‘दी चेंजमेकर’: पायल जांगिड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2019
Total Views |




असत्यावर सत्याचा विजय म्हणजेच दसर्‍याचे पर्व
. प्रतिकूल परिस्थितीत अनेक आव्हानांचा सामना करत आयुष्याची लढाई जिंकणे हीच खरी जीवनाची विजयादशमी. आपल्या आयुष्यात विविध संघर्षांवर मात करत विजयादशमीचा उत्सव खर्‍या अर्थाने साजरा करणार्‍या नवदुर्गांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे दसरा पर्वानिमित्ताने अभिवादन. राजस्थानातील समाजपरिवर्तन दुर्गा म्हणून ओळखल्या जाणार्‍या पायल जांगिड हिच्या कार्याविषयी...



परंपरेच्या विरोधात जाऊन समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो
. असे बदल घडविणार्‍या व्यक्ती या असाधारण असतात. म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल सातासमुद्रापारही घेतली जाते. अशाच प्रकारे बालविवाहाविरोधात आवाज उठविणार्‍या राजस्थानातील अवघ्या १७ वर्षीय पायल जांगिडने असे काही केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ग्लोबल गोलकीपर’ पुरस्कार मिळत असताना त्याच रंगमंचावर तिलाही ‘चेंजमेकर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चेंजमेकरच्या आयुष्याविषयी...



‘बिल अ‍ॅण्ड मेलिंडा फाऊंडेशन’तर्फे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘स्वच्छ भारत अभियाना’करिता नुकतेच ‘ग्लोबल गोलकीपर’ पुरस्काराने न्यूयॉर्कमध्ये सन्मानित करण्यात आले. त्यांच्याबरोबर अजून एका भारतीय महिलेला यावेळी सन्मानित करण्यात आले, जिचेे नाव आहे पायल जांगिड. अवघ्या १७ वर्षांच्या पायल जांगिडला राजस्थानात बालविवाह आणि बालमजुरी रोखण्यासाठी चालविण्यात येणार्‍या अभियानाकरिता ‘चेंजमेकर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. राजस्थानमधील हिंसला गावात तीन बहिणी आणि एक भाऊ यांच्यासोबत वाढलेली पायल लहानपणापासून कुशाग्र बुद्धीची आहे. तिचे वडील लाकूडकाम करणारे तर आई गृहिणी. वयाच्या ११ व्या वर्षी गावातील प्रथेप्रमाणे तिच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, शिक्षणाची आवड असलेल्या पायलने लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावत आपण पुढील शिक्षण पूर्ण करणार असल्याचे ठणकावून सांगितले. एवढ्या लहान वयात असे विचार मांडणारी मुलगी आपल्या घरात आली तर काय होईल, या धास्तीने तिच्या होऊ घातलेल्या सासरच्यांनी स्वतःहूनच लग्नाला नकार दिला. अर्थातच, याचा फायदा पायलला झाला.




तिने उचललेले हे पाऊल क्रांतिकारी ठरले. मुलांच्या हक्कांसाठी काम करणारे आणि नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या ‘बचपन बचाओ’ आंदोलनाचा एक भाग असलेल्या ‘बाल मित्र ग्राम’ संघटनेच्या अधिकार्‍यानी तिच्यातील नेतृत्व हेरले. जी मुलगी स्वतःचा बालविवाह रोखू शकते, ती इतरांनाही नक्कीच या कुप्रथेपासून परावृत्त करू शकते, हे ओळखून त्यांनी आपल्या संघटनेत तिला सामील करून घेतले. गावात २०१२ साली ‘बाल मित्र ग्राम’ संघटनेमार्फत बाल परिषदेची स्थापना झाली होती. पायलने या संस्थेमार्फत आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या गावांतून बालविवाहाला विरोध करणार्‍या रॅली काढल्या. “बालविवाह हे मुलींचे बालपणच हिरावून घेत नाहीत, तर त्यांना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासूनही वंचित ठेवतात. एवढेच नाही तर पुढील आयुष्यात त्यांना शारीरिक, मानसिक छळाला सामोरे जावे लागते. शिक्षण नसल्याने त्यांना सन्मानाने जगताही येत नाही.” हे सारे पायलने लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले, गावातील युवा मंडळ, महिला मंडळ यांच्यात जागृती केली. तिच्या वयापेक्षाही मोठी असलेली तिची समज, समस्यांची जाण आणि त्यावर मात करण्यासाठी तिने घेतलेला पुढाकार याचा यथोचित प्रभाव पडला. सुरुवातीला तिला रागावणार्‍या, तिची खिल्ली उडवणार्‍या गावकर्‍याना हळूहळू तिची तळमळ समजली. दरवर्षी अक्षय्य तृतीयेला हटकून चोरून होणारे बालविवाह आज पूर्णतः बंद झालेत. तिच्यासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे.




उत्कृष्ट वक्तृत्व असलेल्या पायलला २०१३ साली बाल परिषदेचे सरपंच करण्यात आले. हेतू हा की, गावातल्या मुलांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, त्यांनी त्यांचे प्रश्न उघडपणे मांडावेत. मग ते बालविवाहाबाबत असो वा बालमजुरीबाबत. पायल सरपंच झाली, तेव्हा शाळेत मुलांची संख्या नगण्य होती. पालकांमध्येही निरक्षरतेमुळे शिक्षणाबद्दल जागरूकता नव्हती. पायलने या सर्व मुलांना घेऊन गावात युवा रॅली काढल्या. शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी भित्तीचित्रे रंगवली. “शिक्षण घेतले तर आपल्या निरक्षर पालकांसारखी मोलमजुरी करावी लागणार नाही, स्वतःच्या पायावर उभे राहाल,” हे पटवून दिले. तिच्यामुळे प्रभावित होऊन अनेक मुलांनी शाळेत प्रवेश घेतले. आज तिच्या गावातील जवळपास सर्वच मुले केवळ शिकतच नाहीत तर, कैलाश सत्यार्थी यांच्या ‘बचपन बचाओ आंदोलना’चा एक भागही आहेत. पूर्वी अबोल, काहीशी मागे राहणारी मुले आज आपले प्रश्न ग्रामपंचायतीसमोर निर्भिडपणे मांडतात, त्यांच्या प्रश्नांवर विचारविमर्ष केला जातो, हा आत्मविश्वास शिक्षणामुळेच त्यांना मिळाला आहे.




बालविवाहाबरोबरच पायलने महिलांच्या घुंघट प्रथेला तिलांजली देण्याचंही काम युद्धपातळीवर सुरू केले. गावातल्या प्रत्येक महिलेशी बोलून, “तुम्ही कोणाहीपेक्षा कमी नाही, ही भावना त्यांच्या मनात निर्माण केली. स्वतःला पडद्यामागे न ठेवता, आपल्या मुलांविषयी, घराविषयी, स्वतःविषयी तुम्ही उघडपणे मत मांडू शकता आणि त्यासाठी प्रथम स्वतःला जगासमोर आत्मविश्वासाने सादर करा,” हे तिने महिलांना पटवून दिले. आता तिच्या गावात तरी महिला ‘घुंघट’मध्ये नसतात. २०१३ मध्ये पायल बाल परिषदेची सरपंच असताना स्वीडनहून ‘वर्ल्ड चिल्डे्रन प्राईझ’ उपक्रमाच्या प्रतिनिधींनी तिच्या गावी येऊन तिची मुलाखत घेतली होती. तिने गावात घडवून आणलेला बदल पाहून त्यांनी तिची या उपक्रमाच्या ज्युरी सभासदांमध्ये निवड केली.



‘वर्ल्ड चिल्ड्रेन प्राईझ’ या उपक्रमांतर्गत जगातील अशा तीन व्यक्तींची निवड करण्यात येते, ज्या व्यक्ती मुलांच्या हक्कांसाठी, त्यांच्या अधिकारांसाठी लढत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, चळवळी राबवत आहेत आणि या व्यक्तींची निवड करण्यासाठी जगभरातील काही निवडक मुले ज्युरी कमिटीवर घेतली जातात, ज्यात पायल एक होती. तिला स्वीडनला तर जायला मिळणार होतेच पण आपल्याला ही निवड करण्याची सुवर्णसंधी मिळणार, याचा तिला जास्त आनंद होता. तिचा समावेश असलेल्या या निवड समितीने २०१४ साली युसूफझाई मलाला हिची निवड केली होती. स्वतः लहान असूनही इतर मुलांसाठी काम करणारी मलाला या मुलांना प्रभावित करून गेली.



२०१५ मध्ये बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी भारतदौर्‍यादरम्यान नवी दिल्ली येथे पायलची भेट घेऊन तिच्या कामाला मनापासून दाद दिली आहे
. तसेच फिटनेस ब्रँड असलेल्या रिबोक कंपनीनेदेखील तिला ‘यंग अचिव्हर’ या पुरस्काराने २०१७ साली गौरवान्वित केले आहे. न्यूयॉर्क येथे ‘चेंजमेकर’ हा पुरस्कार स्वीकारताना, “मला शिकून शिक्षक व्हायचे आहे, समाजातल्या गरीब मुलांना शिकवायचे आहे. ही तर माझ्या कामाची फक्त सुरुवात आहे. आज माझ्या गावात झालेला बदल मला संपूर्ण जगात घडवायचा आहे,” असे प्रांजळपणे तिने नमूद केले. तिने समर्थपणे आपल्या घरच्यांच्या, गावाच्या मानसिकतेत जे बदल घडवून आणले, ते नक्कीच कौतुकास्पद आहेत. पूर्वापार चालत आलेली बालविवाहासारखी अनिष्ट रूढी कालबाह्य ठरवणे सोपे नव्हते. पण तिची दुर्दम्य इच्छाशक्ती, अविश्रांत मेहनत आणि तिला लाभलेली ‘बाल मित्र ग्राम संघटने’ची साथ, न भूतो न भविष्यति... असा परिणाम साधून गेली. आजचे हे यश तिच्या आयुष्याचेही ‘चेंजमेकर’ ठरावे, ही शुभेच्छा!

-रश्मी मर्चंडे
@@AUTHORINFO_V1@@