पुण्यात पावसाचे तांडव ; पुण्यात मुसळधार पावसामुळे ११ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2019
Total Views |



पुणे : मुसळधार पावसाने पुणे शहरात थैमान घातले असून, शहरातील अरण्येश्वर परिसरातील टांगेवाली कॉलनीत भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये दोन महिला दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तसेच, पुण्यात आतापर्यंत एकूण ११ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण अजूनही बेपत्ता आहेत. शहरात आलेल्या या पाणीबाणीमध्ये अनेक चारचाक्या तर दुचाक्यांची वाहून गेल्या आहेत.

 

संततधारेमुळे आंबिल ओढ्याला पूर आला असून, कात्रज ते दांडेकर पुलापर्यंत काठावरील घरांमध्ये पाणी शिरले. पद्मावती परिसरात आंबिल ओढ्याची सीमा असलेली भिंत कोसळल्याने काही सोसायट्यांमध्ये दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी शिरले. तसेच तावरे कॉलनी, सहकारनगर, लक्ष्मीनगर, दांडेकर पूल वसाहत या भागांमध्ये पाणी घुसले असून, जवळपास निम्मे शहर जलमय झाले आहे.एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू असून, कात्रज परिसरातील महामार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

 

मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहराचा वीजपुरवठा बंद आहे. काही ठिकाणी विजेचे ट्रान्सफॉर्मर्स पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला. पुढील पाच दिवस शहराच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्यामुळे सर्व पंप/मोटार नादुरूस्त झाले आहेत. परिणामी पद्मावती पंपिंग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या बिबवेवाडी, कोंढवा, मर्केट यार्ड परिसर, धनकवडी, बालाजी नगर, सहकार नगर परिसर, सातारा रोड परिसर भागांना पाणीपुरवठा होणार नाही, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@