'पंतप्रधान इमरान खान नियाझी' असा त्यांच्या नावाचा पूर्ण उल्लेख करून जनरल नियाझी यांनी आणि हे नियाझी काही वेगळे नाहीत, याची आठवण जागतिक समुदायास करून दिली. पाकिस्तानमधील नागरी आणि लष्करी राजवटीने अमेरिकी मदतीच्या बदल्यात दहशतवाद फोफावण्यास कसे खतपाणी घातले, याकडेही विदिशा मैत्रा यांनी सर्वांचे लक्ष वेधले. विदिशा मैत्रा यांनी इमरान खान आणि पाकिस्तानला जे जोरदार प्रत्युत्तर दिले, त्यामुळे पाकिस्तानच्या आरोपांमधील हवाच निघून गेली. जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानने भारताची बदनामी करण्याचा असफल प्रयत्न केल्याचे दिसून आले. काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे आणि तेथे अगदी अल्प प्रमाणात निर्बंध असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्या राज्यात आता ३१० ब्लॉक्समध्ये ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकाही घोषित करण्यात आल्या आहेत. तेथील परिस्थिती सुरळीत होत असल्याचे लक्षात घेऊनच या निवडणुका घोषित झाल्या असतील ना? काश्मीरमध्ये निर्बंध असल्याचे जे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत, त्यांना गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे. निर्बंध आहेत ते तुमच्या मनात आहेत. तेथील परिस्थितीबाबत गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न केले जात आहेत, याकडेही अमित शाह यांनी लक्ष वेधले आहे. एकूणच, गेले काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचा दौरा, त्या दौऱ्यात त्यांनी बजावलेली उत्तम कामगिरी, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना विदिशा मैत्रा यांनी दिलेले बाणेदार उत्तर यांचीच चर्चा चालू आहे. त्यामुळे भारतावर आगपाखड करणारा हा कोण इमरान खान नियाझी नावाचा टिकोजीराव, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे!

@@AUTHORINFO_V1@@