
प्रारूप-न्यायालय व निकालपत्रलेखन स्पर्धा संपन्न
मुंबई: दादर येथील बाळासाहेब आपटे विधी महाविद्यालयाच्या वतीने २१ ते २३ सप्टेंबर २०१९ रोजी प्रारूप-न्यायालय व निकालपत्रलेखन स्पर्धा पार पडली. स्पर्धेत २४ संघांनी व ४८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. अंतिम फेरीचे परीक्षण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. प्रकाश नाईक व मा. मोहिते-डेरे यांनी पहिले. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमही उच्च न्यायालयाच्य न्यायमूर्तींच्या हस्ते पार पडला.
'प्रारूप-न्यायालय' या स्पर्धाप्रकारात एखाद्या काल्पनिक प्रकरणावर कायदेशीर दृष्टीने दोन विद्यार्थ्यांचा संघ युक्तिवाद करतो. संघातील दोन्ही विद्यार्थ्यांनी खटल्यातील दोन वेगवेगळ्या बाजूंचे प्रतिनिधित्व करायचे असते. संपूर्ण प्रकरणाच्या जास्तीत-जास्त वैधानिक पैलूंना उजाळा देणाऱ्या संघाला विजयी घोषित केले जाते. निकालपत्र-लेखन स्पर्धेत प्रत्यक्षात न्यायमूर्ती ज्या पद्धतीने खटल्याचा निकाल लिहितात त्यानुसार निकाल लिहायचा असतो.

बाळासाहेब आपटे विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. निकालपत्र-लेखन स्पर्धेत आभा पेंडसे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक संपादन केला. प्रारूप-न्यायालय स्पर्धेत शासकीय विधी महाविद्यालयाचा संघ विजयी ठरला आहे. खुबी अग्रवाल व वासुदेव कश्यप यांनी हा बहुमान मिळवला. पारितोषिक वितरण समारंभ रविवारी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली गुरव, जेष्ठ विधिज्ञ राम आपटे, विधीज्ञ अंजली हेळेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. पारितोषिक वितरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत नाईक व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवसीय स्पर्धांची व्यवस्थापकीय प्रमुखापदाची जबाबदारी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी गार्गी वारुंजीकर व धृती दातार यांनी सांभाळली.
.