‘मलाला’ की ‘ग्रेटा’?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019   
Total Views |



‘ग्रेटा’ की ‘मलाला’, अशा स्वरूपातील कलही घेण्यात आले. बर्‍याचजणांनी यांना लहान वयात मिळालेल्या प्रसिद्धीसंदर्भातही भाष्य केले. मुळात म्हणजे, या दोघी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, त्यांना एका तराजूत तोलणे तसे कठीणच. मात्र, त्यांनी नाण्याची दुसरी बाजूही पाहायला हवी, अशा प्रतिक्रियाही जनमानसात उमटू लागल्या आहेत.



‘हाऊ डेअर यू’, असे म्हणत ग्रेटा थनबर्गने संयुक्त राष्ट्रांच्या सभेत जगभरातील नेत्यांना खडसावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. इथे फक्त पैशांची चर्चा होते. जागतिक वातावरण बदलातील प्रयत्न फारच तोकडे आहेत, असे सांगत ती भावनिक झाली. ग्रेटा आणखी एका कारणामुळे चर्चेत राहिली ते म्हणजे तिने जगातील बलाढ्य महासत्ता मानल्या जाणार्‍या देशाच्या अध्यक्षांनाच थेट खुन्नस दिली. “पृथ्वीवर जागतिक तापमानवाढ, अशी कोणतीही समस्याच नाही,” असे सांगत ट्रम्प यांनी पॅरिस करारातून माघार घेतली. मात्र, त्यांची या परिषदेतील उपस्थिती अनपेक्षित होती. याच भेटीदरम्यान ग्रेटा आणि ट्रम्प यांची नजरानजर झाली. मात्र, सुरक्षारक्षकांनी ग्रेटाला अडवले. ग्रेटाच्या चेहर्‍यावरील त्यावेळचे नेमके हावभाव कॅमेर्‍यात टिपण्यात आले आणि तिचा दुसर्‍याही व्हिडिओची जोरदार चर्चा झाली. ट्रम्प यांनी तिच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करत,“तिचे भविष्य पाहून आनंदी वाटले,” असे ट्विट केले. ट्रम्प यांच्या या ट्विटला अनेकांनी विरोधात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.



हा झाला एक भाग, सोशल मीडियावर दुसर्‍या दिवशी ग्रेटाचे भरभरून कौतुकही झाले. मात्र, तिच्या कामाबद्दल समीक्षण करणाराही गट पुढे आला. ‘ग्रेटा’ की ‘मलाला’, अशा स्वरूपातील कलही घेण्यात आले. बर्‍याचजणांनी यांना लहान वयात मिळालेल्या प्रसिद्धीसंदर्भातही भाष्य केले. मुळात म्हणजे, या दोघी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, त्यांना एका तराजूत तोलणे तसे कठीणच. मात्र, त्यांनी नाण्याची दुसरी बाजूही पाहायला हवी, अशा प्रतिक्रियाही जनमानसात उमटू लागल्या आहेत. ग्रेटा या परिषदेसाठी दोन आठवडे सौरऊर्जेवर चालणार्‍या बोटीतून आली, याच्याबद्दल जितकी चर्चा आहे, तितकी चर्चा तिच्या खाण्याच्या टेबलवर दिसणार्‍या प्लास्टिकचीही आहेच. ग्रेटाच्या कामाबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र, ज्या प्रकारे ती याचे ब्रॅण्डिंग करते, त्याबद्दल अनेकांना आक्षेप आहे. तिच्या समर्थनातही अनेकांनी उडी घेतली. ‘हाऊ डेअर यू’ या हॅशटॅगखाली अनेकांनी सोशल मीडियावर चळवळही उभी केली. ‘ग्रेटा की मलाला?’ या प्रश्नाचा दुसरा भाग अर्थात मलालाच्या भूमिकेबद्दलचा. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरबद्दल तावातावाने बोलणार्‍या मलालाला बलुचिस्तान, सिंध, शिया, पख्तुन, अल्पसंख्याकांचे जबरदस्ती धर्मांतरण, हझारा, काश्मीरमधील दहशतवादी हल्ले यावर तिने ‘ब्र’ काढलेला नाही. याचा जाब मलालाला विचारण्यात आला. मलालाचे ट्विट होते, “मी गेले चार दिवस शाळेत जाऊ शकली नाही. १२ ऑगस्ट रोजी माझी परीक्षा बुडाली.

मला लेखक व्हायचंय, मला काश्मीरमधील एक स्वतंत्र महिला म्हणून जगायचं आहे. पण, आता हे कठीण दिसतंय.” काश्मीरमधील एका विद्यार्थिनीचा दाखला देत मलालाने ट्विट केले होते. मात्र, तिच्या ट्विटवर भारतीय नेटीझन्सनी अनेक प्रश्न विचारले. ५ ते १० ऑगस्ट दरम्यान कलम ३७० रद्द केल्यानंतर शाळा बंद होत्या. ११ ऑगस्ट रविवार असल्याने शाळा बंद, १२ व १२ ऑगस्ट रोजी ईदनिमित्त सुट्टी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्तची सुट्टी त्यामुळे मलालाने केलेल्या या ट्विटला अनेकांनी प्रतिप्रश्नही केला. एखादे ट्विट करताना त्यामागची सत्यताही पडताळून घ्या, असा टोलाही तिला लगावण्यात आला. नेमबाज हीना सिंधूनेही तिला धारेवर धरले. “काश्मीरबद्दल बोलताना, तुझा जीव कसाबसा वाचवून पळाली होतीस, त्याचा विचार का करत नाहीस? आधी पाकिस्तानात परत ये. तिथल्या गोष्टींवरही बोलत जा,” असा टोला हीनाने तिला लगावला होता. मलाला भारताबद्दलच्या प्रश्नांबद्दल सातत्याने भूमिका मांडत असते. तिच्या ‘मलाला फंड’ या ट्विटर अकाऊंटद्वारे उत्तर प्रदेशातील एका मुलीने गावात महाविद्यालय नसल्याबद्दल खंत व्यक्त करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. मात्र, पाकिस्तानात वेळोवेळी हिंदू अल्पसंख्याक महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात ती बोलणे टाळत असते. मलाला सध्या ब्रिटनमध्ये राहते. दहशतवादाने पीडित देश असलेल्या पख्तूनख्वा येथे ती राहणारी आहे. २०१२ मध्ये स्त्रीशिक्षणाविरोधात आवाज उठवला म्हणून तालिबान्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून ती ब्रिटनमध्ये परिवारासह वास्तव्य करत आहे. तिच्या कामाच्या योगदानाबद्दल तिला कैलाश सत्यार्थी यांच्यासह नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले होते. मलाला असो किंवा ग्रेटा त्यांच्या कामाबद्दल आदरच. मात्र, कमी वयात मिळालेल्या प्रसिद्धीचा भार सांभाळत जागतिक मुद्दे मांडताना सर्वंकश विचार करण्याची गरज आहे.

@@AUTHORINFO_V1@@