‘थॉमस कूक’ची चूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019   
Total Views |



सध्या केवळ भारतीयच नाही
, तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही हादरे बसले आहेत. त्यातच सौदी अरेबियाच्या ‘अरामको’ कंपनीवरील ड्रोन हल्ल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही उसळल्या. अशा तंग वातावरणात ‘थॉमस कूक’च्या दिवाळखोरीची बातमी येऊन ठेपल्याने भारतासह जगभरात त्याचे पडसाद न उमटले तर नवलच.



‘थॉमस कूक’ या जवळपास १७८ वर्षांपेक्षा जुन्या कंपनीने अखेरीस दिवाळखोरी जाहीर केली. पर्यटन, हॉटेल्स आणि एअरलाईन्स क्षेत्रात गेल्या शतकाहून अधिक काळ तब्बल १९ दशलक्ष लोकांना १६ देशांमध्ये सेवा देणार्‍या या विश्वसनीय कंपनीचा असा शेवट मात्र विचार करायला लावणारा आहे. सध्या केवळ भारतीयच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही हादरे बसले आहेत. त्यातच सौदी अरेबियाच्या ‘अरामको’ कंपनीवरील ड्रोन हल्ल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही उसळल्या. अशा तंग वातावरणात ‘थॉमस कूक’च्या दिवाळखोरीची बातमी येऊन ठेपल्याने भारतासह जगभरात त्याचे पडसाद न उमटले तर नवलच. ‘थॉमस कूक’ची सेवा ठप्प झाल्याने जगभरात तब्बल सहा लाख पर्यटकांचा खोळंबा झाला आहे, तर त्यापैकी ब्रिटिश पर्यटकांना मायदेशी परत आणण्यासाठी ब्रिटन सरकारने पुढाकार घेतला आहे. पण, सध्या सर्वात वाईट अवस्था आहे ती ‘थॉमस कूक’ मध्ये कार्यरत नोकरदारवर्गाची.



कारण
, जवळपास २२ हजार कामगारांवर एकाएकी अशी बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळल्याने विशेषत्वाने आधीच ‘ब्रेक्झिट’च्या सावटाखाली असलेल्या ब्रिटनच्या चिंतेत भर पडली आहे. दिवाळखोरी टाळण्यासाठी ‘थॉमस कूक’ला २०० दशलक्ष पाऊंडांची गरज होती. बँका तसेच खासगी गुंतवणूकदार मात्र ‘थॉमस कूक’ला मदत करण्यास असमर्थ ठरले, तर ब्रिटन सरकारनेही ‘थॉमस कूक’ने मागणी केलेल्या १५० दशलक्ष पाऊंडांचे बेलआऊट पॅकेज देण्यास नैतिक आधारावर असमर्थता दर्शविली. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून आर्थिक तोल ढासळत चाललेल्या या कंपनीला अखेरीस टाळे लावण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. पण, दोन जागतिक महायुद्धे, इंटरनेटची क्रांती अशी वैश्विक स्थित्यंतरे अनुभवलेल्या या कंपनीवर दिवाळखोरीची वेळ का आली, याची यानिमित्ताने कारणमीमांसा करणे क्रमप्राप्त ठरते.



‘थॉमस कूक’ ही कंपनी एकाएकी बुडालेली नाही, हे सर्वप्रथम समजून घ्यायला हवे. २०११, २०१३ सालीही जवळपास अशीच परिस्थिती उद्भवली होती. पण, स्कॉटलंड बँकेने आणि नंतर समभागधारकांनी उभारलेल्या निधीच्या जोरावर ‘थॉमस कूक’ने परिस्थिती कशीबशी निभावून नेली. पण, ‘थॉमस कूक’वर कर्जांचा बोजा हळूहळू वाढतच गेला आणि आता तो १.६ अब्ज पाऊंडांवर जाऊन पोहोचला. शेअर बाजारातील असमाधानकारक ट्रेडिंग, व्यवस्थापनातील सावळ्या गोंधळाने या बिकट परिस्थितीत अधिकच भर घातली आणि ‘थॉमस कूक’ अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलली गेली.



दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे
, ‘थॉमस कूक’ला पर्यटनक्षेत्रात निर्माण झालेली तीव्र स्पर्धा. हजारो ऑनलाईन वेबपोर्टल्सवरून होणारे टूर बुकिंग, स्वस्त विमानभाडे आणि सवलती याचा पारंपरिक टूर पॅकेजेसची विक्री करणार्‍या ‘थॉमस कूक’ला फटका बसला. इतकेच नाही, बुकिंगसाठीच्या कार्यालयांचा वाढता खर्च, कर्मचार्‍यांचे पगार यामध्ये कपात करण्यासही ‘थॉमस कूक’ अयशस्वी ठरले. आकडेवारी सांगते की, ब्रिटिश पर्यटकांनी पर्यटनासाठी ‘थॉमस कूक’ला पसंती न देता इतर पर्यायांचा अवलंब केला. शिवाय, गेल्या एक-दोन महिन्यातील युरोपातील तीव्र उष्णतेच्या लाटेमुळेही ब्रिटनच्या पर्यटकांनी मायदेशीच फिरणे पसंत केले. त्याचबरोबर ‘ब्रेक्झिट’च्या अनिश्चिततेमुळे ब्रिटिश नागरिकांनी पर्यटनाऐवजी पाऊंडांची बचत करणेच उचित समजले. परिणामी, ‘थॉमस कूक’चे कंबरडे मोडले आणि १८४१ साली सुरू झालेल्या या पर्यटन कंपनीचा असा विदारक शेवट झाला.



‘थॉमस कूक’च्या दिवाळखोरीचा भारतातील याच नावाच्या कंपनीवर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झालेे आहे. कारण, ‘थॉमस कूक युके’चा ‘थॉमस कूक इंडिया’शी संबंध नाही. कारण, भारतीय ‘थॉमस कूक’ ही ‘फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज’ या कंपनीने २०१२ साली खरेदी केली असून ‘थॉमस कूक’ हे नाव वापरण्याचा करार मात्र २०१४ पर्यंत अबाधित आहे. पण, तरीही कदाचित भारतीय कंपनी आगामी काळात आपल्या नावात बदलही करू शकते. अडीचशे कोटींच्या या कंपनीचे भारतातील सर्व व्यवहार मात्र सुरळीत असून कर्मचार्‍यांवरही त्याचा परिणाम होणार नाही, हे महत्त्वाचे.

@@AUTHORINFO_V1@@