शेकडो समाजबांधवांची रशिया वारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2019
Total Views |


आंतरराष्ट्रीय परिषदेत अण्णाभाऊंच्या विचारांचा गजर

दि. १६ व १७ सप्टेंबर, २०१९ रोजी रशियाच्या मॉस्को शहरात असणार्‍या ‘पुश्कीन इन्स्टिट्यूट’मध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीनिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. मुंबई विद्यापीठ, ‘पुश्कीन इन्स्टिट्यूट’ यांच्या संयुक्त विद्यमाने व ‘एमजीडी’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने या आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनाला दोन्ही विद्यापीठांच्या प्रमुख अधिकार्‍यांसोबत भारताचे रशियातील राजदूत डी. बालकृष्ण हे उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेला देशभरातून ३५० प्रतिनिधी उपस्थित होते. इतक्या मोठ्या संख्येने परदेशात जाऊन एखाद्या महापुरुषांच्या साहित्याची व जीवनाची मांडणी करण्याची ही पहिलीच घटना आहे.



१६ सप्टेंबर, १९६३ ला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियाच्या भूमीवर पाय ठेवला आणि पुढे ४० दिवस ते रशियात राहिले. या कालखंडात त्यांनी पाहिलेला रशिया, अनुभवलेले समाजजीवन त्यांनी ’माझा रशियाचा प्रवास’ या पुस्तकातून मांडला आहे. जेव्हा नेहरूंच्या पंचशीलाचा गवगवा होता, सोव्हिएत रशिया आणि भारत यांचे संबंध चांगले होते आणि दोन्ही देशात सांस्कृतिक आदानप्रदान मोठ्या प्रमाणात होत होते, त्याकाळात अण्णाभाऊ साठे रशियाला गेले. रशियातील ‘इंडोसोव्हिएत कल्चरल सोसायटी’च्या आमंत्रणावरून ते रशियाला गेले. हे सारे विस्ताराने सांगण्याचे कारण दि. १६ व १७ सप्टेंबर, २०१९ रोजी रशियाच्या मॉस्को शहरात असणार्‍या ‘पुश्कीन इन्स्टिट्यूटमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीनिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. मुंबई विद्यापीठ, पुश्कीन इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने व एमजीडी या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने या आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनाला दोन्ही विद्यापीठाच्या प्रमुख अधिकार्‍यांसोबत भारताचे रशियातील राजदूत डी. बालकृष्ण हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात या अभिनव परिषदेचे कौतुक करून असे उपक्रम सातत्याने केले तर दोन्ही देशातील सांस्कृतिक आदानप्रदान अधिक वेगाने होऊ शकेल, असे मत मांडले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. संजय देशपांडे, डॉ. शिवाजी सरगर, ‘पुश्कीन इन्स्टिट्यूट’चे कुलगुरू(रेक्टर)(अधिष्ठाता)डॉ. मार्गारिटा, प्रो.रेक्टर(उपअधिष्ठाता) डॉ. शिवेलता तिगोरोवा, डॉ. अ‍ॅना खेकतेल - संचालक, डॉ. सोनू सैनी दिल्ली इ. मान्यवर उपस्थित होते.




या परिषदेत सुमारे ४५ शोधनिबंध सादर केले गेले
. भारत-रशिया व्यापार, भारत-रशिया सांस्कृतिक संबंध या विषयाबरोबरच अण्णाभाऊ साठे, अफणासी निकीतीन, अलेक्झांडर पुश्किन यांच्या साहित्यावर चर्चा घडवून आणणारे व अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची नव्या परिपेक्षातून मांडणी करण्याचा प्रयत्न झाला. आजवर महाराष्ट्रातील समीक्षकांनी अण्णाभाऊ साठे यांना साम्यवादी नजरेतून पाहिले. त्यामुळे त्यांच्या साहित्याचे सर्वार्थाने योग्य मूल्यमापन झाले नाही. राष्ट्रीयतेच्या पातळीवर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर चर्चा घडवून आणली गेली नाही. साम्यवादी पक्ष आणि संघटना यांनी अण्णाभाऊ साठे यांचा केवळ वापरच करून घेतला. या सार्‍या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे विविध पैलू अधोरेखित करण्याचे काम या परिषदेतून झाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील राष्ट्रीय विचार, त्यांच्या साहित्यातील भारतीय जीवनमूल्ये, ‘फकिरा’ कादंबरीतील राष्ट्रवादी भूमिका असे विषय या परिषदेतून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडले गेले. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची चर्चा घडवून आणताना त्यांचे साहित्य हे कोणत्याही एका विचारधारेच्या प्रभावामुळे उत्पन्न झालेले नसून माणुसकीचा कळवळा आणि येथील मातीशी जोडलेली नाळ यांच्या आधाराने निर्माण झालेले आहे. हे अधोरेखित करण्याचे काम या परिषदेतून झाले.



या आंतरराष्ट्रीय परिषदेला महाराष्ट्र
, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांतून ३५० प्रतिनिधी उपस्थित होते. इतक्या मोठ्या संख्येने परदेशात जाऊन एखाद्या महापुरुषांच्या साहित्याची व जीवनाची मांडणी करण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या परिषदेची नोंद घेताना अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रेम करणार्‍या समाजबांधवांना आणि त्यांचा श्रद्धेला विसरून चालणार नाही. या आंतरराष्ट्रीय परिषदेला गेलेल्या प्रतिनिधींना काय मिळाले, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. त्याचे उत्तर असे आहे की, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे निर्मळ दृष्टीने परिशीलन करण्याची प्रेरणा या आंतरराष्ट्रीय परिषदेतून प्राप्त झाली आहे. एकदा महापुरुष केवळ आपल्या जातीचा आहे म्हणून त्यांचा गौरव करण्यापेक्षा त्यांच्या कार्याचे कालोचित मूल्यमापन करून संपूर्ण समाजासाठी तो महापुरुष कसा आदर्श आहे, हे उपस्थित प्रतिनिधींच्या मनावर बिंबवण्याचे काम या परिषदेतून झाले. ‘एमजीडी’ या सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने या आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन झाले. दोन विद्यापीठांच्या सहकार्याने ही परिषद संपन्न झाली. त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे ज्या हॉटेलमध्ये ४० दिवस राहिले तेथे एक तैलचित्र लावले गेले. ‘पुश्कीन इन्स्टिट्यूट’च्या ग्रंथालयामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण झाले. या सार्‍या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आ. सुधाकर भालेराव आणि अमित गोरखे यांच्याबरोबरच ‘एमजीडी’ या सामाजिक संस्थेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सुनील वारे, डॉ. बळीराम गायकवाड, आनंद कांबळे यांचे नेतृत्व आणि सुयोग्य नियोजन यामुळे हा पूर्ण उपक्रम केवळ यशस्वी झाला नाही, तर परदेशात अशाप्रकारे कार्यक्रम कसे आयोजित करावेत यांचे मार्गदर्शन करणारे ‘पायोनिअर्स’ ठरला.

-रवींद्र गोळे
@@AUTHORINFO_V1@@