बावाजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2019
Total Views |


 

बावाजीला बघताच एखाद्याने ओळखावं की हा पारशीच असायला हवा. ठेंगणा देह, पांढरे शुभ्र केस, त्या केसावर घातलेली ती लाल रंगाची पारशी टोपी, पांढरं गोल गळ्याचं गंजी अन् त्याखाली पांढराच लेंगा; मुख्य म्हणजे त्याचं ते उठून दिसणारं नाक आणि त्याच्या सोबतीला खोबणीतून इकडे तिकडे नजर टाकत फिरणारे डोळे.



बॉम्बे हॉस्पिटलवरून घरी येताना वाटेत जोरदार पाऊस सुरू झाला. मित्राच्या आईला बघायला जाणं हे निमित्त होतं. बघून लगेचच परत यायचं होतं. आमच्या गिरगावात पावसाळ्यात रस्त्यावर चालताना छत्री वगैरे काही लागत नसते. जवळपास प्रत्येक दुकान म्हणा किंवा एखादं उपाहारगृह आडोसा देऊ शकेल, इतकं छप्पर घेऊन तैनात असतं. मी हाडाचा गिरगावकर असल्याने माझ्याकडे साहजिकच छत्री असण्याचा प्रश्न नव्हता. पाऊस ओसरेपर्यंत हॉस्पिटल परिसरातल्याच एका इराण्याच्या आश्रयात वेळ काढायचं ठरवून मी आत शिरलो. इराणी नावापुरता होता. हॉटेलात काम करणारी पोरं भारतातीलच होती, उत्तरप्रदेश, बिहारची. इराणचा लवलेश गल्ल्यावर बसलेल्या त्या पारशी बावाजी पुरताच मर्यादित होता. 




बावाजीला बघताच एखाद्याने ओळखावं की हा पारशीच असायला हवा. ठेंगणा देह, पांढरे शुभ्र केस, त्या केसावर घातलेली ती लाल रंगाची पारशी टोपी, पांढरं गोल गळ्याचं गंजी अन् त्याखाली पांढराच लेंगा; मुख्य म्हणजे त्याचं ते उठून दिसणारं नाक आणि त्याच्या सोबतीला खोबणीतून इकडे तिकडे नजर टाकत फिरणारे डोळे. हा बावाजी जर धिप्पाड सहा-साडेसहा फुटाचा असता तर कदाचित याला घाबरून गिर्‍हाईक फिरकलंसुद्धा नसतं इथे. असो. बावाजीचं रुप न्याहाळत मी गल्ल्या शेजारच्याच खुर्चीवर बसलो. एक पोरवजा वेटर आतून बाहेर पडत माझ्यासमोर उभा ठाकला. ‘एक पानी-कम चाय’ची ऑर्डर देता तो त्याच वेगात परत आत गेला. बाहेर पडणार्‍या पावसाने माझ्यातला संगीतप्रेमी जागा करून नकळत मी समोरच्या लाकडी टेबलावर ताल घेतला. एक-दोन मिनिटं झाली असतील इतक्यात “ए ते टॅबल हाय तुझा घरचा तबला नाय,” असा धमकीवजा संदेश दिल्यासारखा बावाजी उद्गारला. मला थोडं ओशाळल्यासारखं होऊन मी हळू “सॉरी” असं म्हटलं अन् ‘टॅबल’वरच्या पाण्याच्या ग्लासासोबत चाळा करू लागलो. बावाजीला कदाचित वाईट वगैरे वाटलं असावं. ’‘साला हे पाऊस काय पडते गेला दोन तीन दिसांपासून...”



असं त्याने आपणच संभाषण सुरू केलं. मी नुसतं ’हं’ असं म्हटलं तर तो “पण, साला पूर्वीसारखा पाऊस नाय रायला बघ मी सांगते. आमी ल्हान होते तेव्हा कसा ढो ढो पडायचा. तेव्हा साला टायमच वेगला होता. ब्रिटिश रुल यू सी. साला पावस बी घाबरायचा ब्रिटिशला. साला नाय पडला तर ब्रिटिशचा बांबू मिळेल **वर! हाहाहा...” बावाजी स्वतः मारलेल्या विनोदावर स्वतःच जोरजोरात हसू लागला. त्याने पार्श्वभागासाठी वापरलेला शब्द ऐकून हा काही वाटतो तितका शिस्तीचा नाही, याची थोडीशी हमी मला मिळाली होती. हे बावाजी नेहमी ब्रिटिश काळात का रमतात, हे राहून राहून मला कळत नाही. मागे एक मित्र म्हणाला होता की, ब्रिटिश लोक भारत सोडताना आपल्या मालकीच्या सर्व जमिनी यांना देऊन गेले म्हणे. खरं खोटं देव जाणे. मी त्याचा हलका स्वर पकडत “काय हो, तुम्ही एकटेच सांभाळता का हे हॉटेल?” असा कुतूहल वजा काळजीचा स्वर आळवला. “माझी वाईफ आणि मी सांभाळते. संध्याकाळचा मी बसते आनी सकाळी ती.


एक छोकरा-छोकरी हाय आम्हाला. छोकरा लंडनला असते. छोकरी जरा आटा ढिला हाय.” हाहाहा... बावाजीने असं स्वतःच्या मुलीविषयी बोलावं, हे मला रुचलं नाही. मी “म्हणजे?” विचारता “अरे बाबा जनमपासून तशीच हाय ती. आता पच्चीस सालची झाली, पण वागते पाच सालच्या पोरावानी. काय करायचं तूच सांग. तू काय सांगनार! तू काय डॉक्टर थोडीच हाय अन् खूप डॉक्टर केले काय बी फरक नाय.” बावाजीनं मला एकदम ‘कोर्ट मार्शल’ करून माझी एमबीबीएसची पदवी काढून घेतल्यासारखं वाटून “काका, मी डॉक्टर आहे” असं जमेल तितक्या विनयशीलतेने मी सांगितले. त्यावर ’‘अरे काय बोलते. सॉरी हा डिकरा. अरे डॉक्टर हाय तर असा हाफ पैंटमधी काय फिरते तू, लोकाला वाटलं पायजे तू डॉक्टर हाय ते. साला आमच्या वेळचे डॉक्टर आय टेल यू, साला एकदम कडक कपडे घालून इकडे तिकडे फिरत आनी आवाज म्हणजे कसा एकदम पॉवरफुल. साला पेशंटची डॉक्टरला बघुनच चड्डी पिवली व्हायची. हाहाहा..” टेबल वाजवू नको सांगणारा बावाजी आता रंगात आला होता.


वाटलं असच बसावं अन् एखादा तास या कलंदर माणसासोबत गप्पा माराव्यात.पण, समोरचा ‘पानी-कम चहा’ आणि मनगटावरचं घड्याळ वास्तवाला बांधून ठेवत होतं. कसाबसा तो पाच एक मिनिटाआधी समोर ठेवलेला थंडगार चहा घशात ढकलला अन् बावाजीच्या गल्ल्यावर चहाचे पैसे ठेवले. ’‘ए साला डॉक्टर हे मी नाय घेते. आपण तुला मजाकमधी काय बी बोलला आनी तू फर्स्ट टाईम आला ना आपण पैसे नाय घेते. येत जा असा. माझ्या बायडीला पन सांगेल मी आज डॉक्टर आला होता एक चहा प्यायला. डॉक्टर नाय येत असा नाय पन कोन तुझ्यासारखा बोलत नाय.साला रुबाबमध्ये येते आनी जाते. येत जा हा. सकाळचा आला ना तर आमची बायडी भेटेल तुला. ती बी एक सॅम्पल पीस हाय. पण चांगली हाय. मी सकाळचा नसते. साला रात्री झोप लागत नाय. पोराची आठवण येते बघ आनी आमची येडी छोकरी हायेच तरास द्यायला म्हणून मग संध्याकाळी येते मी. चल बरं वाटलं हा तुला भेटून पोराची याद झाली. तूबी त्याच्याच वयाचा. गॉड ब्लेस यू!” असं म्हणत बावाजीने बकोटीला लावलेला रुमाल डोळ्यांना लावला. बावाजीचे डोळे पाणावले होते. कपटी आणि बेडकी लोकांच्या दुनियेत या बावाजीने आपली सगळीच ’कार्ड’ माझ्यासमोर ओपन केल्याचे मला राहून राहून नवल वाटत होते.

- डॉ. अमेय देसाई

@@AUTHORINFO_V1@@