पवारांतला ‘पॉवर’ संघर्ष?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2019
Total Views |



सुप्रिया सुळेंच्या निर्विघ्न राजकीय वाटचालीसाठी
(कदाचित भावी मुख्यमंत्रिपदासाठी) अजित पवारांचे हौतात्म्य शरद पवारांना हवे असेल, असे त्यामुळेच वाटते. पण अजित पवारांच्या आमदारकीच्या राजीनाम्याने शरद पवारांवरील लक्ष हटले, हे नक्की. आता पुढल्या काही काळात काका-पुतण्या आणि बहिणीच्या संघर्षात नेमके काय होते, हे पाहणे खरोखरच औत्सुक्याचे ठरेल.



ईडीच्या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे नाव आल्यापासून विशेषत्वाने बारामतीसह पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजल्याचा आभास निर्माण झाला
. शरद पवारांनीही बिनबुलाए मेहमानसारखी हौस दाखवत मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयात जाण्याचा पवित्रा घेतला. अखेरीस प्रशासनाच्या विनंतीनंतर कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून आपण तो निर्णय स्थगित केल्याचा मानभावी आवही त्यांनी आणला. परिणामी, दिवसभर पवारांच्या हालचालींकडे डोळे लावून बसलेल्यांना झांजा वाजवण्यासाठी आणखी एक मुद्दा मिळाला. सगळीकडेच शरद पवार कसे घटनेचा मान ठेवणारे, कायद्याचे पालन करणारे असल्याचे सांगितले गेले आणि राज्य सरकारवरच आरोपांच्या सरबत्तीला सुरुवात करण्यात आली. नंतर मात्र अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि बघता बघता शरद पवारांच्या ईडीवारीचे नाट्य कुठल्याकुठे गायब झाले. अजित पवारांच्या राजीनाम्यानेच वाहिन्यांवरील चर्चांचे आणि गप्पांचे फड रंगले; समाजमाध्यमांनी त्यात आणखीनच भर घातली. पुढे अजित पवारांच्या पत्रकार परिषदेपर्यंत अंदाजांचे पतंग उडवण्याची शर्यत चालू झाली व आता नेमके काय होणार, याची उत्सुकताही ताणली गेली. पत्रकार परिषदेत मात्र अजित पवारांनी ईडीने शरद पवारांवर दाखल केलेल्या आरोपपत्रामुळे आपण अस्वस्थ, व्यथित झाल्याचे म्हटले. तसेच काकांवरील आरोपांतून झालेल्या दुःखामुळेच आपण राजीनामा दिल्याचे रडून दाखवत सांगितले. परंतु, अजित पवारांच्या भावविवश होण्यामागे खरेच शरद पवारांवरील आरोप होते की, आणखी काही कारणे होती?



सध्या शरद पवारांसमोर राजकीयदृष्ट्या बरीच आव्हाने आहेत
. पक्षाचे बुडते जहाज पाहून अनेकांनी त्यातून इतरत्र उड्याही मारलेल्या पाहायला मिळतात. परंतु, हे झाले बाहेरचे, पवारांच्या घरचेही काही थोडे नाही. अर्थात राजकारणात कुटुंब आले की, असेच होते. कुटुंबातील वाद पक्षाला संपवतात आणि पक्षातले वाद कुटुंबाला. नजीकच्या काळातले असे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पक्षाचे. तिथेही पिता-पुत्र आणि काका-पुतण्यांतल्या वादाने समाजवादी पक्षाला राजकारणातून बेदखल केले, रसातळाला नेले. तसेच काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सुरू असल्याचे चालू घडामोडींवरून तरी म्हणता येते. गेल्या काही काळापासूनच नव्हे तर अजित पवारांच्या महत्त्वाकांक्षा जसजशा वाढत गेल्या, तसतसे शरद पवारांनी त्यांचे पंख छाटायला सुरुवात केली असावी. अगदी राज्य शिखर बँकेचे संचालक म्हणून अजित पवारांकडे कारभार देण्यामागेही काही कारस्थान होते का? हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. म्हणजे ज्या काही लबाडीच्या-लुबाडणुकीच्या कारवाया करायच्या, त्या अजित पवारांच्या माध्यमातून होईल आणि साहेब स्वतः नामानिराळे राहतील, असे काही शिजले होते का? अजित पवारांना कसल्यातरी प्रकरणात अडकवण्याची परिस्थिती निर्माण होईल आणि अन्य कोणाचा तरी मार्ग सुकर होईल, अशी काही खेळी केली गेली होती का? ते नाव अर्थातच शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे, हेच असणार. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत इव्हीएमचा मुद्दा विरोधकांकडून पुन्हा पुन्हा उकरून काढला जाई. तेव्हा अजित पवारांनी मात्र नेमके शरद पवारांच्या विधानांपासून लांब जात इव्हीएममध्ये घोटाळा होऊ शकत नाही, अशी भूमिका घेतली. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 निष्प्रभ केले, त्यावेळी अजित पवारांनी मोदी सरकारच्या निर्णयाच्या बाजूने वक्तव्य केले. शरद पवारांनी मात्र विरोधी मत नोंदवले आणि राज्यातल्या नेत्यांना राष्ट्रीय पातळीवरील प्रश्न समजत नाहीत, असेही म्हटले. भगव्या झेंड्याचा विषय तर आताचाच. अजित पवार म्हणाले की, “पक्षाच्या सभा-रॅलीत भगवा झेंडा फडकावला पाहिजे, तर शरद पवारांनी तसे काहीही होणार नाही,” असे स्पष्ट केले. वरील सर्वच प्रसंगांतून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात परस्परांहून निराळी मते असल्याचे स्पष्ट होते.



परंतु
, अजित पवारांना पक्षातून पद्धतशीरपणे बाजूला करण्यात येत असल्याचे आणखी एक-दोन घटनांतूनही समजते. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर सुरू केलेली शिवस्वराज्य यात्रा. यात्रेचे नेतृत्व सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या अमोल कोल्हेंकडे आहे तर अजित पवार त्यात कुठेच दिसत नाहीत. तत्पूर्वी अजित पवारांचे पुत्र पार्थ यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, पवार कुटुंबीयांतला वारस असनूही पार्थ पवारांचा दारुण पराभव झाला, ही गोष्ट अजित पवारांच्या जिव्हारी लागलेली असू शकते. तसेच हा अजित पवारांना पुत्रासह राजकारणातून हद्दपार करण्याचा, अजित पवारांची पॉवर संपविण्याचा तर डाव नाही ना आणि याचमुळे तर अजित पवार अस्वस्थ, व्यथित, दुःखी झालेले आहेत काय? त्यांचे अश्रू, रडणे, भावविवश होणे या सगळ्यांचाच परिपाक तर नसेल ना? असे प्रश्नही उपस्थित होतात. अर्थात स्वपुत्रमोहापुढे भलेभले लोक इतरांना दुखावणारे निर्णय घेतात. इथेही तसेच काही घडत असावे. सुप्रिया सुळेंच्या निर्विघ्न राजकीय वाटचालीसाठी (कदाचित भावी मुख्यमंत्रिपदासाठी) अजित पवारांचे हौतात्म्य शरद पवारांना हवे असेल, असे त्यामुळेच वाटते. पण अजित पवारांच्या आमदारकीच्या राजीनाम्याने शरद पवारांवरील लक्ष हटले, हे नक्की. आता पुढल्या काही काळात काका-पुतण्या आणि बहिणीच्या संघर्षात नेमके काय होते, हे पाहणे खरोखरच औत्सुक्याचे ठरेल. तोपर्यंत शरद पवारांची ईडीवारीही होऊ शकेल आणि न्यायालयाला काही काळेबेरे आढळलेच तर पुढची कारवाईही होईलच. परंतु, कार्यकर्त्यांचे काय? त्यांना कोणीतरी शिखर बँक घोटाळा, त्यातला तपास, न्यायालयीन आदेश वगैरेंचीही माहिती द्यायला हवी; अन्यथा ते एका गंभीर प्रकरणातल्या आरोपीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषात दाखविण्याचा छछोरपणा करत राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बट्ट्याबोळ आणखी जवळ येत जाईल.

@@AUTHORINFO_V1@@