विनोदाचा बादशहा ‘वेणू’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




दाक्षिणात्य चित्रपटातील हरहुन्नरी विनोदवीर वेणू माधव बुधवारी आपल्यातून गेले
. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार्‍या या अवलियाच्या जीवनकार्याविषयी...


खरंतर मराठी प्रेक्षकांना वेणू माधव यांचे नाव तसे परिचित नसेलही
, परंतु डबिंग केलेल्या हिंदी भाषेतील दाक्षिणात्य चित्रपटांतून मराठीच काय तर सर्वच भाषिकांना परिचित असणारा हा चेहरा. चित्रवाणी वाहिन्यांवरील डब केलेले दाक्षिणात्य विशेषत: तेलुगू चित्रपट आपल्याकडे आवडीने पाहिले जातात. आपल्याकडे मराठी चित्रपटात विनोदवीरांना तितकेसे महत्त्व नसले तरी दक्षिणात्य चित्रपटात मात्र विनोद पाहिजेच. राजकीय कारकिर्द सांभाळत आपली कला जोपासणार्‍या वेणू माधव यांच्या विनोदांनी खूप कमी वेळेत प्रेक्षकांची मने जिंकली. वेणूची अचानक ‘एक्झिट’ मराठी प्रेक्षकांना ‘लक्ष्या’ची म्हणजेच मराठी विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण करून देणारी ठरली.


वेणू मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने अनेक दिवसांपासून त्रस्त होते
. प्रकृती अधिकच बिघडल्याने दि. २४ सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, २४ तासांच्या आतच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्याच आठवड्यात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. लवकरात लवकर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोन दिवसांतच त्यांची तब्येत पुन्हा बिघडली आणि वेणू माधव यांनी जगाचा निरोप घेतला.



वेणू माधव यांचा जन्म ३० डिसेंबर
, १९६८ला तेलंगण राज्यातील नलगोंडा जिल्ह्यात कोडाडजवळ झाला. त्यांनी तेलुगू माध्यमातून पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण घेतले. जेव्हा वेणू माधव चौथीला शिकत होते तेव्हापासूनच त्यांनी नकला करण्यास सुरुवात केली. याव्यतिरिक्त, अमिताभ बच्चन आणि एनटीआर यांच्या गाण्यांवर नाचत असत आणि त्यांचे अभिनय आणि संवाद अगदी हुबेहूब सादर करत. एवढेच नव्हे, तर अभ्यासातूनही ते सर्वांची मने जिंकत असत. शाळेत शिक्षकांची कॉपी करून सर्वांना हसवायचे. वेणूला नकला करायला आवडायचे. वेगवेगळ्या समारंभांमधून नकला करतच वेणूने स्वत:चे अस्तित्व चित्रपटवाल्यांना लक्षात आणून दिले.



वेणू माधव यांनी १९९६ मध्ये आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीला
‘मिमिक्री आर्टिस्ट’च्या माध्यमातून सुरुवात केली. १९९६ मध्ये आलेल्या ‘संप्रदाय’ या चित्रपटात त्यांना पहिली संधी मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची लांबी जास्त नव्हती, पण त्यांच्या विनोदातील कौशल्यामुळे त्यांनी त्या छोट्या भूमिकेतूनच आपला प्रभाव पडला. त्या भूमिकेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास २०१६ पर्यंत सुरू होता. वेणू माधव यांनी ‘आदि,’ ‘वासु,’ ‘सिंहाद्री,’ ‘छत्रपती,’ ‘पोकीरी,’ ‘किक,’ ‘नायक’ आणि ‘रुद्रमादेवी’ या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. राजकीय व्यक्ती, स्थानिक आणि सेलिब्रेटी यांच्या नकलांचा ते कार्यक्रमात करत. विनोदाने तेलुगूच नाही तर देशभरातील प्रेक्षकांच्या मनात वेणू माधव यांनी घर केले. इतक्या कमी कालावधीत त्यांनी तब्बल सहाशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. तेलुगूतील नागार्जुन, महेशबाबू यांसारख्या प्रमुख नायकांसोबत वेणू अनेक चित्रपटांत झळकले. ‘मास्टर’ हा १९९७ साली आलेला चित्रपट व ‘तोली प्रेमा’ हा १९९८ साली आलेला चित्रपट, हे दोन चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्यांची नवी ओळख निर्माण करणारे ठरले. ६०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणे म्हणजे या कलाकाराने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नक्कीच स्वतःला झोकून देत काम केले. दिवसाला दोन-तीन शिफ्टमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण. त्यासाठी निरनिराळ्या लोकेशन्सवर सातत्याने प्रवास करणे. या अपार कष्टातून त्यांना चांगला पैसाही मिळू लागला. प्रसिद्धी तर मिळालीच. तेलुगू व्यतिरिक्त त्यांनी आपल्या कारकिर्दीत काही तामिळ चित्रपटांमध्येही काम केले. त्यांचा शेवटचा चित्रपट २०१६ मध्ये चित्रित झालेला ‘डॉ. परमानंदैया विद्यार्थी’हा ठरला. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले परंतु, अजून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला नाही.



तेलुगू चित्रपट
‘साई’मधील ‘नल्ला बाळू’ आणि ‘लक्ष्मी’मधील ‘टायगर सत्ती’ या भूमिका विशेष गाजल्या. २००६ मध्ये आलेल्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राज्य सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट पुरुष विनोदवीर’ म्हणून ‘राज्य नंदी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना ते म्हणाले होते की, “ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी आणि अमूल्य अशी भेट आहे. जेव्हा एखादी चांगली कथा मिळेल तेव्हा आपण चित्रपट करू. कारण, मला असभ्य आणि अश्लील विनोद आवडत नाहीत. मी जेव्हा चित्रपट तयार करेल तेव्हा तो चित्रपट संपूर्ण कुटुंबाने सोबत बसून बघितला पाहिजे.”




चित्रपटांव्यतिरिक्त वेणू माधव राजकारणाशी संबंधित होते
. ते सतत ‘तेलुगू देसम’ पक्षाशी (टीडीपी) संबंधित राहिले. गेल्या वर्षी तेलंगणमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी कोदड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, ते निवडणूक लढवू शकले नाही. टीडीपीला प्रचारामध्ये त्यांनी बरीच मदत केली होती. ज्यांनी राजकारण आणि राजकीय व्यक्तींना जवळून पाहिले, अशा विनोदवीरांना कदाचित राजकीय प्रहसन करता येऊ शकते. पक्षाचे काम करत असताना चित्रपटसृष्टीतल्या लोकांशी कामानिमित्त त्यांचे संबंध येत. यातूनच त्यांच्या सिनेसृष्टीतील ओळखी वाढू लागल्या आणि ओळखीतूनच त्यांनी पुढे चित्रपटात काम करायला सुरुवात केली. ब्रह्मानंदनम यांच्यासारख्या तेलुगू आणि तामिळ चित्रपटातील नामवंत विनोदवीराच्या तोडीस तोड विनोदी अभिनय वेणू माधव करत. मात्र, कारकिर्दीच्या उभरत्या वयातच त्यांना मूत्रपिंडाच्या विकाराने गाठले. त्यांनी उपचारही घेतले. परंतु, नियतीच्या मनात काय असतं, ते कोणाच्याही आवाक्यात नसते. अखेर वेणू आपल्याला सोडून गेलेत, पण त्यांचा विनादी चेहरा कायम सर्वांच्या मनात ठेवून...

 
- गायत्री श्रीगोंदेकर 
@@AUTHORINFO_V1@@