म्युच्युअल फंड क्या है? (भाग २)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2019
Total Views |




उत्सव असला कि सर्व आसमंत कसा मंगलमय आणि सकारात्मक वाटू लागतो. परंतु सध्या आर्थिक आघाडीवर मंदीयुक्त चिंता भेडसावत आहे. माझ्याकडून आर्थिक सल्ला व सेवा घेणाऱ्या ग्राहकांनी मला समाज माध्यमांवर आलेले मंदी बाबतचे मेसेजेस पाठविले आहेत.

 

काही अर्थतज्ञांच्या विश्लेषणानुसार, हा जागतिक मंदीचा फटका आहे. तर काहींच्या मते सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोट बदली व केंद्रीय करप्रणाली लागू करण्याच्या निर्णयांचा परिपाक आहे. कुणी म्हणतंय कि मंदीच्या झळा २०१३ पासून बसत होत्या पण राजकीय अभिनिवेशात झाकोळल्या गेल्या. हे जर खरं मानलं तर आपल्या देशात आर्थिक विषयांना महत्व किती? हा प्रश्न मग गौण ठरतो. नुसतच समाज माध्यमांवर कल्पक संदेश पाठविणे हेच आपलं अर्थसाक्षरतेच प्रमाणपत्र असेल तर अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सची होणार कशी?

 

श्रीगणेशाची स्थापना करण्याची एक विधिवत पद्धती आपल्याकडे परंपरेनुसार चालत आली आहे. त्यासाठीची संहिता प्रत्येक घरात पाळण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या घरात अनुभवी ज्येष्ठ असतील तिथे त्रुटी राहत नाही. परंतु नवतर मंडळी असतील तर बहुतेकदा सोपस्कार पार पाडले जातात. असंच काहीसं म्युच्युअल फंड व त्यातील विविध पर्यायांची कार्यपद्धती माहित न करून घेता जाहिरात बघून कमिशन वाचणार म्हणून डायरेक्ट गुंतवणूकदार बनतात. मग पदरी मोदकाचा प्रसाद येण्याऐवजी खिरापत सांभाळण्याची वेळ येते.

 

मागील लेखात आपण म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचे ढोबळ फायदे काय आहेत, हे बघितले होते. वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांचा आशय पुढीलप्रमाणे होता. १. म्युच्युअल फंड कंपनी बंद पडली तर? २. म्युच्युअल फंडाची योजना बंद झाली तर आमच्या गुंतवणूकीचे काय होईल? या लेखात आपण म्युच्युअल फंडाचे कार्य कसे चालते, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

 

म्युच्युअल फंड व्यवसाय करण्यासाठी पुढील मध्यस्थ काम करत असतात.

१. प्रवर्तक (Sponsors) प्रवर्तक म्हणून घोषीत करून घेण्यासाठी नियमावली आहे.

अ) किमान ५ वर्षे आर्थिक सेवा क्षेत्रात नैतिकतेने काम केल्याचा अनुभव.

आ) म्युच्युअल फंड कंपनीत गुंतविलेल्या भांडवलापेक्षा प्रवर्तकाकडे अधिकची नक्त मालमत्ता असली पाहिजे.

इ) वैयक्तिक किंवा भागीदारी संस्था प्रवर्तक म्हणून नोंदणी करू शकतात.

ई) प्रवर्तक SEBI कडे अर्ज करून म्युच्युअल फंडाची नोंदणी करतात.

 

२. विश्वस्त (Trustee) –

विश्वस्त हा म्युच्युअल फंड व्यवसायातला सर्वात महत्वाचा दुवा असतो. विश्वस्ताला नियंत्रकाच्या नियमांनुसार मालमत्ता व्यवस्थापन कंपनी गुंतवणूकदारांचा निधी योग्य ठिकाणी गुंतविते कि नाही, याच्या देखरेखीची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागते.

प्रवर्तकांना किमान ४ विश्वस्त नेमावे लागतात. त्यात कुठल्याही आर्थिक वा इतर कायद्याचा भंग केलेल्या व्यक्तीची विश्वस्त म्हणून नेमणूक करता येत नाही.

विश्वस्त नेमण्यापूर्वी SEBI ची परवानगी मिळवावी लागते.

 

३. मालमत्ता व्यवस्थापन अस्थापना (AMC) –

दैनंदिन मालमत्ता व्यवस्थापनेचे व्यवहार AMC ने ठेवायचे असतात.

कुठल्याही AMC ची नक्त मालमत्ता ५० कोटी असल्याशिवाय नवीन योजना सुरु करता येत नाही.

कुठल्याही AMC ला स्वतःच्या योजनांमधे पूर्व सूचनेशिवाय गुंतवणूक करता येत नाही.

अकार्यक्षम AMC ची सेवा खंडीत करणे किंवा अपेक्षित बदल करणे विश्वस्तांच्या बहुमताने किंवा ७५% युनिट धारकांच्या सहमतीने करता येते.

व्यवसाय वृद्धीसाठी AMC विविध महत्वपूर्ण अधिकाऱ्यांची नेमणूक SEBI च्या परवानगीने करू शकते.

४. ताबेदार (Custodian) –

Custodian ला अधिकृतरित्या SEBI कडे नोंदणी करणे आवश्यक असते. त्यांची कामे पुढीलप्रमाणे असतात.

योजनेतील सर्व मालमत्ता सुरक्षित ठेवणे.

योजनेत खरेदी – विक्री होणाऱ्या रोखे,समभाग,सोने,स्थावर मालमत्ता यांची देवाण - घेवाण करणे.

त्याने योजनेतील गुंतवणूका गुंतवणूकदाराच्या हितासाठी आहेत याची खातरजमा करणे आवश्यक आहे.

जर Custodian प्रवर्तकांच्या हितासाठी काम करत असल्याचे आढळून आल्यास SEBI त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याची नेमणूक रद्द करू शकते.

 

५. व्यवहार नोंदणी मध्यस्थ (RTA) –

गुंतवणूकदारांचे व्यवहार नोंदी ठेवण्याचे काम RTA ने करायचे असते.

RTA नेमलाच पाहिजे अशी सक्ती नसते.

RTA हा SEBI कडे नोंदणीकृत असला पाहिजे.

पुढील तक्ता उदाहरणादाखल बघू.

 

Mutual Fund Trust

SBI Mutual Fund

Sponsor

State Bank Of India

Trustee

SBI Mutual Fund Trustee Company Private Limited

AMC

SBI Funds Management Private Limited

Custodian

HDFC Bank Limited

SBI-SG Securities Services Private Limited

Bank of Nova Scotia (for Gold)

RTA

CAMS



वरील माहिती वाचतांना तुमच्या लक्षात आले असेल की,
SEBI चे भक्कम कवच असल्यामुळे गुंतवणूकदाराचे हित प्राधान्याने जपण्याचा प्रयत्न केला जातो. योजनांमधील परतावा हा जोखमीच्या आधीन असतो. कारण जे रोखे किंवा समभाग सलंग्न मालमत्ता फंड व्यवस्थापक विकत घेत असतो त्या बहुतांशी अर्थचक्राशी निगडीत असतात.

२०१७ च्या तेजीत बाजारात प्रवेश केलेल्या गुंतवणूकदारांची सध्याच्या पडझडीने दमछाक झाली आहे. भारतात ज्याच्या घरात वीज जाते तो शेजाऱ्याकडे गेली आहे का? हे बघूनच खात्री करतो कि त्याची वीज गेलीये ना म्हणजे माझ्याकडे सुद्धा गेली आहे. हा विनोदाचा भाग झाला. परंतु समभाग सलंग्न गुंतवणूका करतांना देखील खूपदा असेच केले जाते. ज्यावेळी जास्त भांडवली नफा कमविणे हे एकच ध्येय ठेवून गुंतवणूक केली जाते त्यावेळी भांडवली नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. महिंद्रा म्युच्युअल फंडाचे मुख्य विपणन अधिकारी श्री.जतिंदर पाल यांनी एका मुलाखतीत पुढील मोलाची गोष्ट अधोरेखीत केली आहे. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी भिती आणि हाव या दोन भावनांवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. गुंतवणुकीवर मिळणारा परतावा केवळ फंडांच्या कामगिरीवर न ठरता गुंतवणूकदाराच्या “आर्थिक वर्तनावर” सुद्धा ठरत असतो.

अतुल प्रकाश कोतकर

(आर्थिक सल्लागार)

94 23 18 75 98

[email protected]

म्युच्युअल फंड क्या है? (भाग १)

@@AUTHORINFO_V1@@