मराठवाड्यातील समाजशील दुर्गा..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2019   
Total Views |



असत्यावर सत्याचा विजय म्हणजेच दसर्‍याचे पर्व
. प्रतिकूल परिस्थितीत अनेक आव्हानांचा सामना करत आयुष्याची लढाई जिंकणे हीच खरी जीवनाची विजयादशमी. आपल्या आयुष्यात विविध संघर्षांवर मात करत विजयादशमीचा उत्सव खर्‍या अर्थाने साजरा करणार्‍या नवदुर्गांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे दसरा पर्वानिमित्ताने अभिवादन. मराठवाड्यातील समाजशील दुर्गा म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ. योगिता पाटील यांच्या कार्याविषयी...



गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकर्‍याच्या आत्महत्येने अवघा देश हादरून गेला
. त्या शेतकर्‍याच्या घरातील महिलांचे काय होत असेल? विविध सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींचा केंद्रबिंदू असलेल्या मराठवाड्याच्या शेतकर्‍याचा प्रश्न जितका आर्थिक गुंतागुंतीचा तितकाच तो भावनिक गुंतागुंतीचाही. शेतकर्‍याच्या घरच्या माऊलींनी, लेकी-सुनांनी भावनिक आणि सर्वच स्तरावर सक्षम, सबल व्हायलाच हवे हे गरजेचे.



हा ध्यास घेऊन मराठवाड्याची कन्या डॉ
. योगिता पाटील मराठवाड्याच्या गावागावात कार्य करत आहे. संविधानामध्ये गांधीजींच्या विचारांचे परिमाण या विषयावर योगिता यांनी पीएच.डी केली. उच्चशिक्षित योगिता यांना माहिती होते की, शेती आणि माती यांच्याशी बांधलेले शेतकरी बांधव. मात्र, विक्रमाच्या मानगुटीवर वेताळ असावा तसे शेतकर्‍याच्या मानगुटीवर कायम खानदानीची प्रतिष्ठा, मानपमान राखण्याची जबाबदारी. ती प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी तो वाट्टेल ती किंमत चुकवायला तयार असतो. ही भावनिक बाब योगिता यांना माहिती होती. कारण, त्याही औरंगाबादच्या, माजलगावमधील डुब्बाथडी येथील बळीराम तौर या शेतकर्‍याच्या कन्या. कनिष्ठ मध्यमवर्गीय शेतकर्‍याच्या मुलीचे जे आयुष्य तेच त्यांचेही आयुष्य. बारावीपर्यंत शिक्षण घेताना सगळे आलबेलच होते. त्याच काळात त्यांच्या एका मैत्रिणीने आत्महत्या केली. कारण, तिला कुणीतरी छेडले होते. प्रचंड अपमानाने आणि घाबरून तिने आत्महत्या केली. नुकत्याच तारूण्यात प्रवेश केलेल्या योगिता यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यांनी याचा निषेध म्हणून गावातल्या महिलांना-मुलींना एकत्र केले आणि एक मोठा निषेध मोर्चा काढला. त्या गावामध्ये यापूर्वी असे कधी घडले नव्हते. एका मुलीच्या मृत्यूसाठी गावातल्या महिला एकत्र आल्या हे मोठे अप्रूप.



पुढे डी
.एड करण्यासाठी योगिता बीडला आल्या. तिथेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संपर्क आला. अभाविपचे प्रवीण घुगे, संजय पाचपोर यांचे बौद्घिक ऐकून योगिता यांची मानसिकता विशाल होत गेली. त्यातही संजय पाचपोरांचे एक वाक्य त्यांनी कायम मनात ठेवले की, आपण आपल्याप्रति कठोरतील कठोर व्हावे आणि दुसर्‍याप्रति मऊहून मऊ व्हावे. पुढे औरंगाबाद येथीलच अशोक पाटील यांच्याशी योगिताचा विवाह झाला. सासरी वसतंदादा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून शाळा चालवल्या जात. योगिता यांनी या शाळेमधील विद्यार्थ्यांची गळती थांबवण्याचे नियोजन केले. हे करताना ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत कसा येईल, येऊन टिकेल कसा ? यावर त्यांनी काम केले.



दुष्काळामुळे मेटाकुटीला आलेले जनजीवन
. नैराश्य, दु:ख संताप जाणार कुठे? घराघरातल्या महिलांचा कोंडमारा. योगिता यांनी या महिलांसाठी समुपदेशन करण्याचे काम हाती घेतले. गरिबी आणि काही नकारात्मक पारंपरिक रितीरिवाज या चक्रात अडकलेल्या मुली. त्यांची काही चूक नसतानाही त्यांचे फसण्याचे प्रमाण जास्त. मराठवाड्याच्या गावभागात अशा मुलींना भविष्य काय? योगिता अशा मुलींच्या ‘ताई’ झाल्या. मराठवाडा विद्यापीठावर राज्यपाल नियुक्त. सिनेट सदस्य म्हणून कार्यरत असताना, त्यांनी मराठवाड्यातील वसतिगृहातील मुलींचे पालकत्वच स्वीकारले. शहरात विद्रोही नकारात्मकतेपलीकडेही काही रूजावे, यासाठी त्यांनी मराठवाडा साहित्य परिषद आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने माजलगावसारख्या गावात साहित्य संमेलन घेतले. हेतू हाच की, इथेही सकारात्मक साहित्य मूल्य फुलावीत. मराठवाड्यात दुष्काळ, दु:ख नकारात्मकतेची छाप मिटावी हाच त्यामागचा उद्देश. या सर्व कामात स्थानिक स्त्रियांनी सहभाग घेतला हेसुद्धा विशेषच!



योगिता म्हणतात
, “स्त्रीही मुळातच शक्तिरूप आहे. सगळ्या जगाचे चैतन्य तिच्या अस्तित्वाचे रूप आहे. फक्त ही शक्ती, हे चैतन्य ओळखता यायला हवे. आपली प्रेरणा आपणच बनायला हवे. कधीही निराश होऊ नका, थकू नका.”

आपण ठरवायला हवे की,

आता मीच माझे आकाश होणार!

माझ्या आकाशात मीच प्रकाशात देणार!

कारण, जर कुठलं वादळ

आभाळ शिवत नसेल

तर मीच आभाळ होणार...!

@@AUTHORINFO_V1@@