सक्षम अभिनयाचा वारसदार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019   
Total Views |



खोटे परिवारातील एक सक्षम अभिनेते आणि 'शोले'तील 'कालिया' ही छोटीशी भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांनी सोमवारी कायमची 'एक्झिट' घेतली, त्यांच्याविषयी...


'कितने आदमी थे' असे म्हटल्यावर ''दो सरकार” आणि ''मैने आपका नमक खाया हैं सरकार” या दोन संवादांची चर्चा आजही तितकीच चवीने केली जाते आणि कदाचित यापुढेही हे संवाद तितकेच लोकप्रिय असतील, यात शंका नाही. भारतात हिंदी चित्रपटांच्या अगदी प्रारंभापासून ते आजतागायत चित्रपटात दमदार संवाद नसतील, तर तो प्रेक्षकांच्या सहसा स्मरणात राहत नाही. यापैकीच 'शोले' हा एक प्रसिद्धीची शिखरे गाठणारा चट. चित्रपटातील नेहमी अनेक संवादावरून विनोद केले जातात. तसेच, अजूनही बऱ्याच प्रेक्षकांच्या मनात असे संवाद घर करून आहेत. १९७५ रोजी आलेल्या या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलला होता. यामुळे अनेक चेहऱ्यांना ओळख मिळाली. त्यातील एक चेहरा म्हणजे 'कालिया' अर्थात विजू खोटे. चित्रपटातील त्यांचे हे मोजकेच काही संवाद जे अजूनही अनेक विनोदांमध्ये वापरले जातात. अभिनेते विजू खोटे यांना खरी ओळख मिळवून देणारी 'कालिया' ही भूमिका तीन तासांच्या चित्रपटामध्ये अवघ्या सात मिनिटांची होती. तरीही, त्यांची ही भूमिका आजतागायत लोकांच्या लक्षात आहे. चित्रपटात जरी डाकू प्रवृत्तीची भूमिका केली असली तरी एक साधं व्यक्तिमत्त्व, मनमिळावू स्वभाव आणि अभिनयाची असलेली भूक या गोष्टींमुळे त्यांना चित्रपटसृष्टीत एक वेगळा आदर आणि सन्मान होता. चित्रपटांसोबतच मालिका आणि रंगभूमीवरही त्यांचे तेवढेच प्रेम होते. त्यांनी मराठी, हिंदी तसेच इतर भाषांमध्येही कामे केली आहेत.

 

१७ डिसेंबर, १९४१ रोजी मुंबईमध्ये विजू खोटे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील नंदू खोटे यांनी त्याकाळी मूकचित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांची मोठी बहीण शुभा खोटे यांचेदेखील अभिनय क्षेत्रात मोठे नाव आहे. मुंबईमध्ये त्यांचे शिक्षण सेंट सबॅस्टियन शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वडील आणि बहिणीप्रमाणे चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्यांनी स्वतःची एक प्रिंटिंग प्रेस(मुद्रणालय) चालू केली होती(केले होते). परंतु, घरातील अभिनयाचे वारे त्यांनी अभिनयापासून लांब ठेवू शकले नाही. मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांनीदेखील अभिनय क्षेत्रात उडी घेतली. १९६४ मध्ये वडील नंदू खोटे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'या मालक' या चित्रपटामध्ये अभिनेते मेहमूदसोबत नायकाच्या भूमिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. परंतु, त्यानंतर त्यांनी लहान पण स्मरणात राहतील, अशा भूमिका साकारल्या. वडील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि मोठी बहीण एक लोकप्रिय अभिनेत्री असा वारसा लाभला असतानादेखील त्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट क्षेत्रामध्ये कामे मिळवली. दुर्गा खोटे या १९३० ते १९४० च्या दशकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री.दुर्गा खोटे यांचे भाचे असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच विजू खोटे यांच्या कामी आला. १० वर्षांच्या 'स्ट्रगल'नंतर १९७५ ला 'शोले'मध्ये त्यांना एक छोटी भूमिका मिळाली. या भूमिकेसाठी त्यांना अडीच हजार रुपये मिळाले होते. त्या चित्रपटानंतर त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. '(अरे ओ कालिया)कितने आदमी थे' आणि 'मैने आपका नमक खाया हैं सरकार' या दोन संवादांमुळे त्यांना 'कालिया' या भूमिकेसाठी सर्व देशभर प्रसिद्धी मिळाली.

 

पुढे ५५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावल्या. त्यांनी नकारात्मक भूमिका तसेच विनोदी आणि गंभीर भूमिकांचे आव्हानही सहजासहजी पेलले. हिंदीमध्ये प्रसिद्धी मिळत असतानादेखील मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. अशी ही बनवाबनवीमधील त्यांची भूमिका आणि त्यानंतर आलेल्या 'अंदाज अपना अपना'मधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खास पसंती दिली. 'अंदाज अपना अपना' या चित्रपटातील 'रॉबर्ट' या भूमिकेतील 'गलती से मिस्टेक हो गया' हा संवाददेखील खूप लोकप्रिय झाला होता. त्यांनी मराठीमध्ये 'मस्करी,' 'आयत्या घरात घरोबा,' 'धडाका,' 'घनचक्कर,' 'एक गाडी बाकी अनाडी,' 'इना मिना डिका,' 'भूताचा भाऊ,' 'चंगू मंगू,' 'सगळीकडे बोंबाबोंब' इत्यादी मराठी तसेच 'सच्चा झुठा,' 'फांदेबाज' इ. चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'अनोखी रात,' 'जिने की राह,' 'पगला कही का,' 'रामपूर का लक्ष्मण,' 'शरीफ बदमाश,' 'जलते बदन,' 'बेनाम,' 'जुर्म और सजा,' 'इन्सानियत' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय 'गोलमाल ३,' 'अजब प्रेम की गजब कहानी,' 'हल्ला बोल,' 'गरम मसाला,' 'हद कर दी आपने,' 'चायना गेट' या चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी व्यक्तिरेखांनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तीनशेहून अधिक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. तसेच, तीसहून अधिक मालिकांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना त्यांनी जवळजवळ पाच पिढ्यांसोबत कामे केली. हिंदी तसेच मराठी चित्रपटांमधील दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले असले, तरी त्यांच्या अभिनयाची विशेष तारीफ केली जात होती. पुढे विजू खोटे आणि शुभा खोटे यांची भाची अभिनेत्री भावना बलसावर यांनी त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला. त्यांनीदेखील काही चित्रपट, मालिकांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. हसरा स्वभाव, साधे राहणीमान, सकारात्मक विचार आणि मनमिळावू स्वभाव यामुळे अनेक कलाकारांना त्यांच्याबद्दल आदर होता. अखेर वयाच्या ७७व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांची 'कालिया' आणि इतर काही व्यक्तिरेखा सर्वांच्या अखंड स्मरणात राहतील. अशा या विनोदी अभिनेत्याला दै. 'मुंबई तरुण भारत' कडून श्रद्धांजली...

@@AUTHORINFO_V1@@