पर्दा जो उठ गया तो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019   
Total Views |



सौदीच्या भूमीवर प्रवेश करण्यापूर्वी पर्यटक महिलांनाही डोक्यापासून नखापर्यंत स्वत:चे शरीर संपूर्णपणे झाकणे बंधनकारक होते. यामुळे मुस्लीम देशांतील महिला पर्यटक सोडल्यास इतर देशांतील महिलांची मात्र चांगलीच अडचण व्हायची.


पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ

पर्दा जो उठ गया, तो भेद खुल जायेगा

अल्लाह मेरी तौबा, अल्लाह मेरी तौबा...

 

'शिकार' (१९६८) या चित्रपटातील हे एक अतिशय गाजलेले गीत. या गीताचे बोल आज आठवण्याचे कारण म्हणजे सौदी अरबने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय. यापुढे सौदी अरबमध्ये दाखल होणाऱ्या महिला पर्यटकांना 'अबिया' किंवा 'बुरखा' परिधान करण्याचे कोणतेही बंधन नसेल. पण, हा नियम सध्या केवळ परदेशातून सौदीमध्ये दाखल होणाऱ्या पर्यटक महिलांसाठी असून स्थानिक महिलांबाबतही हा निर्णय भविष्यात सौदीचे राजपुत्र मोहम्म्द बिन सलमान लागू करू शकतात. पण, सौदीने घेतलेल्या या निर्णयाकडे केवळ महिलांच्या मानवी हक्काच्या चष्म्यातून न पाहता, त्याचे इतर कंगोरेही आपण समजून घ्यायला हवेत.

इस्लामची जन्मभूमी म्हणजे सौदी अरब. जगभरातील इस्लामिक देश 'एक आदर्श मुस्लीम राष्ट्र' म्हणून सौदीच्या रियासतीचे गोडवे गाण्यात धन्यता मानतात. पण, याच सौदी अरबइतके खासकरून महिलांसाठी जाचक कायदे इतर कुठल्याही मुस्लीम देशांच्या व्यवस्थेत नाही, हेही तितकेच खरे. राजपुत्र सलमान सौदीच्या गादीवर विराजमान झाल्यापासून महिलांच्या अधिकार आणि हक्कांबाबत सौदीत चर्चेबरोबरच निश्चितच काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. यामध्ये महिलांना मतदानाचा हक्क प्रदान करण्यापासून ते वाहन चालवण्याच्या परवानगीसारख्या निर्णयांचा समावेश आहे. पण, अजूनही महिलांच्या पालकत्वाचे नियम कठोर आहेत आणि हे नियम शिथिल करण्यासाठी सौदीअंतर्गत आणि मानवी हक्क संस्थांमार्फत प्रयत्न सुरू आहेत. या बदलांच्या नांदीकडे सौदीने वाटचाल सुरू केली असली तरी महिला पर्यटकांच्या पोशाखांच्या नियमांत शिथिलता आणल्याने आगामी काळात महिला पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, हा यामागचा आशावाद.

सौदीच्या भूमीवर प्रवेश करण्यापूर्वी पर्यटक महिलांनाही डोक्यापासून नखापर्यंत स्वत:चे शरीर संपूर्णपणे झाकणे बंधनकारक होते. यामुळे मुस्लीम देशांतील महिला पर्यटक सोडल्यास इतर देशांतील महिलांची मात्र चांगलीच अडचण व्हायची. पर्यायाने, केवळ मक्का-मदिनेच्या धार्मिक पर्यटनाबरोबरच इतर शहरांमध्येही पर्यटनावर भर देण्यासाठी सौदीने हा निर्णय घेतलेला दिसतो. आपण जाणतोच की, सौदीच्या अर्थव्यवस्थेची सगळी मदार ही तेलाच्या मागणी-पुरवठ्यावर अवलंबून आहे. पण, नुकताच 'अरामको' या तेलशुद्धीकरण कंपनीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे सौदीलाही चांगलाच हादरा बसला. त्यामुळे तेलाबरोबरच पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळावी, या हेतूने सौदीने एक पाऊल पुढे टाकत एकाच दगडांत दोन पक्षी मारले. आंतरराष्ट्रीय जगतात 'आम्ही बदलतोय' असा संदेश देत, व्यावसायिक हित साधण्याचा सौदीने केलेला हा एक प्रयास. पण, महिला पर्यटकांनी नखशिखांत पोशाख परिधान करायचा नाही, याचाच अर्थ पाश्चिमात्त्यांसारखे कमी कपडे घालणे सौदीमध्ये स्वीकार्ह असेल असे कदापि नाही. यासंदर्भात सौदीने कुठलाही 'ड्रेसकोड' जाहीर केला नसला तरी महिलांनी केस आणि संपूर्ण शरीर झाकणारी इतर कोणतीही वस्त्रे वापरावी, असे अभिप्रेत असल्याचे कळते. त्याचबरोबर महिला पर्यटकांना काही ठराविक धार्मिक वास्तू सोडल्यास इतरत्र प्रवेशाची मुभा असेल. केवळ महिलाच नाही, तर एकूणच पर्यटकांच्या संख्येत वृद्धीसाठी ऑनलाईन व्हिसा उपलब्ध करून देण्याबरोबरच क्रीडा पर्यटनावरही सौदीने भर दिल्याचे समजते.

पण, सौदीमधील या नियमबदलांबाबत मुस्लीमजगतातूनही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही देशांनी हे निर्बंध शिथिल केल्याचे स्वागत केले, तर काहींनी सौदी अरब अमेरिकेच्या नादी लागून इस्लामिक मूल्यांपासून दुरावत असल्याचे ताशेरेही ओढले. त्यातच ट्रम्प-सलमान यांची या आठवड्यात भेट होणार असल्यामुळे अमेरिकेला गोंजारण्यासाठी आणि पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी सलमान यांची ही खेळी असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकूणच, सौदीने महिला पर्यटकांसाठीचा 'पर्दा' थोडा का होईना हटवला असला तरी महिलांचे इतर मूलभूत हक्क, गरिबी, शिक्षण, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्यांवर या इस्लामिक जगतातील आदर्श मानल्या गेलेल्या शासनव्यवस्थेला आमूलाग्र बदल घडवून आणता आलेले नाही, हे सत्य यानिमित्ताने नाकारता येणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@