सुसंवादाच्या वाटा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019
Total Views |


 



आज आपल्याला काय हवं आहे? की, मी म्हणेन तेच खरे. माझाच आवाज ऐकायला पाहिजे. दुसर्‍यांच्या आवाजाला महत्त्वच द्यायचे नाही, असे ठरवले तर माणसाने माणसांबरोबर राहण्याचा इरादाच ठेवू नये.


'माणूस’ म्हणून जन्म घेतला की, आपण आपल्या भोवतालच्या वातावरणाचा एक भाग बनून जातो. क्वचितच आपल्या अस्तित्वातच रममाण झालेली माणसे आपल्याला भेटतात. अर्थात, ही माणसं कधी ऋषिमुनी किंवा साधुसंत मंडळी असतात. त्यांना वनातला एकांतवास हवा असतो. तपश्चर्या करून काही शक्ती वा वरदान प्राप्त करायचे असते, तर कधी ही मंडळी शास्त्रज्ञ असतात. या पृथ्वीतलावर होणार्‍या घडामोडींचा त्यांना शोध घ्यायचा असतो वा कल्पनेच्या पल्याड जाऊन वस्तुस्थितीचे संशोधन करायचे असते. पण, सर्वसामान्य अस्तित्वाचा आनंद घेणार्‍या माणसांसाठी इतर जसे जीवन जगतात, तसेच त्यांना जगावयाचे असते. मग त्यात इतरांसारखे जगण्याचे रंग आलेच पाहिजेत, पण माणसा-माणसांनी एकेकांबरोबर जगायचे म्हटले, तर ‘तुझे तू बघून घे, माझे मी बघतो’ असे म्हणून चालत नाही. आपण एकमेकांना समजून घ्यावे लागते.

 

एकमेकांचे काही चुकले तर मोठ्या मनाने माफ करावे लागते. एकमेकांबरोबर राहताना आपण आपले विचार व तत्त्वज्ञान दुसर्‍यावर लादून चालत नाही. दुसर्‍यांना त्यांची मोकळी जागा जगायला द्यावी लागते. किंबहुना, माणसाच्या नात्यात दुसर्‍याचे भाव व विचार आपण स्वीकारायचे का नाकारायचे, याचे स्वातंत्र्य आपल्याला दुसर्‍यांना द्यावे लागते व आपणही आपले स्वातंत्र्य त्याच मोकळेपणाने अनुभवायला लागते. आपली नाती एकमेकांच्या पायात पाय न अडकवता मोकळ्या प्रत्ययातून जाणावी लागतात. ‘जग हे सुखाचे दिल्या-घेतल्याचे’ ही उक्ती माणसांच्या नात्यात खूप महत्त्वाची आहे. ‘द्यावे व घ्यावे’ ही प्रक्रिया प्रत्येक मानवी नात्यात मूलतःच आहे. किंबहुना, या प्रक्रियेभोवतीच मानवी नात्याची वीण गुंफलेली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तुम्ही दुसर्‍याला स्वतःहून काही द्यायचा प्रयत्न केला नाही, तर तुम्हाला दुसर्‍याने काही घ्यायला पाहिजे ही एकतर्फी अपेक्षा करू शकत नाही.

 

खरी समस्या कशी आहे? तुम्ही जर दुसर्‍याला द्यायचे नाही, अशी भूमिका ठेवली, तर तुम्हालासुद्धा तुम्ही ‘जे पेरले तेच उगवते’ हा अनुभव हमखास येणार. उदाहरणार्थ - कोणी अशा नात्यात जे जवळचे खासही असेल वा दूरचे सर्वसाधारण असेल, पण त्यात एक व्यक्ती सदैव देतच असते आणि दुसरी फक्त घेतच असते असे अनुभवाचे आहे का? कारण, शेवटी हे नाते माणसा-माणसांमध्ये नैसर्गिक नाते राहतच नाही. नात्याचे रूप जे काही असेल ते असेल, पण हे नाते केवळ एक थट्टेचा विषय बनते. त्यात ‘ड्रामा’ भरपूर असतो, पण अस्सलपणा नसतो. मुळात त्या नात्यात सौंदर्य नसते, तर एक फोलपणा असतो. कधी कधी विकृती असते.

 

शेवटी माणसा-माणसांत नात्याला एक संवाद लागतो. संवाद म्हणजे नुसते नाते एकमेकांशी बोलणे नाही. सामान्य आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लोक एकमेकांशी बोलतात. स्वतःच्याभावनांचा कल्लोळ झाला, तर मनाला थोडे हायसे वाटावे म्हणूनही संवाद साधतात वा कठीण समयी धीर मिळावा म्हणूनही संभाषण करतात. पण, हे सर्व संभाषण करताना वा संवाद साधताना त्यात ‘सुसंवाद’ मात्र होत नाही. कारण, एखादी व्यक्ती फक्त स्वतःबद्दल व स्वतःच्या समस्यांबद्दल बाण सुटल्यासारखी बोलत राहते. आपल्याला दुसर्‍यालाही बोलायची संधी द्यायला हवी, दुसर्‍यांचेही थोडे ऐकायला हवे. जेव्हा निकड आहे, तेव्हा स्वतःच्या समस्यांबद्दल, व्यापांबद्दल जरूर बोलायला पाहिजे. पण, दुसर्‍यांनासुद्धा संवाद साधायची प्रेरणा द्यायला पाहिजे, हे बर्‍याच लोकांच्या वैचारिक मर्यादेतच नसते. माणसा-माणसांच्या नात्यात ‘हो’ला ‘हो’ नसावं, पण विरोधातसुद्धा संवाद असतो, हे तरी लक्षात घेतले पाहिजे. आज आपल्याला काय हवं आहे? की, मी म्हणेन तेच खरे. माझाच आवाज ऐकायला पाहिजे. दुसर्‍यांच्या आवाजाला महत्त्वच द्यायचे नाही, असे ठरवले तर माणसाने माणसांबरोबर राहण्याचा इरादाच ठेवू नये.

- डॉ. शुभांगी पारकर 

@@AUTHORINFO_V1@@