एवढे उद्धट असलेच पाहिजे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2019
Total Views |


 


दहशतीच्या जीवावर राज्य करण्याच्या पाकिस्तानच्या सवयीला आता एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. अमेरिकाच नव्हे तर जगातील सर्वच देशांनी पाकची कड घेणे टाळले आणि पाकिस्तान आज एकटा पडला आहे. जयशंकर यांनी जी भूमिका घेतली, ती पाकिस्तानला स्वत:ची जागा दाखविणारी तर आहेच पण गेली तीन-चार वर्षे ज्या नव्या भारताची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींकडून सुरू आहे, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारीही आहे. प्रत्यक्ष दहशत आणि आता अणुयुद्धाची दहशत असा हा क्रम आहे.


मोदी २.० च्या प्रारंभी जे नवे चेहरे केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करण्यात आले, त्यात भुवया उंचवायला लावणारे एक नाव होते एस. जयशंकर यांचे. परराष्ट्र विभागातले पूर्वाश्रमीचे वजनदार सनदी अधिकारी. या सरकारात ते परराष्ट्रमंत्री झाले. सुषमा स्वराज यांनी आपल्या विशिष्ट कार्यशैलीने परराष्ट्र मंत्रालयावर छाप पाडली असताना एस. जयशंकर यांना हे आव्हानात्मक काम मिळाले. इमरान खान यांच्या 'न्यूयॉर्क टाइम्स'मधील लेखावर त्यांनी ज्याप्रकारे प्रतिसाद दिला आहे, तो पाहता पाकिस्तानला कस्पटासमान लेखण्याची एकही संधी सोडणार नसल्याचे स्पष्ट होते. वस्तुत: एखाद्या पंतप्रधानाच्या कृतीवर सहसा अशाप्रकारे प्रतिसाद दिला जात नाही. बु्रसेल्स येथे पत्रकारांशी बोलताना, "इमरान खान यांनी लिहिलेला लेख वाचायला आपल्याला वेळच मिळालेला नाही," असे सरळ सांगून टाकले. ज्या भीतीच्या वातावरणाची निर्मिती सध्या पाकिस्तानकडून केली जात आहे, तिची हवा काढून टाकण्याचे कामच त्यांनी केले आहे. दहशतीच्या जीवावर राज्य करण्याच्या पाकिस्तानच्या सवयीला आता एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. अमेरिकाच नव्हे तर जगातील सर्वच देशांनी पाकिस्तानची कड घेणे टाळले आणि पाकिस्तान आज एकटा पडला आहे. जयशंकर यांनी जी भूमिका घेतली, ती पाकिस्तानला स्वत:ची जागा दाखविणारी तर आहेच पण गेली तीन-चार वर्षे ज्या नव्या भारताची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींकडून सुरू आहे, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारीही आहे. प्रत्यक्ष दहशत आणि आता अणुयुद्धाची दहशत असा हा क्रम आहे. पुलवामाला दिलेला सणसणीत प्रतिसाद ते कलम ३७० हटविण्याच्या प्रक्रियेमध्ये एकसंघता आहे. हा केवळ घटनाक्रमांचा खेळ नाही. एका मजबूत इराद्याने भारत आपला खेळ खेळत आहे आणि त्याचे परिणामही दिसत आहेत. 'भयबिन होय न प्रीती' हा रामचरित मानसमधला दोहा इथे प्रत्यक्षात उतरलेला दिसतो. यापूर्वी पाकिस्तानचे काय करायचे, हा प्रश्न होता. आता तो राहिलेला नाही. भारताच्या विरोधात जे काही करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, त्यात तो पूर्णपणे उघडा पडलाच पण इमरान खानही चेष्टेचा विषय होऊन बसला. जगाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे झाले असेल, एखाद्या पंतप्रधानाने एखाद्या वर्तमानपत्राचा आधार घेऊन आपले म्हणणे मांडले असावे.

 

कलम ३७० इतक्या सहजपणे हटविले जाईल, असे कुणालाही स्वप्नातही वाटले नव्हते. अमित शाहंनी ते हटविले, तेव्हा पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया काहीशी अशीच होती. त्यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई सुरू झाल्याची आवई उठविली गेली होती. पाकिस्तानात घुसून लष्करी कारवाई केल्यानंतर आता कुठल्या प्रकारच्या कारवाया होऊ शकतात, याचा काहीच अंदाज पाकिस्तानला आला नाही. तशात मोदी सरकारने कलम ३७० निष्प्रभ करण्याचे धाडस दाखवले. डोनाल्ड ट्रम्पकडून मध्यस्थीचे आश्वासन मिळाल्याने खुश झालेल्या इमरान खानना हा झटका होता. तिथूनच मग त्यांनी अण्वस्त्रहल्ल्याच्या धमक्यांपासून ते वेगवेगळ्या इशाऱ्यांपर्यंत मजल मारली. अर्थात, भारताने इमरानच्या बेतालपणाकडे लक्ष न देता आपली चाल सुरूच ठेवली आणि अखेरीस आपल्या चाळ्यांकडे भारतासह जगही दुर्लक्ष करत असल्याचे पाहून खान यांनी लेखणी हाती घेतली. इमरान खाननी आपल्या मनातल्या द्वेषाला म्हणा वा हतबलतेला वाट मोकळी करून देण्यासाठी वृत्तपत्रेही नामांकितच निवडली. इमरान खान यांनी ज्यात लेख लिहिला, त्या वृत्तपत्रांची गंमत अशी की, ती जागतिक मूल्यांच्या आधारे इतरांना मूर्ख बनवत आली. ही वृत्तपत्रे नेमक्या मानवाधिकार उल्लंघनाविषयी बोलतात. मात्र, इतरांच्या मानवाधिकारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. आताचा इमरान खानचा लेखही त्याच पठडीतला. इथे इमरान खान यांनी केलेली चलाखी त्या वृत्तपत्राच्याही लक्षात आली नाही ना अन्य कोणा बुद्धीमंत-अभ्यासकांच्या.

 

इमरान खान ठिकठिकाणी काश्मिरातील मानवाधिकार हननाबद्दल भरभरून बोलत आले, तसेच त्यांनी अण्वस्त्रांची भीतीही घालून पाहिली. पण इमरान खान आणि पाकिस्तानच्या भूमिकेविषयी दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे पाकिस्तानची अण्वस्त्रे नेमकी कोणाच्या हाती आहेत? कारण, तो देश नेमका कोण चालवतो, हेच कोणाला कळत नाही. तिथे लोकनियुक्त सरकारपेक्षाही आयएसआय आणि लष्कराचाच बोलबाला अधिक असतो. त्यातही वरताण म्हणजे दहशतवाद्यांशी या सर्वांचेच उघड संबंध. सोबतच तिथले शास्त्रज्ञही आपल्याकडील अण्वस्त्रे वा अण्वस्त्र तंत्रज्ञान अन्य देशांना विकताना सापडले. म्हणूनच आपली अण्वस्त्रे नेमकी कोणाकडे आहेत, हे इमरान खानही कधी छाती ठोकून सांगू शकत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे पाकिस्तानचा पोशिंदा झालेल्या चीनमधला आहे. चीनच्या शिनजियांग या उईगर मुस्लीमबहुल प्रांतात तिथल्या सरकारने अनेक बंधने लादली आहेत. मुस्लिमांना छावण्यांत कैद करून ठेवल्याची वृत्तेही मध्यंतरी प्रकाशात आली. चीन तिथल्या मुस्लिमांच्या अधिकारांचे पद्धतशीरपणे दमन करत असल्याचे समोर आले. पण आज काश्मिरातील कथित अन्याय-अत्याचारावर बडबडणाऱ्या इमरान खानने हा मुद्दा कधीच उचलला नाही. विशेष म्हणजे इमरानच्या लेखाला प्रसिद्धी देणाऱ्या ख्यातनाम परदेशी वृत्तपत्रांचा मंदाडपणा असा की, ही चलाखी त्यांच्याही लक्षात आली नाही वा त्याकडे त्यांची दृष्टी गेली नाही. ज्या जागतिक मूल्यांची पोपटपंची ही वृत्तपत्रे करतात, त्यांना शिनजियांगमध्येच नाही तर पाकिस्तानातील बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा, सिंध, मुहाजिर व पाकव्याप्त काश्मिरातही पायदळीच तुडवले जाते. पण त्याकडे या वृत्तपत्रांचे लक्ष वेधले नाही. धर्माच्या आधारे बोलणाऱ्या अशा लोकांबद्दल कार्ल मार्क्सने चांगले भाष्य करून ठेवले आहे. मात्र, मार्क्सचे भक्तच त्यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसते वा इमरान खानसारख्यांच्या सापळ्यामुळे आपण फसवले गेल्याचे त्यांना समजत नाही. म्हणूनच त्यांच्याकडे किंवा त्यांच्या गळे काढणाऱ्या लेखांकडे ढुंकूनही न पाहता उद्धटपणाच दाखवला पाहिजे. एस. जयशंकर यांनी इमरान खान यांच्यासारख्या कांगावखोराच्या लेखाबद्दल व्यक्त केलेले मत त्यामुळेच संयुक्तिक ठरते.

@@AUTHORINFO_V1@@