युद्ध नाही; जगाला बुद्ध दिला! : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2019
Total Views |



संयुक्त राष्ट्र : "आम्ही जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे. जगाला शांततेचा संदेश दिला आहे. यामुळेच आमच्या आवाजात दहशतवादाविरोधात जगाला सावध करण्याचे गांभीर्य आहे," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्र संघाच्या दक्षिण आशियाई क्षेत्र सहयोग संघटनेत (सार्क) केले. याचबरोबर दहशतवादाविरोधात संतापदेखील असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता खडे बोलही सुनावले.

 

सार्क देशांच्या परिषदेत मोदी म्हणाले, "भारत हजारो वर्षांपूर्वीची एक महान संस्कृती असून त्याची स्वतःची अशी एक विशिष्ट परंपरा आहे. जो सध्या जागतिक कल्याणाचे स्वप्न बाळगून आहे. जनसहभागातून प्रत्येकाचे कल्याण हे आमचे मूळ तत्त्व आहे," असे ते म्हणाले. "संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात बोलणे, हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे. आजचा हा क्षण यासाठीदेखील महत्त्वाचा आहे कारण, यावर्षी संपूर्ण जग महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करत आहे. सत्य आणि अहिंसेचा त्यांनी दिलेला संदेश आजही जगासाठी मार्गदर्शक ठरत आहे," असे मोदी यावेळी सांगायला विसरले नाहीत.

 

मोदी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीच्या विषयालाही हात घातला. ते म्हणाले, "यावर्षी जगातील सर्वात मोठी निवडणूक झाली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातील जनतेने सर्वाधिक मत देऊन मला व माझ्या सरकारला पहिल्यापेक्षा जास्त जनादेश दिला. जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान भारतात पार पडले. केवळ पाच वर्षांमध्ये जनतेसाठी ११ कोटींपेक्षा जास्त स्वच्छतागृह तयार करून, एका विकसनशील देशाने जगाला स्वच्छतेचा संदेश दिला. २०२० पर्यंत आम्ही गरिबांसाठी आणखी दोन कोटी घरांची व्यवस्था करणार असून, २०२५ पर्यंत भारताला क्षयमुक्त करण्यासाठी काम करत आहोत," असे मोदी यांनी सांगितले.

 

'चीनमधील मुस्लीम अत्याचाराबाबत गप्प का?'

 

संयुक्त राष्ट्र संघातील परिषदेदरम्यान अमेरिकेने शुक्रवारी पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणाचा बुरखा फाडला. "काश्मीरमधल्या मुस्लिमांच्या स्थितीबद्दल जितकी चिंता वाटते, तितकाच कळवळा चीनच्या ताब्यात असलेल्या मुस्लिमांबद्दल का नाही?," असा सवाल अमेरिकेने पाकिस्तानला केला. "चीनने लाखो मुस्लिमांना आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान का बोलत नाहीत?," असा सवाल अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाचे सहायक सचिव एलिस वेल्स यांनी विचारला.

 

'जशास तसे'

 

संयुक्त राष्ट्र संघाच्या दक्षिण आशियाई क्षेत्र सहयोग संघटनेत (सार्क) परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर बहिष्कार टाकला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या भाषणावर बहिष्कार घालत जशास तसे प्रत्युत्तर दिले.

 

इमरान यांच्याकडून युद्धाची भाषा

 

इस्लामिक दहशतवादावर जगातील प्रमुख नेत्यांनी बोलणे चुकीचे असल्याचे प्रतिपादन पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्रात बोलताना केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा युद्धाची भाषा केली. ते म्हणाले, "भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे अण्वस्त्रांचा वापर होण्याची दाट शक्यता असल्याने जगाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, नाही तर याचे खूप भयानक परिणाम जगाला भोगावे लागतील," असे ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@