‘अ ब्युटी विथ ब्रेन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2019
Total Views |




एक सामान्य गृहिणी ते नामांकित वक्ता असा जीवनप्रवास अनुभवलेल्या
, ‘ब्युटी’ आणि ‘ब्रेन’ या दोहोंचे वरदान लाभलेल्या आरती बनसोडे यांच्याविषयी आज जाणून घेऊया...


आयुष्यात अत्यंत कठीण काळातही न डगमगता काम करून आपले ध्येय गाठणारी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला आपण पाहत असतो, अनुभवत असतो. याचपैकी एक म्हणजे आरती बनसोडे. एक सामान्य गृहिणी ते एक नावाजलेली वक्ता हा त्यांचा रोमांचकारी प्रवास खूप काही सांगून जातो. मूळच्या बीडमधील आरती यांच्या घरी अत्यंत गरिबी. वडील कामगार, तर आई संसाराला हातभार लावण्यासाठी शिवणकाम करायची. आरतीला दोन मोठे भाऊ. या तिन्ही भावंडांनी आपले शिक्षण कोणत्याही शिकवणीशिवाय अगदी चांगल्या पद्धतीने मन लावून पूर्ण केले. आरतीलाही आयुष्यात खूप काही करण्याची जिद्द लहानपणापासूनच होती. इंजिनिअर व्हायचे असे आरतीने ठरवले होते. मात्र, परिस्थितीमुळे तिचे हे स्वप्न पूर्णत्वास आले नाही. मग आरतीने गणितात एम.एस्सी केले. पुढे तिला याच क्षेत्रात करिअर करायचे होते. मात्र, त्याच काळात तिचे लग्न ठरल्याने तिचे हेही स्वप्न धुळीला मिळाले. तिचे पती एका नामांकित कंपनीत उच्चपदावर कार्यरत असल्याने ‘तुला नोकरी करण्याची काय गरज?’ असा प्रश्न सासरच्यांकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आरतीला गृहिणी बनूनच आपला संसार करावा लागला.



पुढे पतीबरोबर काही वर्ष सिंगापूरला राहिल्यानंतर आरतीला आपणही काही ना काम केले पाहिजे
, असे प्रकर्षाने जाणवू लागले. मात्र, तिला कोणताच पाठिंबा मिळत नव्हता. त्यातच तिच्या पतीची बंगळुरूला बदली झाली. यावेळी मात्र आरतीने घरीच एका शेजारच्या मुलीची शिकवणी घेण्यास सुरुवात केली. तिच्या शिकवणीमुळे इतर अनेक आजूबाजूची मुलेही तिच्याकडे शिकवणीसाठी येऊ लागली. मात्र, परिवाराकडे दुर्लक्ष होत आहे, असे सांगून तिच्या शिकवण्याही बंद करण्यात आल्या. याच काळात आरतीला मुलगाही झाला. त्यामुळे तिने पुन्हा एकदा घरीच बसणे पसंत केले. २०१३ मध्ये मुंबईत आरतीच्या पतीची बदली झाली. मग आरतीने एका जाहिरात कंपनीत अनुवादाचे अर्धवेळ काम स्वीकारले. त्यावेळीच ‘मिसेस महाराष्ट्र’ या स्पर्धेच्या जाहिरातीचा अनुवाद त्यांनी केला. या एका अनुवादाने आरतीचे नशीबच बदलले. या स्पर्धेच्या आयोजकांनी स्वतः आरतीला या स्पर्धेत भाग घेण्यास आमंत्रण दिले. मात्र, या क्षेत्राचा कोणताच अनुभव गाठीशी नसल्याने आरतीने त्यासाठी स्पष्ट नकार दिला. मात्र, आरतीच्या मैत्रिणीने तिला या स्पर्धेत भाग घेण्यास भाग पाडले. घरच्यांच्या प्रचंड विरोधाला न जुमानता आरतीने या स्पर्धेसाठी नावनोंदणी केली. यासाठी खूप मेहनत आणि कष्ट घेतले. या स्पर्धेत आरतीला ‘मिसेस टॅलेंटेड’ हा किताब मिळाला. यानंतर मात्र आरतीने मागे वळून पाहिले नाही. तिला अनेक कार्यक्रमांसाठी आमंत्रणं मिळू लागली. यामुळे तिचा आत्मविश्वास अधिकच दुणावला. अत्यंत चांगली वक्ता असल्याने तिने अनेक ठिकाणी आपल्या भाषणातून लोकांची मने जिंकली. यातूनच तिने ‘व्यक्तिमत्त्व विकास’ याविषयी सेमिनार घेण्यास सुरुवात केली. आज अनेक प्रसिद्ध आणि नावाजलेल्या प्रसारमाध्यमांत त्या वक्ता म्हणून सहभागी होतात.



आज आरतीने आपल्या मेहनतीच्या बळावर खूप काही कमावले आहे
. पुढील महिन्यात होणार्‍या ‘मिसेस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेसाठीही तिची निवड झाली असून ती सध्या या स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे. आरतीला हे यश सहजासहजी मिळाले नसल्याने निश्चितच त्याचे मोल ती जाणते. समाजात अनेक महिला आपली ओळख, आपली स्वप्ने, इच्छा मारून जगतात. मात्र, आरतीने अशा महिलांना एक नवी दिशा दाखविली आहे. आज तिला तिच्या परिवाराकडून पूर्ण पाठिंबा मिळत आहे. आज बालगुन्हेगारी आणि महिला विकास, ज्येष्ठ नागरिक या विषयावर बोलण्यासाठी ती अनेक ठिकाणी वक्ता म्हणून आवर्जून उपस्थितीत असते. यावेळी समाजात अनेक लोकांना आपल्या जीवनाची दिशाच सापडत नसल्याची खंत ती बोलवून दाखवते. त्यामुळे मग अशा लोकांचे समुपदेशनसुद्धा करण्यास सुरुवात केली असून यासाठी आरतीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच तिने वेश्यावस्तीत जाऊन तेथील महिलांचे समुपदेशन केले. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यातून आरतीला एक नवीन ध्येय मिळाले असून ती लवकरच आपली सामाजिक संस्था सुरू करणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून ती लहान मुले आणि महिलांसाठी काम करणार आहे. तिचे वकृत्व गुण तिच्या मुलाच्या अंगीही असून त्यालाही ‘उत्कृष्ट वक्ता’ म्हणून अनेक बक्षिसे मिळाली आहेत. हीच कामाची खरी पोचपावती असल्याचे आरती सांगते. आज आरती बनसोडेचा एक सामान्य गृहिणी ते एक नामांकित वक्ता असा प्रवास आश्चर्यकारक आहे. कोणत्याही व्यक्तीने जर मनापासून ठरविले, तर तो काहीही करू शकतो, असे आरती म्हणते. आरतीने नुकताच ‘मानसशास्त्र’ विषयात प्रवेश घेतला असून पुढे तिला यात पदवी संपादित करायची आहे. शिक्षण ही प्रत्येक माणसाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे महिलांनी शिक्षण घेतलेच पाहिजे, असे आरतीचे ठाम मत आहे. तिच्या पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अनेकानेक शुभेच्छा!

-कविता भोसले
@@AUTHORINFO_V1@@