'जेजे'त जलरंग लहरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2019
Total Views |



मुंबई येथील जगप्रसिद्ध असलेल्या सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी 'जलरंग लहरी' या शीर्षकाखाली निसर्गचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये असलेल्या तळमजल्यावरील कक्षात 'जलरंग लहरी' पाहायला मिळतात. कलाक्षेत्रात पाय ठेवतानाच विद्यार्थ्यांना 'निसर्गचित्रण' हा एक बहिस्थ विषय असतो, जो बव्हंशी विद्यार्थ्यांना आवडतो. अशा विद्यार्थ्यांपैकीच चार विद्यार्थी 'जेजे'त कलाध्ययन करताना 'निसर्गचित्रणा'कडे आकर्षित झाले आणि पाहता पाहता 'जलरंग लहरी' साकारले. निनाद सावंतच्या निसर्गचित्रणात निसर्गातील आहत-अनाहत नाद दिसतो, तर किरण सितपच्या निसर्गचित्रणात रंगकिरणांचा खेळ दिसतो. मयुर धोपटने रंगांना निसर्गदृश्यांत बंदिस्त करून मयुरपंखाप्रमाणे श्रृंगारिक बनवले. निशांत खाड्येच्या निसर्गचित्रांत नीरव शांततेसह रंगलेपनातील आल्हाददायक श्रृंगार दिसतो. एकूणच या चार उदयोन्मुख नवकलाकारांचा हा निसर्गचित्रणाचा आविष्कार कौतुकास्पद आहे. जगप्रसिद्ध चित्रकार पॉल क्ली यांनी म्हटलेलं वाक्य फार बोलकं आहे. ते म्हणतात, "जेव्हा मी निसर्गचित्रण करण्यासाठी निसर्गात जातो, तेव्हा मी स्वतःच निसर्ग बनतो, याला निसर्गाशी एकरूप होणं असं म्हणतात. आपण पाहतो ते निसर्गचित्रण आपल्याला तेव्हाच मोहून टाकतं, जेव्हा ते त्या निसर्गचित्रकाराने निसर्गाशी एकरूप होऊन चितारलेलं असतं." 'जेजे'च्या या चतुरंगी उदयोन्मुख कलाकारांच्या 'जलरंगी लहरी' पाहताना ते निसर्गाशी एकरूप झाल्याची स्थिती दर्शवितात. म्हणून त्यांनी प्रदर्शित केलेल्या निसर्गचित्रांमध्ये काही निसर्गचित्रे ही रंगाकारांच्या खेळातील नैसर्गिक प्रगल्भता दाखवितात. त्यांचे प्रदर्शन 'जेजे'च्या तळमजल्यावरील कलादालनात नुकतेच संपन्न झाले.

 

समयावकाश

 

आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात 'वेळ' हा फार महत्त्वाचा घटक असतो. कोणती वेळ कशी येईल, हे सांगता येत नसतं. तद्वतच ही वेळ निघून जाईल, असे श्रीकृष्णाने अर्जुनाला वेळेचे महत्त्व सांगताना म्हटलेले होते. आपण ज्या जगात वा दुनियेत वावरतो, तो वावरत असण्याचा काळ म्हणजे चित्रकाराला अपेक्षित असलेली वेळ होय. चित्रकार सुरेंद्र डी. चावरे यांनी 'वेळ' आणि 'अवकाश' यांच्या ठायी स्वत:च्या भावना व्यक्त करताना रंग, कॅनव्हास आणि आकार यांचा उपयोग केलेला आहे. चित्रकाराला 'अवकाश' हे त्याचं आयुष्य भासतं. म्हणून चावरे म्हणतात, "आत्ताच्या क्षणी आपण जीवंत आहोत आणि हा क्षण आपणांस आपल्याला अंतर्मनातील भावनात्मक पातळीवर संपूर्ण पद्धतीने कसा जगता येईल, मुख्यतः हीच जाणीव मला चित्रनिर्मितीसाठी प्रेरणा देत असते." ही भावना चित्रकार चावरेंनी त्यांच्या अमूर्तकारी शैलीच्या कलाकृतींमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वसामान्यांना त्यांच्या कलाकृती समजल्या जरी नाहीत वा समजायला जरी कठीण वाटत असल्यातरी रंगाकारांच्या संकल्पनामुळे आनंद निश्चितपणे देतील असे वाटते. त्यांचे हे प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटर कलादालनात नुकतेच संपन्न झाले.

 

- प्रा. गजानन शेपाळ

@@AUTHORINFO_V1@@