अनिवासी भारतीय आणि भारत-अमेरिका संबंध

    28-Sep-2019   
Total Views | 66



जे अनिवासी भारतीय देशाच्या बाहेर गेले आहेत, त्यांना ‘ब्रेन ड्रेन’ म्हणजे ‘देशाचे बौद्धिक नुकसान’ असे समजण्यापेक्षा त्यांना परदेशामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून समजले पाहिजे. आपल्या देशाची प्रगती करण्यामध्ये त्यांचा जो सहभाग आहे, त्यात अजून जास्त वाढ करता येईल. भारताची आर्थिक ताकद वाढते आहे, त्याचबरोबर ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणजे भारतीयांची इतर ताकदसुद्धा वाढवून भारताला एक जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा देश म्हणून पुढे येण्यात मदत मिळू शकेल.



पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सहा दिवसीय अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत
. ह्युस्टनमध्ये त्यांनी अनिवासी भारतीयांची भेट घेतली. तिथे ५०-६० हजार लोक हजर होतेच, शिवाय अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित होते. भारत हा अमेरिकेचा सर्वात विश्वासू मित्र आहे आणि दोन्ही देश सुरक्षेवर एकत्रित काम करत असून भारत आणि अमेरिका इस्लामिक दहशतवादाचा मुकाबला करण्यास सज्ज आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.



.७५ कोटी भारतीय विविध देशांमध्ये


अनिवासी भारतीय म्हणजे जे भारतीय देश सोडून इतर देशांमध्ये कायमचे वास्तव्य करीत आहेत
. संयुक्त राष्ट्राच्या २०१९च्या अहवालानुसार अनिवासी भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. १.७५ कोटी भारतीय हे जगाच्या विविध देशांमध्ये वसलेले आहेत. ही संख्या अमेरिकेत २७, युएईमध्ये ३४ आणि सौदी अरेबियात २४ लाख एवढी आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अहवालानुसार अनिवासी भारतीयांची परदेशातील संख्या ही जगात सर्वाधिक आहे. जगामध्ये २७ कोटींहून जास्त लोकांनी आपला देश सोडून इतर देशात प्रवेश केला आहे. हा प्रवेश हा दोन भागांमध्ये वाटता येईल. एकतर कायद्यानुसार केलेला प्रवास म्हणजे जसे अनिवासी भारतीय! दुसरे म्हणजे बेकायदेशीरपणे दुसर्‍या देशात प्रवेश करणारे, उदा. बांगलादेशी घुसखोर मोठ्या संख्यने भारतात घुसलेले आहेत. भारतीय लोक मोठ्या संख्यने युरोप आणि इतर प्रगत राष्ट्रांमध्ये आहेत. हे अनिवासी भारतीय तेथील लोकसंख्येमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक मानले जातात. अमेरिका आणि युरोप यांची १५ वर्षांपूर्वी ‘झिरो पॉप्युलेशन ग्रोथ’ सुरू झाली आहे. म्हणजे तेथील मूलनिवासी लोकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे आणि जन्माचे प्रमाण कमी आहे. म्हणूनच या देशांना वेगवेगळ्या सरकारी क्षेत्रामध्ये, खासगी क्षेत्रामध्ये काम करण्याकरिता, इतर देशातील नागरिकांची गरज पडते. प्रगत देश याकरिता वेगवेगळे नियम लावून फक्त अतिकुशल आणि कुशल अशाच लोकांना आपल्या देशात प्रवेश देतात. जसे की डॉक्टर, इंजिनिअर्स, नर्सेस किंवा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे.



या आधी अनिवासी भारतीय वेगवेगळ्या गटांमध्येविभागले आहेत
. या देशांमध्ये असलेले भारतीय हे ‘अतिकुशल’ वर्गवारीत मोडतात. त्यांचा अमेरिकेतील जीवनावरती पडणारा प्रभाव हा महत्त्वाचा आहे. परंतु, यापूर्वी अनिवासी भारतीय वेगवेगळ्या इतर गटांमध्ये विभागले गेले होते. उदा. अमेरिकेत मराठी लोकांची वेगळी संस्था, गुजराती लोकांची वेगळी संस्था, दक्षिणेकडील लोकांच्या वेगळ्या संस्था होत्या. यामुळे ही सर्व अनिवासी भारतीय मंडळी आपल्या प्रांताचे प्रतिनिधित्व करायचे, भारताचे कमी. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी अनिवासी भारतीयांना आपल्या देशाची एक मोठी ताकदच मानली आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले, तेव्हा तेथील अनिवासी भारतीयांना एकत्र आणून एक मोठाकार्यक्रम केला गेला. त्यामुळे आपले अनेक फायदे झाले. अनिवासी भारतीयांचे अमेरिकेतून भारतात येण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. त्याशिवाय काही प्रमाणात विकसित तंत्रज्ञानही भारतात येण्यास सुरुवात झाली. काही अनिवासी भारतीयांनी भारतामध्ये गुंतवणूक करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. अर्थात, ज्याप्रमाणे हे अपेक्षित होते तेवढे नाही. परंतु, मागच्या ६५ वर्षांच्या तुलनेत अनिवासी भारतीयांचे भारतातील स्थान आणि त्यांनी भारताला केलेली मदत नक्कीच अनेक पटींनी वाढलेली आहे.



चीन आणि पाकिस्तानची भारताविरुद्ध कारस्थाने


अनिवासी भारतीय सुशिक्षित
, धनाढ्य आहेत. तंत्रज्ञानाची माहिती त्यांना आहे. आधुनिक जगामध्ये काय सुरू आहे, हेदेखील त्यांना चांगले माहिती आहे. या अनिवासी भारतीयांना भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ समजले पाहिजे. भारताचे शत्रू चीन आणि पाकिस्तान हे सातत्याने भारताविरुद्ध कारस्थाने करतात. काश्मीरमधील‘कलम ३७०’ हटवल्यानंतर, भारतात काश्मिरी जनतेच्या मानवाधिकारांचे हनन होते आहे, असा दुष्प्रचार केला जात आहे. त्याशिवाय अनिवासी पाकिस्तानी नागरिकांनी इंग्लंडमध्ये भारतीय दूतावासावर ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर हल्ला केला होता. एवढेच नव्हे, तर कॅनडामधील काही कट्टरतावादी हे ‘खालिस्तान रेफ्रन्डम २०२०’ ही चळवळ सुरू करत आहेत. पाकिस्तानविरुद्ध चाललेली लढाई आता आपल्याला इतर देशांमध्येही लढावी लागेल. संयुक्त राष्ट्राप्रमाणे जगातील सर्व देशांना आपल्या बाजूने आणावे लागेल. ज्यामुळे ते भारताचे समर्थक होतील आणि चीन आणि पाकिस्तानचे नाही.



भारताची आक्रमक मुत्सद्देगिरी


सध्या भारत सरकारने आक्रमक मुत्सद्देगिरी सुरू केली आहे
. परंतु, त्यावर माध्यमांचे पुरेसे लक्ष जात नाही. आपल्या देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अनेक देशांना भेटी देऊन भारताविषयी माहिती देऊन त्या देशांशी आर्थिक, सामरिक, संरक्षण, गुप्तहेर माहितीसंदर्भात संबंध वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे परदेश दौरे करत आक्रमक मुत्सद्देगिरी करत आहेत. देशाचे पंतप्रधान जगातील महत्त्वाच्याविविध संस्था, देश यांची भेट घेऊन आपल्या देशाविषयी त्यांना माहिती देत आहेत. यामधील एक महत्त्वाचा देश म्हणजे अमेरिका, मग युरोप आणि नंतर आखाती प्रदेशातील देश. या देशांना भारताच्या बाजूने आणण्यासाठी येथील अनिवासी भारतीयांचा मोठाच सहभाग राहणार आहे. कारण, तिथे राहणारे अनिवासी भारतीय, तेथील सिनेटर्सना भारताची भूमिका काय आहे आणि कशी बरोबर आहे, याची माहिती देत आहेत. त्यामुळेच संयुक्त राष्ट्राच्या परिषद असो किंवा संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद असो की संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार समिती असो, या सर्वांमध्ये भारताच्या काश्मीरमधील ‘कलम ३७०’ हटवण्याच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बहुतेक जग आज भारताच्या बाजूने आहे.



अनिवासी भारतीय आणि भारताची नाळ मजबूत करा


मात्र
, मुत्सद्देगिरी हा एक भाग आहे. परंतु, अनिवासी भारतीय आणि आणि भारत देशाची नाळ अधिक मजबूतकरता आली, तर ते भारतामध्ये जास्त वेळा येऊन पर्यटन क्षेत्राचा मोठा विकास करू शकतील. अमेरिकेत अनिवासी भारतीय ‘मायक्रोसॉफ्ट,’ ‘गुगल’ किंवा ‘नासा’सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम करत आहेत. त्यांचा वापर करून आपल्याला तंत्रज्ञानाची क्षमता वाढवता आली, तर नक्कीच फायदा होईल. या अनिवासी भारतीयांचा वापर संरक्षण करारात करता येईल तसेच, सामरिकदृष्ट्या भारत-अमेरिका संबंध अधिक सुदृढ करून चीन आणि पाकिस्तान दोन्हींवर कुरघोडी करता येईल. आर्थिक संबंध हे देशाकरिता नेहमीच हिताचे असतात. त्याचाच वापर करून अनिवासी भारतीयांपैकी ज्यांनी उद्योगधंद्याच्या क्षेत्रात मोठी भूमिका बजावली आहे, त्याचा वापर करून आपल्याला थेट परकीय गुंतवणूक वृद्धी करण्यात नक्कीच मदत मिळू शकेल. त्याशिवाय उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणण्याचा वेग आपल्याला वाढवता येईल.



परदेशामध्ये भारत देशाचे प्रतिनिधी


जे अनिवासी भारतीय देशाच्या बाहेर गेले आहेत
, त्यांना ‘ब्रेन ड्रेन’ म्हणजे ‘देशाचे बौद्धिक नुकसानअसे समजण्यापेक्षा त्यांना परदेशामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून समजले पाहिजे. आपल्या देशाची प्रगती करण्यामध्ये त्यांचा जो सहभाग आहे, त्यात अजून जास्त वाढ करता येईल. भारताची आर्थिक ताकद वाढते आहे. त्याचबरोबर ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणजे भारतीयांची इतर ताकदसुद्धा वाढवून भारताला एक जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा देश म्हणून पुढे येण्यात मदत मिळूशकेल. अनिवासी भारतीय एकत्र येऊन विविध परदेशी राजकीय पक्षांवरसुद्धा दबाव टाकत आहे. योगअभ्यासाचा प्रसार करणे, भारतात काय घडते आहे, ते अमेरिकन लोकांना समजावणे, भारत-अमेरिका यांचा संबंध मजबूत झाले तर याचा अमेरिकन लोकांना कसा फायदा होईल, हे त्यांना समजावणे अशा प्रकारची कामे केली जात आहेत. या सर्व कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ह्युस्टन भेटीमुळे वेगच मिळणार आहे. येत्या पाच वर्षांमध्ये जगातील अनिवासी भारतीयांचा वापर करून आपली सामरिक, आर्थिक, संरक्षण नीती अधिक मजबूत केली पाहिजे.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

 

अग्रलेख
जरुर वाचा
नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही; हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद

"नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही"; हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद

(Vaishnavi Hagwane Case Hearing) वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला आता जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले. मात्र वैष्णवीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे प्रकरण सतत चर्चेत आहे. मात्र आता कोर्टात झालेल्या युक्तिवादामुळेच या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. कोर्टात झालेल्या युक्तिवादात हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवीची एका व्यक्तीसोबत चॅटिंग पकडल्यानंतर ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती,..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121