‘डोन्ट फिअर, डॉ. पेठे इज हिअर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019   
Total Views |




बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ हे पद काटेरी मुकुटच. मात्र, या मुकुटाची जबाबदारी सक्षमपणे पेलणारा माणूस म्हणजे डॉ. शैलेश पेठे...

 


मुंबई (अक्षय मांडवकर) - ‘डोन्ट फिअर, डॉ. पेठे इज हिअर’ असे म्हणत मुंबईकर बिबट्यांची खर्‍या अर्थाने ‘नस’ पकडणारा माणूस म्हणजे पशुवैद्यक डॉ. शैलेश पेठे. उपचाराकरिता आलेल्या प्राण्याला जीव लावून प्रसंगी एखादा प्राणी दगावल्यास भावूक होणारे डॉ. पेठे बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ पदावर कार्यरत आहेत. बिबट्या बचावाच्या कठीण प्रसंगी बड्या खुबीने प्राण्याला जेरबंद करण्यामध्ये त्यांचा हातखंडा. कुटुंबाच्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी जिद्द आणि मेहनतीने पशुवैद्यकीय शिक्षण घेतले. संपूर्ण आयुष्य प्राण्यांसाठी काम करण्याचे व्रत घेतलेला हा माणूस राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांचा तारणहार ठरला आहे.

 


 


डॉ. पेठे यांचा जन्म दि. ३ फेब्रुवारी, १९७३चा. उंबरगाव हे त्यांचे मूळ गाव. गावातल्या वातावरणात त्यांचे बालपण गोठ्यातल्या गुराढोरांनी वेढलेले होते. यातूनच प्राण्यांप्रतिची दया त्यांच्या मनात रुजत गेली. ते पाच वर्षांचे असताना पेठे कुटुंबीय उंबरगावहून मुंबईतल्या बोरिवलीत स्थायिक झाले. या ठिकाणी आल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावत गेली. अशा बेताच्या परिस्थितीतही शैलेशने वैद्यकीयशास्त्राचे शिक्षण घ्यावे, अशी घरच्यांची इच्छा होती. डॉ. पेठेंची ओढ पशुवैद्यकीय शिक्षणाकडेच सुरुवातीपासून होती. अखेरीस त्यांनी १९९० साली मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला. पाच वर्षे चिकाटीने अभ्यास करून पशुवैद्यकाची पदवी मिळवली. पुढे ‘व्हेटेर्नरी मेडिसीन’ विषयामधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षणाकरिता त्यांनी प्राण्यांना प्रत्यक्षात हाताळून काम करण्यातील आपली आवड हेरली आणि अभ्यासाकरिता त्याच पद्धतीच्या विषयांची निवड केली. त्यासाठी ‘वीर जिजामाता भोसले प्राणिसंग्रहालया’त (राणीबाग) ‘झू मेडिसीन’ या विषयातील प्रत्यक्ष ज्ञान मिळविण्याकरिता सहा महिने प्रशिक्षण घेतले. १९९७ साली त्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

 

 

 


शिक्षणानंतर पेठेंना लगोलग पशुवैद्यकीय महाविद्यालयात ‘अतिरिक्त शल्यचिकित्सक’ म्हणून नोकरी मिळाली. मात्र, ही नोकरी त्यांना भविष्यातील अनुभवाच्या दृष्टीने फायदेशीर ठरली. नोकरीच्या निमित्ताने ते दररोज २५० ते ३०० कुत्र्यांवर उपचार करायचे. याठिकाणी अडीच वर्ष नोकरी केल्यानंतर १९९९ साली ते राज्याच्या पशुसंवर्धन विभागात ‘पशुसंवर्धन विकास अधिकारी’ म्हणून रुजू झाले. पुढे २०१२ मध्ये त्यांची बढती साहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन या पदावर झाली. पशुसंवर्धन विभागातील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना दोन वेळा शासनाचा सर्वोत्कृष्टकर्मचार्‍याचा पुरस्कार मिळाला. अशातच २०१६ साली त्यांच्यासमोर आयुष्याला कलाटणी देणारी संधी चालून आली. त्यावेळीच अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) सुरेश थोरात यांनी डॉ. पेठेंना ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्यासंदर्भात विचारणा केली. हे पद त्यांच्या पशुसंवर्धन विभागातील पदापेक्षा बर्‍याच कनिष्ठ श्रेणीचे होते. मात्र, सुरुवातीपासून त्यांची ओढ ही प्राण्यांना प्रत्यक्ष हाताळून काम करण्याकडे होती. शिवाय पशुसंवर्धन विभागातील बढतीमुळे कार्यालयीन कामकाजात त्यांचा बराच वेळ जात होता. त्यामुळे वन विभागाकडून चालून आलेली संधी हेरून त्यांनी राष्ट्रीय उद्यानात काम करण्यास सुरुवात केली.

 


 
 


सुरुवातीच्या काळात डॉक्टरांसमोर पिंजराबंद अधिवासातील वन्यजीवांशी जुळवून घेण्याबरोबरच तेथील कार्यपद्धती जाणून घेण्याचे आव्हान होते. प्राण्यांवर उपचार करण्यासंदर्भातील शास्त्रीय ज्ञान त्यांच्यापाशी होते. मात्र, जंगलात अधिवास करणारा प्राणी हा पाळीव प्राण्याप्रमाणे आपल्या आजाराची लक्षणे दाखवत नाही. शिकार्‍यांच्या भीतीने वन्यप्राणी आपल्या आजाराची लक्षणे लपवून ठेवतात. त्यामुळे डॉ. पेठेंनी ही लक्षणे हुडकण्याची कला निरीक्षणाच्या माध्यमातून अवगत केली. याविषयाबाबत डॉ. पेठे सांगतात की, “पशुसंर्वधन विभागात कार्यरत असताना प्राण्याच्या मालकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही प्राण्यावर उपचार करायचो. मात्र, राष्ट्रीय उद्यानामधील पिंजराबंद अधिवासातील वन्यप्राण्यांचा मी स्वत:च पालक असल्याने त्यांच्या आजाराचे नेमके कारण मला ठाऊक असते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे अधिक सुलभ होते.” या कामाबरोबरच डॉ. पेठे राष्ट्रीय उद्यानाच्या ‘बिबट्या बचाव पथका’चे नेतृत्वदेखील करतात.

 

 
 


मुंबईतल्या दाटीवाटीच्या लोकवस्तीत बिबट्या शिरण्याच्या घटना वर्षामधून दोन ते तीन वेळा घडतातअशावेळी वातावरण चांगलेच तंग होते. प्राण्याची त्यावेळची शाररिक आणि मानसिक परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याला बेशुद्ध करण्याचे आव्हान डाॅक्टरांसमोर असते. शिवाय जमलेल्या बघ्यांच्या गर्दीतून प्राण्याला सुखरुप बाहेर काढण्याचे अग्निदिव्यही पार पाडण्याचे काम पथकाच्या मदतीने त्यांनाच पूर्ण करावे लागते. जनजागृतीच्या माध्यमातून बिबट्या सहजीवनाची कला मुंबईकरांच्या अंगी बिंबवण्याचे कामही डॉ. पेठे ‘मुंबईकर फॉर एसजीएनपी’ या मोहिमेच्या माध्यमातून करत आहेत. असे हे राष्ट्रीय उद्यानाचे ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ हे पद काटेरी मुकुटच. कारण, एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यावर बोट दाखविण्याचे काम याच पदाकडे दाखविले जाते. शिवाय माध्यमातून होणार्‍या टीकेचा सामनाही करावा लागतो. मात्र, डॉ. पेठे या सगळ्या संकटांचा सामना आत्मविश्वासाने आणि हसतमुखाने ‘डोन्ट फिअर, डॉ. पेठे इज हिअर’ असे म्हणतंच करतात. अशा अवलियाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
@@AUTHORINFO_V1@@