अद्भुत, अकल्पनीय आणि अविश्वसनीय...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, अमेरिकेतील ह्युस्टन येथील एनआरजी स्टेडियममध्ये झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने इतिहास घडवला आहे! या कार्यक्रमाने जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील मैत्रीवर फक्त शिक्कामोर्तबच केले नाही, तर ती आणखी दृढ केली आहे. यासोबतच या दोन देशांनी इस्लामिक दहशतवादाविरुद्ध लढाईचे रणशिंगही फेकले, हाही जगाला मोठा संदेश मानला पाहिजे. मोदी हे इतिहास घडवणारे नेते म्हणून ओळखले जातात, आतापर्यंत आपल्या जगावेगळ्या कर्तृत्वाने त्यांनी भारतातच नाही, तर आता अमेरिकेतही इतिहास घडवला आहे. आतापर्यंतच्या अमेरिकेच्या इतिहासात दुसर्या देशाचा असा एकही कार्यक्रम झाला नाही. ‘हाऊडी मोदी’सारखा कार्यक्रम जगातील दुसर्या कोणत्याही देशाला अमेरिकेत करता आला नाही, जो भारताने करून दाखवला. या कार्यक्रमाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेली उपस्थिती! कारण, अशा कार्यक्रमाला अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे, ही बाब लक्षात घेतली तर भारताच्या वाढलेल्या प्रभावाचा अंदाजही सहज येईल.
 
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमातील उपस्थिती अमेरिकेच्या लेखी असलेले भारताचे महत्त्व दर्शवणारी तसेच पाकिस्तानला त्याची जागा दाखवणारी आहे. अमेरिका हा आपल्यासोबत आहे, आपण काहीही केले तरी नेहमीसाठी आपल्या पाठीशी उभा राहील, या भ्रमात राहणार्या पाकिस्तानचे डोळे या कार्यक्रमाने आतातरी उघडतील, अशी आशा करायला हरकत नाही. याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौर्यावर गेले असता, त्यांचे तेथे झालेले स्वागत, इम्रान खान आणि पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवण्यासोबत पाकिस्तान आता पहिलेसारखा अमेरिकेच्या ‘गुडबुक’मध्ये राहिला नाही, हे दर्शवणारे होते. याउलट, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत जागतिक राजकारणात भारताचे विशेषत: पंतप्रधान मोदी यांचे वाढत असलेले महत्त्व दाखवणारे होते. आतापर्यंतच्या जागतिक राजकारणात अमेरिकेने पाकिस्तानची पाठराखण केली, ही वस्तुस्थिती आहे, पण आता अमेरिकेने आपली चूक दुरुस्त करायचे ठरवले. भारताने पुढे केलेला मैत्रीचा हात सहर्ष स्वीकारला, हे ह्युस्टन घटनेतून दिसून येते. भारत आणि अमेरिकेलाच नाही, तर संपूर्ण जगाला आज इस्लामिक दहशतवादाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
 
 
 
अमेरिकेला 9/11 च्या, तर भारताला 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला. त्यामुळे दहशतवादाच्या मुद्यावर दोन्ही देशांनी एकत्र येत त्याचा सामना करण्याचा निर्धार करणे स्वाभाविक म्हणावे लागेल. या दहशतवादाचे मूळ पाकिस्तानात आहे, हे आता जगजाहीर आहे. त्यामुळेच अमेरिकेने पाकिस्तानात घुसून 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन याचा खात्मा केला होता. भारताला मात्र 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिमला पकडून आणणे, दहशतवादाची पाठराखण करण्याच्या तसेच त्यांना आश्रय देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेमुळे शक्य झाले नाही. आता मात्र दहशतवादाच्या मुद्यावर भारत आणि अमेरिका एकत्र आल्यामुळे दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधून त्याला भारतात आणणे शक्य होईल, असे वाटते आहे. दहशतवादाची पाठराखण करण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेतून भारत आणि अमेरिका मैत्रीचा पाया रचला असल्याचे ह्युस्टन येथील या भेटीतून स्पष्ट झाले. अन्यथा ‘हाऊडी मोदी’ हा तसा अमेरिकेतील भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेला कार्यक्रम होता. या कार्यक्रमात ट्रम्प यांनी उपस्थित राहण्याचे तसे कारण नव्हते. कारण, हा भारत सरकारने आयोजित केलेला अधिकृत आणि शासकीय कार्यक्रम नव्हता, तरीही ट्रम्प यांनी या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती खूप काही सांगणारी आहे. या कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प यांची देहबोली या दोन महान नेत्यांचे व्यक्तिगत पातळीवरील मैत्रिपूर्ण संबंध दाखवणारी होती. येत्या काही महिन्यांत अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे मोदी यांच्या या कार्यक्रमाचा उपयोग ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी करून घेतला. अनिवासी भारतीयांचा निवडणुकीत आपल्याला पाठिंबा मिळावा, हा ट्रम्प यांचा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागचा उद्देश लपून राहिला नाही. मात्र, त्यासाठी त्यांना दोष देता येता येणार नाही.
 
 
मोदी यांनीही भारताच्या दीर्घकालीन हितासाठी ट्रम्प यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे. ‘अब की बार मोदी सरकार’ ही घोषणा भारतातील लोकसभा निवडणुकीत खूप गाजली होती, त्याच धर्तीवर मोदी यांनी ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणा देत ट्रम्प यांच्याबद्दलचे आपले प्रेम दाखवले आहे. पाकिस्तानला वठणीवर आणायचे असेल, तर अमेरिकेत ट्रम्प यांच्या नेतृत्वातील सरकारच आवश्यक आहे. पाकिस्तानच्या मुसक्या जेवढ्या आवळल्या जातील, तेवढा दहशतवाद नियंत्रणात राहील, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मोदी यांनी ट्रम्प यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी यांची दूरदर्शिता यातच दिसून येते. ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमाला ट्रम्प यांनी उपस्थित राहू नये, यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्नही अमेरिकेतील पाकिस्तानसमर्थक लॉबीने केला, पण तो फेटाळून लावत ट्रम्प सगळ्यांच्या नाकावर टिच्चून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे महत्त्व वाढले, हे नाकारता येणार नाही. एवढेच नाही, तर ट्रम्प यांनी भारतासोबत संरक्षण आणि ऊर्जाक्षेत्रात काही महत्त्वपूर्ण करार करण्याची घोषणा केली, यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जर्ळेंळाट होऊ शकतो. अमेरिकेने आपल्या प्राधान्यक्रमात बदल करत आधी जे स्थान पाकिस्तानला होते, ते आता भारताला दिले असल्याचे मोदी यांच्या, ह्युस्टन येथील कार्यक्रमावरून दिसून आले. अमेरिकेच्या या धोरणात बदल करून ते भारतानुकूल करण्याचे श्रेय मोदी यांनाच जाते. मोदी यांच्या आधीच्या पाच वर्षांतील आणि आताच्या दुसर्या कार्यकाळातील 100 दिवसांच्या कामगिरीची ट्रम्प यांनी प्रशंसा केली, ती उगाच नव्हे!
अमेरिकेच्या कानाकोपर्यातून 50 हजार भारतीय ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. मोदी यांनी ज्या आर्थिक सुधारणा केल्या, त्यामुळे भारतातील 30 लाख लोक गरिबीतून वर आले, असे उद्गार काढून ट्रम्प यांनी भारतातील तथाकथित मंदीवरून आगपाखड करणार्या विरोधकांना आणि स्वयंघोषित अर्थतज्ज्ञांच्या सणसणीत अशी कानशिलात लगावली आहे. ह्युस्टन येथील ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमातून अमेरिकेच्या भूमिकेत एवढा बदल होईल, तो पाकिस्तानला झिडकारत भारताची बाजू घेईल, याची स्वप्नातही कुणी कल्पना केली नसावी. पण, मोदी यांनी ते करून दाखवले आहे. त्यामुळेच अमेरिकेतील ह्युस्टन येथील या कार्यक्रमाचे ‘अद्भुत, अकल्पनीय आणि अविश्वसनीय’ या शब्दांतच वर्णन करावे लागेल!
@@AUTHORINFO_V1@@