विक्रम लँडरचे 'हार्ड लँडिंग' : नासा

    27-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : अमेरीकन अंतराळ संस्था नासाच्या 'लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर कँमरा'द्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो काढले. यावेळी नासाने भारताचे चांद्रयान २ ज्या ठिकाणी उतरले होते. त्या ठिकाणचे काही हाय रेजॉल्यूशनचे फोटोदेखील काढले आहेत. हे फोटो नासाने शुक्रवारी जारी केले आहेत. तसेच, विक्रम लँडरचा शोध घेण्याचा प्रयत्नही नासा करत आहे. नासाच्या लुनार रिकॉन्सिनन्स (एलओआर) ऑर्बिटरने विक्रम लँडरचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संध्याकाळच्या वेळेस फोटो काढण्यात आल्यामुळे विक्रम लँडर दिसू शकले नाही, असे नासाने सांगितले आहे.

 
 
 

विक्रम लँडर पुन्हा ऑक्टोबरमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही नासाने सांगितले आहे. विक्रम लँडर दक्षिण ध्रुवापासून ६०० किमी दूर पडले आहे. १७ सप्टेंबरला नासाचा लुनार आर्बिटर या भागातून गेला. त्यावेळी त्याने विक्रम लँडर ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणाचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये नासाला अपयश आले. चांद्रयान २ मोहिमेचा ऑर्बिटर व्यवस्थित काम करत असून लँडरशी संपर्क साधता आला नाही, असे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी केले आहे.

 
 
 

"अंतराळात शोधकार्य कठीण गोष्ट आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान -२ उतरवण्याच्या इस्रोच्या प्रयत्नाचे आम्ही कौतुक करतो, तुम्ही केलेल्या या कामगिरीने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे, भविष्यातील अंतराळ मोहिमांचे नियोजन आपण एकत्रित करु अशी आशा आहे" असे 'नासा'ने ट्वीटकरत इस्रोच्या कामाचे कौतुकही केले होते.

 

विक्रम लँडरला काय अडचण आली याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, असे सिवन यांनी सांगितले आहे. चंद्रापासून २ किमी दुर असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यामुळे भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ मोहीमेमध्ये अडथळा आला. त्यानंतर इस्रोने सातत्याने विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्येही यश आले नाही.