संक्रमण शिबिरातील रहिवाशांना हक्काची घरे तातडीने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |



म्हाडाचे आर. आर. बोर्ड होणार ऑनलाईन ! पुनर्वसन प्रक्रियेला वेग



मुंबई : म्हाडाच्या 'आर आर बोर्डातील सेस इमारतींचा पुनर्विकास, संक्रमण शिबीर वाटप प्रक्रिया, जुन्या इमारतींची देखभाल दुरुस्तीची कामे तसेच मास्टरलिस्ट आदी कामे आता ऑनलाईन होणार असल्याची माहिती आर. आर. बोर्डाचे मुख्याधिकारी सतीश लोखंडे यांनी दिली. आर. आर. बोर्डाचा कारभार ऑनलाईन झाल्याने आता या मंडळात होणाऱ्या गैरकारभाराला आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे.

 

इमारतींच्या संक्रमण शिबिरातून हक्काच्या घरात जाण्याचे नागरिकांचे स्वप्न आता अधिक पारदर्शक तऱ्हेने साध्य होईल. धोकादायक इमारतीतून संक्रमण शिबिरात हजारो रहिवासी वास्तव्यास गेले आहेत. त्या सर्व रहिवाशांचे मूळ ठिकाणी पुनर्वसन करताना लाल फितीच्या कारभाराची अडथळ्यांची शर्यत संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच उद्देशाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून लवकरच ऑनलाईनचा पर्याय आत्मसात केला जाणार आहे. त्याआधारे भविष्यात प्रत्यक्ष पुनर्वसनातील प्रक्रियेत कोणताही बाह्य हस्तक्षेप होणार नाही.

 


मुंबईतील जुन्या, धोकादायक वा दुर्घटनाग्रस्त इमारती, चाळीतील रहिवाशांना विविध संक्रमण शिबिरात पाठविण्यात येते. यातील बहुतांश इमारती दक्षिण मुंबईतील आहे. या सर्व संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे त्यांच्या मूळ भागात पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यापद्धतीने म्हाडाच्या पुनर्रचना मंडळाची योजना असली तरीही दलालांपासून अनेक स्तरावरील हस्तक्षेपामुळे पुनर्वसन हा वादाचा मुद्दा ठरला आहे. या रहिवाशांच्या मास्टर लिस्टनुसार संबंधित रहिवाशांना घरे मिळावीत, असा नियम आहे.

 


त्यात बगल देत परस्पर घरे ताब्यात घेण्यासह मूळ रहिवाशांना योजनेपासून दूर रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा प्रमुख आक्षेप आहे. त्यासाठी मूळ रहिवाशांकडूनही विरोधाची भूमिका घेतली जाते. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने ऑनलाईनच्या साहाय्याने त्यात पारदर्शकतेवर भर दिला आहे. सध्या या मंडळातर्फे भाडेआकारणीसाठी प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईनची मदत घेतली आहे. त्यास आलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर त इतर सर्व पद्धतीतही ऑनलाईनचा वापर करण्याचे ठरविण्यात येत आहे.

 

संक्रमण शिबिरातील रहिवाशांची यादी अद्ययावत केली जाईल. तसेच, पात्र रहिवाशांना घरे देताना त्याप्रकारे प्राधान्यक्रम ठरविले जातील. त्यात, सर्वात प्रथम मूळ ठिकाणाकडे, तिथे उपलब्ध नसल्यास बाजूच्याच भागात, तशी सुविधा नसल्यास अन्य विभागात स्थलांतर असे पर्याय दिले जातील. महत्त्वाचे म्हणजे ही यादी ऑनलाईनवर अद्ययावत केल्याने त्यात पूर्णपणे पारदर्शकता राखली जाऊ शकेल, असे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश लोखंडे यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@