पवारांचे 'ईडी'दर्शन नाहीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2019
Total Views |


 


मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कार्यालयावर धडकण्याच्या निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दुपारी अखेर मागे घेतला. मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि सहपोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विनय चौबे यांच्या भेटीनंतर ईडी कार्यालयावर धडकण्याच्या निर्णयाची त्यांनी तलवार म्यान केली.

 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीने शरद पवारांसह ७० नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर पवार यांनी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादीने संघर्षाचा पवित्रा घेत आपले कार्यकर्ते रस्त्यावर उतरवले. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे व सह पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विनय चौबे यांनी स्वत: पवारांची भेट घेऊन ईडीच्या कार्यालयात न जाण्याची विनंती केली. त्यांची विनंती मान्य करून पवारांनी तूर्त आपला निर्णय मागे घेतला.

 

पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर पवार म्हणाले की, "पोलीस आयुक्तांनी मला महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. आपण ईडीच्या कार्यालयात जाण्यावर ठाम राहिल्यास परिस्थिती चिघळू शकते. मी स्वत: अनेकदा गृहखात्याची जबाबदारी सांभाळली आहे. मला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. माझ्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सामान्य माणसाला त्रास होऊ नये म्हणून मी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला आहे,' असे ते म्हणाले. यावेळी पवारांसोबत धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील या राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यापूर्वी ईडीने केलेल्या इमेलमध्ये शरद पवार यांनी कार्यालयात यायची आवश्यकता नाही असे सांगितले होते. त्यानंतर पवारांनी स्वतःच ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच 'जर बोलवायचे असेल तर कळवले जाईल.' असेदेखील ईडीने म्हंटल्याचे त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@